Bangladesh Army Coup : भारताच्या सीमेला लागून असलेला बांगलादेश पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यामागचं कारण म्हणजे, बांगलादेशात लवकरच सत्तापालट होणार अशा चर्चांनी जोर धरला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये बांगलादेशमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथवून टाकण्यात आलं. हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर बांगलादेशची परिस्थिती पूर्ववत होईल अशी तेथील नागरिकांना आशा होती. मात्र, आता परिस्थिती आणखी बिघडत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, बांगलादेशमध्ये नेमकं काय घडतंय? तिथे पुन्हा सत्तापालट होणार का? याबाबत सरकारचं म्हणणं काय? हे जाणून घेऊ…

बांगलादेशचे सल्लागार मोहम्मद युनूस काय म्हणाले?

२६ मार्च रोजी बांगलादेशचा ५३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी तेथील एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. “बांगलादेशात सध्या अफवांचा पूर आला आहे. देशाच्या लष्करानं आमच्या सरकारविरोधात बंड घडवून आणल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे”, असा आरोप मोहम्मद युनूस यांनी केला. लोकांनी या अफवांकडे दुर्लक्ष करावं, खोटी माहिती कुणीही पसरवू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

बांगलादेशात अफवा कशा पसरल्या?

बांगलादेशचे सैन्य मोहम्मद युनूस यांना पदावरून हटवून अंतरिम सरकारचं नियंत्रण आपल्या हाती घेण्याचा विचार करीत आहेत, असं वृत्त एका वृत्तवाहिनीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं. सोमवारी याबाबत लष्कराची एक आपत्कालीन बैठक पार पडली, ज्यामध्ये येत्या काही दिवसांत संभाव्य मोठ्या घडामोडींचे संकेत देण्यात आले, असंही या वृत्तात सांगण्यात आलं. देशात पुन्हा सत्तापालट होणार असल्याचं वृत्त धडकताच बांगलादेशात चांगलाच हाहाकार उडाला. अनेकांनी समाजमाध्यमांवर या वृत्ताच्या पोस्ट शेअर केल्या.

आणखी वाचा : ‘केवळ स्तनांना स्पर्श करणे, पायजम्याची नाडी सोडणे बलात्कार नाही’; उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय भडकले, नेमकं प्रकरण काय?

लष्करप्रमुखांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

एका भारतीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या लष्कराचे प्रमुख वकार उज जमान यांनी सोमवारी एक बैठक बोलावली होती, ज्यामध्ये पाच लेफ्टनंट जनरल, आठ मेजर जनरल (जीओसी), स्वतंत्र ब्रिगेड्सचे कमांडिंग अधिकारी आणि लष्करी मुख्यालयातील अधिकाऱ्यांसह उच्च लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता. बांगलादेशातील लष्कर राष्ट्रपतींवर आणीबाणी जाहीर करण्यासाठी किंवा युनूस यांच्याविरुद्ध बंड करण्यासाठी दबाव आणू शकतं. लष्कर त्यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय एकता सरकार स्थापन करण्याचा पर्यायदेखील शोधत आहे, असा दावाही या वृत्तातून करण्यात आला.

बांगलादेशात अफवांना बळकटी कशी मिळाली?

याशिवाय, ढाक्यातील बांगलादेशी लष्कराच्या तुकड्यांच्या उपस्थितीमुळे सत्तापालटाच्या अफवांना आणखी बळकटी मिळाली. गेल्या महिन्यात लष्करप्रमुख वकार उझ जमान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. राजकीय पक्षांनी स्वत:च्या स्वार्थासाठी भांडणं सुरू ठेवली तर देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल, असं बांगलादेशचे लष्करप्रमुख म्हणाले होते. मी तुम्हाला आधीच इशारा देत आहे, नंतर तुम्ही म्हणाल की आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. राजकीय पक्षांनी आपसातील मतभेद दूर करून एकत्र येऊन जनतेसाठी काम केले नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही या व्हिडीओतून वकार उझ जमान यांनी राजकीय पक्षांना दिला होता.

मोहम्मद युनूस यांचं सरकार धोक्यात?

गेल्या ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना पदच्युत केल्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. मात्र, सरकारविरुद्ध लष्करी उठाव झाल्याच्या अफवा आणि विद्यार्थी चळवळीतील वाढत्या संघर्षातून त्यांचे सरकार जाणार अशा अफवा पसरल्या आहेत. खरं तर, मार्चच्या सुरुवातीलाही बांगलादेशात अशाच अफवांना ऊत आला होता. वकार-उझ-जमान यांना देशाच्या लष्करप्रमुख पदावरून काढण्यासाठी लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान यांनी सैन्यात बंड घडवून आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, असं वृत्त त्यावेळी काही माध्यमांमध्ये प्रकाशित झालं होतं.

बांगलादेशकडून सत्तापालटाच्या अफवांचं खंडन

बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना सत्तापालटाच्या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. देशाबाहेरील काही अदृश्य शक्तींकडून जाणीवपूर्वक या अफवा पसरवल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. “बांगलादेशात २०२६ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, त्यामुळे परकीय शक्तींकडून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला माहिती आहे की यामागे कुणाचा हात आहे. या अफवा आणि खोट्या सिद्धांतांचा प्रसार रोखण्यासाठी आम्ही संयुक्त राष्ट्रांचे सहकार्य मागितलं आहे. त्यांनी आम्हाला त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे”, असं मोहम्मद युनूस म्हणाले.

बांगलादेशात अफवा कोण पसरवतंय?

बांगलादेशच्या सशस्त्र दलांच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या निवेदनात असं म्हटलंय की, भारतातील एका वृत्तवाहिनीनं पुन्हा एकदा बांगलादेश लष्करानं आयोजित केलेल्या बैठकीबाबत अफवा पसरवली आहे. त्यांनी खोट्या आणि बनावट माहितीवर आधारित अहवाल प्रकाशित केला आहे, हे आमच्या लक्षात आलं आहे. सदरील वृत्तवाहिनी कुठलीही माहिती न पडताळता चुकीचे वृत्त प्रकाशित करते हे अत्यंत चिंताजनक आहे, असं बांगलादेशी लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सर्व माध्यमांनी महान राष्ट्रांमधील लोकांमध्ये अनावश्यक फूट आणि अविश्वास निर्माण करणारे दावे प्रकाशित करण्यापासून दूर राहावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

बांगलादेशातील सत्तापालटाचा इतिहास

१५ ऑगस्ट १९७५ रोजी बांगलादेशात प्रचंड असंतोष उफाळून आला. मूठभर तरुण सैनिकांनी ढाका येथे बंगबंधू आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्यात फक्त त्यांच्या मुली शेख हसीना आणि शेख रेहाना यांचा जीव वाचला, यामुळे बांगलादेशातील पहिल्या लष्करी उठावाचा मार्ग मोकळा झाला. या उठावाचे नेतृत्व मेजर सय्यद फारुक रहमान, मेजर खंडेकर अब्दुर रशीद आणि राजकारणी खोंडकर मोस्ताक अहमद यांनी केले. त्यानंतर एक नवीन शासन स्थापन करण्यात आले. या शासनात मोस्ताक अहमद राष्ट्रपती झाले आणि मेजर जनरल झियाउर रहमान यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा : Akbar’s Illustration Controversy: संविधानाची ७५ वर्षे; अकबराच्या चित्राचा वाद आताच कशासाठी?

एका महिन्यानंतर बांगलादेशात दुसरा सत्तापालट

बांगलादेशात आलेलं नवीन सरकारही जास्त काळ टिकू शकलं नाही. ३ नोव्हेंबर रोजी ब्रिगेडियर खालेद मोशर्रफ यांनी स्वत:ला बांगलादेशचे नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केलं. मुशर्रफ यांनी झियाउर रहमान यांना नजरकैदेत ठेवले, कारण त्यांचा असा विश्वास होता की बंगबंधूंच्या हत्येमागे झियाउर रहमान यांचा हात होता. यानंतर ७ नोव्हेंबर रोजी तिसरा सत्तापालट झाला. हे डाव्या विचारसरणीच्या लष्करी जवानांनी राष्ट्रीय समाजतांत्रिक दलाच्या डाव्या विचारसरणीच्या राजकारण्यांच्या सहकार्याने सुरू केले. हा कार्यक्रम सिपॉय-जनता बिप्लब (सैनिक आणि लोक क्रांती) म्हणून ओळखला जात असे. मुशर्रफ मारले गेले आणि झियाउर रहमान अध्यक्ष झाले.

बांगलादेशात पुन्हा सत्तापालट होणार?

झियाउर रहमान यांनी १९७८ साली बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची (बीएनपी) स्थापना केली. या पक्षाने त्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवला, पण १९८१ साली मेजर जनरल मंझूर यांच्या नेतृत्वाखालील लष्करी तुकडीने त्यांना उलथवून टाकले. बंडखोरांनी अध्यक्षांवर पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भाग न घेतलेल्या सैनिकांची आणि स्वातंत्र्यानंतर पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या सैनिकांची बाजू घेत असल्याचा आरोप केला. २४ मार्च १९८२ रोजी तत्कालीन लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल हुसेन मुहम्मद इरशाद यांनी रक्तहीन बंड करून सत्ता हस्तगत केली. त्यांची देशाची राज्यघटना निलंबित केली आणि मार्शल लॉ लागू केला होता. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात चौथ्यांदा सत्तापालट झाली. शेख हसीना यांचे सरकार उलथून मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घेतली. आता त्यांची सत्ता कायम राहणार की बांगलादेशात पुन्हा काहीतरी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.