पहिल्यावहिल्या अध्यक्षीय वादचर्चेमध्ये अर्थात डिबेटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन बऱ्याचदा अडखळल्यामुळे आणि चाचपडल्यामुळे डेमोक्रॅटिक पक्षाची चिंता वाढली आहे. बायडेन यांच्या तुलनेत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची कामगिरी चमकदार झाली. अनेक मुद्द्यांवर त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत असत्यकथन केले, पण त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. बायडेन पहिल्याच वादचर्चेमध्ये फिके पडल्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारावी असा मतप्रवाह डेमोक्रॅटिक पक्षामध्ये प्रबळ होऊ लागला आहे.
बायडेन यांचे वय दिसू लागले…
डेमोक्रॅटिक पक्षामध्ये गेले काही महिने बायडेन यांच्या वाढत्या वयाविषयी चिंतायुक्त चर्चा सुरू आहे. बायडेन बोलताना अडखळतात, चालताना चाचपडतात. काही वेळा चालताना त्यांचा तोल जातो. बोलताना काही वेळा कशाविषयी बोलतो आहोत याचे विस्मरण त्यांना होते. अमेरिकेचे अध्यक्षपद ही जगातील अत्यंत महत्त्वाची आणि जोखिमीची जबाबदारी आहे. सध्याच्या काळात हे पद राजकीयदृष्ट्यादेखील अत्यंत मोक्याचे बनले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या शक्तिमान प्रतिस्पर्ध्याशी मुकाबला करण्यासाठी तंदुरुस्ती आणि ऊर्जा उच्च प्रतीची हवी. पण या सर्व निकषांवर बायडेन कमी पडू लागले आहेत. अटलांटात शुक्रवारी झालेल्या वादचर्चेत हेच दिसून आले.
हेही वाचा…China BRI: कुन्मिंग ते सिंगापूर रेल्वेमार्गामध्ये चीनचा फायदा काय?
डेमोक्रॅटिक पक्षाची प्रतिक्रिया काय?
बिलियन-ट्रिलियन, कोविड-मेडिकेअर, स्टेट-वुमन अशा शब्दांची गल्लत बायडेन वारंवार करत होते. आर्थिक तरतुदीच्या एका प्रश्नावर ते बोलता बोलता थबकले. स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता सीएनएन वाहिनीच्या स्टुडिओत चर्चा सुरू झाली. त्यानंतर पाचच मिनिटांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चिंताभरल्या लघुसंदेशांची देवाण-घेवाण सुरू झाली. हे गृहस्थ अध्यक्षपदाचे उमेदवार राहिले तर पक्षाचे काही खरे नाही. त्यांना हरवून ट्रम्प अध्यक्ष बनले तर अमेरिकेचे आणि जगाचे काही खरे नाही. तेव्हा यांना पहिले बदला अशी मागणी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि निष्ठावंत मतदार करू लागले आहेत.
डेमोक्रॅटिक नेत्यांचे काय मत?
डेमोक्रॅटिक नेत्या आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी ‘सुरुवात धीमी होती. पण शेवट आत्मविश्वासपूर्ण झाला’ अशा शब्दांत बायडेन यांच्या कामगिरीचे वर्णन केले. खुद्द बायडेन यांना त्यांची कामगिरी इतकी खराब वाटत नाही. ‘मी पूर्वीसारखा चालत नाही. बोलत नाही. वाद घालू शकत नाही. पण मला खऱ्या-खोट्यातला फरक कळतो. देशाचे भले कशात आहे हे समजते. आणि हजारो अमेरिकनांना जे ठाऊक आहे तेच मीही जाणतो. तुम्ही कोसळता तेव्हा उठून उभे राहता!’, असे त्यांनी नॉर्थ कॅरोलिनातील भाषणात शनिवारी रात्री सांगितले. या भाषणात मात्र ते आत्मविश्वासाने बोलले.
बायडेन यांची उमेदवारी रद्द होऊ शकते का?
बायडेन यांच्या अडखळत्या कामगिरीमुळे डेमोक्रॅटिक पक्षामध्ये चिंता आणि अस्वस्थता असली, तरी या टप्प्यावर त्यांची उमेदवारी रद्द करणे किंवा त्यांना माघार घेण्याविषयी सांगणे या बाबी सोप्या नाहीत. एक तर विद्यमान अध्यक्षाला, विशेषतः निवडणूक जिंकून अध्यक्ष बनलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे माघार घ्यायला लावण्याची परंपरा अमेरिकेत नाही. बायडेन यांनी स्वतः माघार घेतली, तर भाग वेगळा. मागे १९६८ मध्ये तत्कालीन अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी अशा प्रकारे स्पर्धेतून माघार घेतली होती. डेमोक्रॅटिक पक्षाचा मेळावा ऑगस्टमध्ये आहे. पक्षांतर्गत निवडणुका (प्रायमरीज) आणि निवड मेळावे (कॉकस) यांमध्ये बायडेन यांनी यापूर्वीच आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक मते मिळवली आहेत. त्यांच्या तोडीचा उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाकडे नाही. तसेच नवीन उमेदवाराला पक्षांतर्गत मान्यता मिळवण्यासाठी निवडणुका जिंकण्याची संधीच मिळणार नाही.
हेही वाचा…विश्लेषण : ढगफुटी का आणि कशी होते?
बायडेन यांना डेमोक्रॅटिक पक्षात पर्याय कोण?
सध्या तरी मोजकीच नावे समोर दिसतात. उपाध्यक्ष कमला हॅरिस हे एक नाव. पण त्यांना पक्षात फारसा पाठिंबा नाही. फारशी लोकप्रियता नाही. शिवाय वादग्रस्त आणि काही वेळा चुकीचे बोलल्यामुळे त्यांना या क्षणी उपाध्यक्षपदापेक्षा वेगळे आणि वरचे पद देण्याची डेमोक्रॅटिक पक्षाची इच्छा नाही. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम, इलिनॉयचे गव्हर्नर जे. बी. प्रिट्झकर या दोघांकडेही प्रचारयंत्रणा चालवण्यासाठी आवश्यक पाठबळ आणि धनबळ आहे. याशिवाय अँडी बेशीर (केंटकी), जॉश शापिरो (पेनसिल्वेनिया), ग्रेट्चेन व्हिटमेर (मिशिगन) या गव्हर्नरांचाही विचार होऊ शकतो. पण बायडेन यांना बदलले जाण्याची शक्यता – त्यांनीच तसा विचार केला नाही तर – अतिशय धूसर आहे.