अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही आठवड्यांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या एका बैठकीत ‘तिसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवडून यायला आवडेल. पण कायद्यात तशी तरतूद नाही तर काय करावे’ असा प्रश्न उपस्थित केला होता. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपण याविषयी गंभीर आहोत असे म्हटले. अमेरिकेच्या कायद्यात एका घटनादुरुस्तीच्या माध्यमातून अध्यक्षांना दोनच कार्यकाळ संमत करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ट्रम्प तिसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष कसे काय बनू शकतात, ही चर्चा तेथे सुरू झाली आहे.
अमेरिकेच्या घटनेत काय तरतूद?
अमेरिकेच्या घटनेत २२व्या घटनादुरुस्तीने अध्यक्षीय कार्यकाळाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. अध्यक्षांना दोनपेक्षा अधिक टर्म निवडून येता येणार नाही, अशी तरतूद १९५१मधील या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आली. तसे करावे लागले, कारण फ्रँकलीन रुझवेल्ट हे १९३२-३६, १९३६-४०, १९४०-४४ अशा तीन टर्म अध्यक्षपदावर होते. चौथ्या टर्मच्या सुरुवातीला म्हणजे १९४५मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धाचा बहुतेक काळ ते अध्यक्षपदावर होते. त्यावेळी हे अध्यक्ष आहेत, की सम्राट अशी चर्चाही झाली होती. खरे म्हणजे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून जवळपास प्रत्येक अध्यक्षाने स्वतःहूनच दोन कार्यकाळांची मर्यादा घालून दिलेली आहे. १९५१मधील घटनादुरुस्तीने या परंपरेला कायद्याचे अधिष्ठान मिळाले. या घटनादुरुस्तीमध्ये उपाध्यक्षांबाबतही महत्त्वाची तरतूद आहे. एखाद्या उपाध्यक्षाला अपवादात्मक परिस्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावी लागली, तर त्यास आणखी दोन वेळा अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येईल. पण यासाठी त्याच्या उपाध्यक्षपदाच्या मुदतीचा अर्ध्याहून अधिक काळ पूर्ण झालेला असला पाहिजे. लिंडन जॉन्सन यांना अशी संधी चालून आली होती. १९६३मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या झाली, त्यावेळी जॉन्सन यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या मुदतीचे १४ महिने शिल्लक होते. पुढे १९६५ ते १९६९ जॉन्सन अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र दुसऱ्या टर्मसाठी निवडणूक लढवण्यास त्यांनीच नकार दिला.
पुन्हा घटनादुरुस्ती शक्य आहे?
ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्षीय निवडणूक लढवायची असेल, तर पुन्हा घटनादुरुस्ती आणावी लागेल. ते अजिबात सोपे नाही. कारण प्रतिनिधिगृह आणि सेनेट अशा दोन्ही सभागृहांमध्ये अशी घटनादुरुस्ती दोन तृतियांश बहुमताने संमत व्हावी लागेल. याशिवाय ५० राज्यांपैकी ३८ राज्यांच्या कायदेमंडळांमध्येही ती संमत करून आणावी लागेल. सध्या रिपब्लिकनांकडे प्रतिनिधिगृहात २१८-२१३, आणि सेनेटमध्ये ५३-४७ असे बहुमत आहे. दोन्ही सभागृहांतील रिपब्लिकन मते घटनादुरुस्तीसाठी पुरेशी नाहीत. याशिवाय ५० पैकी २८ राज्यांच्या कायदेमंडळांमध्येच रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे.
उपाध्यक्षपदाच्या मार्गे अध्यक्ष?
ट्रम्प दोन विनासलग कार्यकाळ भूषवणारे अमेरिकेच्या इतिहासातील केवळ दुसरेच अध्यक्ष. २०१६-२० आणि २०२४-२८ असे दोन विनासलग कार्यकाळ ते अध्यक्ष असतील. यापूर्वी ग्रोव्हर क्लीव्हलँड १८८५-८९ आणि १८९३-९७ असे दोन विनासलग कार्यकाळ अध्यक्ष होते. विनासलग असे तीन कार्यकाळ ट्रम्प अध्यक्ष बनू शकतात का याविषयी चाचपणी त्यांच्या काही समर्थकांनी केली. पण घटनादुरुस्तीमध्ये स्पष्ट उल्लेख असून, न्यायालयातही अशी याचिका टिकणार नाही. असा वेळी उपाध्यक्षपदाच्या मार्गाने ट्रम्प अध्यक्ष होतील का, याचीही शक्यता वर्तवली गेली. आगामी निवडणुकीत विद्यमान उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी अध्यक्ष म्हणून निवडून यायचे. मग व्हान्स यांनी ट्रम्प यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करायची आणि त्यानंतर राजीनामा द्यायचा, याविषयी खल झाला. तशा स्वरूपाची शक्यता ट्रम्प यांनी एका टीव्ही मुलाखतीत बोलूनही दाखवली. पण येथे अमेरिकेच्या घटनेतील १२वी घटनादुरुस्ती आड येते. या घटनादुरुस्तीमध्ये स्पष्ट म्हटले आहे, की जी व्यक्ती अध्यक्षपदासाठी अपात्र, ती उपाध्यक्षपदासाठीही अपात्र ठरेल. त्यामुळे हा आडमार्गही ट्रम्प यांच्यासाठी बंद आहे.