अमेरिकेतली २८ वर्षीय तरूणीने कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्सचे सेवन केल्यामुळे ह्रदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडा इथे शिक्षिका म्हणन काम करत असलेली केटी डोनेल हिची जीवनशैली अत्यंत निरोगी होती. केटी ही फिटनेस फ्रिक असल्याने ती जिम करण्यावर भर देत होती. ती दिवसातून तीन वेळा एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करायची तसंच जिममध्ये येण्यापूर्वीही ती कॅफिन सप्लिमेंट घेत होती. “केटी ही वर्कआऊट क्वीन होती. ती अगदी साधं जेवण जेवत. ती फक्त ऑरगॅनिक अन्न खात असे. या सर्व सवयींव्यतिरिक्त केटीला एनर्जी ड्रिंक्सची सवयही होती”, असं तिची आई लोरी बॅरोनन यांनी माध्यमांना सांगितले.
केटीची दिनचर्या काय होती?
केटी दररोज ३ वेळा एनर्जी ड्रिंक्सचं सेवन करत असे. तसंच जिम वर्कआऊटनंतर एनर्जी वाढवणारे सप्लिमेंट्सचेही ती सेवन करत. हातात एनर्जी ड्रिंक्सशिवाय केटी आम्हाला क्वचितच दिसली असेल असं केटीच्या एका मैत्रिणीने सांगितलं. केटीच्या मृत्यूनंतर तिची गाडी स्वच्छ करताना तिच्या आईला त्यात एनर्जी ड्रिंक्सचा साठाही सापडला. यावरून या एनर्जी ड्रिंक्सचे व्यसन तिला लागले होते यात शंका नाही.
ऑगस्ट २०२१मध्ये, केटी अचानक जमिनीवर कोसळली आणि तिचे डोळे हे डोक्याच्या मागच्या बाजूला वळले होते. तिच्या मैत्रिणींनी तात्काळ अॅम्ब्युलन्स बोलावली. केटी बराच वेळ ऑक्सिजनशिवाय होती आणि त्यामुळे तिच्या मेंदूचे नुकसान झाले. त्यांनी पुढचे तीन तास तिच्यावर उपचार केले मात्र ती पुन्हा उठली नाही असं तिच्या आईने सांगितलं.
केटी १० दिवस वैद्यकीयदृष्ट्या कोमात होती. मात्र तिची प्रकृती आणखी ढासळत गेली. अखेर तिच्या कुटुंबाला व्हेंटिलेटर काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. डॉक्टरांनी केटीच्या मृत्यूचं कारण एनर्जी ड्रिंक्स असल्याचं अधिकृतपणे सांगितलं नाही. मात्र तिच्या आईला याबाबत खात्री होती. अनेकदा प्री-व्रकआऊटमध्ये असं होतं असं डॉक्टरांनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र तिच्या आईला या एनर्जी ड्रिंक्सच केटीच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची खात्री होती.
“केटीला काहीतरी चिंता होती आणि ती अनेक डॉक्टरांकडे गेली होती. ती कॅफिन आणि एनर्जी ड्रिंक्सचा गैरवापर करत होती”, असा दावा तिच्या आईने केला होता. सुरूवातीला केटी वर्कआऊट, तिची नोकरी आणि ताण घालवण्यासाठी तात्पुरता कॅफिनचा आधार घेत असल्याचं तिच्या आईला वाटलं. व्यायाम करण्यास मदत म्हणून आणि अधिक ऊर्जेसाठी ती याचा वापर करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर ती या सगळ्याच्या आहारी गेल्याचे त्यांना समजले.
एनर्जी ड्रिंक्स हानिकारक आहेत का?
एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन, टॉरिन, ग्वाराना, जिनसेंग, साखर आणि ‘ब’ जीवनसत्त्वे असे अनेक घटक असतात. हे घटक इन्स्टंट ऊर्जा देतात मात्र, त्याचा शरीरावर उलट परिणामही होऊ शकतो. एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिनची पातळी ८० मिलीग्रॅम ते ५०० मिलिग्रॅम प्रति कॅन असू शकते. एका साधारण कॉफी कपएवढ्या एनर्जी ड्रिंकमध्ये जवळपास १०० मिलीग्रॅम कॅफिन असते. कॅफिनचे सेवन कमी किंवा मध्यम प्रमाणात केल्यास त्याचे फायदेही आहेत. सतर्कता, अल्झायमर तसंच टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी करणं यासाठी कॅफिन सकारात्मक काम करते. मात्र, याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास ते तेवढेच घातकही ठरते. एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. एका अहवालानुसार, परिष्कृत(रिफाइंड) साखर किंवा कृत्रिम साखर असलेल्या गोड पदार्थांमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यानंतर शरीरात बिघाड व्हायला सुरूवात होते. शिवाय टॉरिन, ग्वाराना आणि जिनसेंग यासारखे घटक अधिक धोका वाढवू शकतात. हे घटक उत्तेजक असतात जे तात्पुरती सतर्कता वाढवतात. मात्र, त्याचे अतिसेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
एनर्जी ड्रिंक्सचा ह्रदयावर काय परिणाम होतो?
अमेरिकन हॉर्ट असोसिएशनच्या एका अभ्यासात आढळल्याप्रमाणे, ९०० मिलीलीटर एनर्जी ड्रिंकचे सेवन केल्याने रक्तातील साखरेच्या दाबात लक्षणीय वाढ होऊ शकते. यामुळे ह्रदयाचे ‘क्यू टी इंटरवल’ म्हणजेच ‘इलेक्ट्रोकार्डिओग्राम’ लांबवले जाते. इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ह्रदयाच्या आकुंचन आणि विश्रांती प्रक्रियेसाठी लागणारा वेळ मोजणे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, एनर्जी ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात कॅफिन आणि इतर उत्तेजक घटकांचे मिश्रण असते, त्यामुळे ह्रदयाची गती आणि रक्तदाब दोन्ही वाढू शकते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या माहितीनुसार, या पेयांचा जास्त वापर केल्यास ह्रदयाच्या कार्यात अडथळा येतो आणि इतर आरोग्य समस्याही उद्भवू शकतात.
एनर्जी ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे ह्रदयरोग, ह्रदयविकाराचा झटका आणि मायोकार्डिअल इन्फेक्शनसह ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात असं २०१७च्या एका माहितीत सांगितले होते. अनेकदा अल्कोहोल किंवा इतर उत्तेजक घटकांसह एनर्जी ड्रिंक्सचे सेवन जास्त वेळा केले जाते असंही काही संशोधकांनी निरीक्षण केलं आहे.
एनर्जी ड्रिंक्समध्ये आढळणारे कॅफिन, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज(सीओपीडी) आणि फुप्फुसांच्या कार्यात वाढत्या समस्या यामध्ये संबंध असल्याचे हॉर्ट अँड लंगमध्ये प्रकाशित झालेल्या २०२४च्या अभ्यासात आढळले आहे. अॅट्रियल फायब्रिलेशन (ह्रदयाची अनियमित धडधड) ही एक ह्रदयाच्या कार्यासंबंधित समस्या आहे. २०११च्या एका केस रिपोर्टमध्ये, १४ आणि १६ वयोगटातील दोन निरोगी किशोरवयीन मुलांना एनर्जी ड्रिंक्स पिल्यानंतर या समस्येचा त्रास झाल्याचे दिसून आले.
२०१९च्या अभ्यासानुसार, रक्तदाब ज्याला हायपरटेन्शन असेही म्हटले जाते, याचा त्रास एनर्जी ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळेही होतो. २०२१च्या एका अहवालात आढळले की, एनर्जी ड्रिंक्सच्या सेवनाने ह्रदयाच्या कार्यात व्यत्यय येऊ शकतो आणि परिणामी विश्रांतीच्या वेळी ह्रदयाची गती वाढते. साखरेच्या सेवनामुळे वजन वाढते. यामुळे टाईप-२ मधुमेह आणि आरोग्याच्या इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. २०२०च्या एका माहितीत सांगितल्याप्रमाणे, एनर्जी ड्रिंक्स, सोडा आणि गोड कार्बोनेटेड पेय यासह गोड पेयांचे अतिसेवन केल्यास सिस्टॉलिक रक्तदाब (ह्रदयाच्या ठोक्यांनुसार रक्तवाहिन्यांवर पडणारा दबाव) आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. हा धोका लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्येदेखील उद्भवतो.