बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी भारतात हवा असलेला कर्जबुडव्या उद्योगपती मेहुल चोक्सी युरोपियन देशात राहत असल्याचे वृत्त समोर आले आहे. वृत्तानुसार, तो त्याची पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी अँटिग्वा आणि बारबुडामध्ये असलेला चोक्सी वैद्यकीय उपचारांसाठी कॅरिबियन देश सोडून गेला होता. पंजाब नॅशनल बँकेचे कर्ज घोटाळा प्रकरण प्रसिद्धीझोतात येण्यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये तो त्याचा पुतण्या ज्वेलर नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. त्यानंतर भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे. बेल्जियम मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण करणार का? त्याविषयी जाणून घेऊ.
मेहुल चोक्सी बेल्जियममध्ये?
‘असोसिएटेड टाईम्स’च्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सी बेल्जियमच्या बंदर शहर अँटवर्पमध्ये आहे. युरोपियन युनियन (EU)मधील नागरिकांच्या कुटुंबातील सदस्यांना देशात राहण्याचा अधिकार देणारे ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ मिळवल्यानंतर तो बेल्जियममध्ये राहत आहे. फरार व्यावसायिकाची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे. या वृत्तात असेही नमूद केले आहे की, चोक्सीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी बेल्जियमशी संपर्क साधला आहे.
भारताने मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित घडामोडींवर अद्याप अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. चोक्सीने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना बनावट कागदपत्रे देऊन निवासी कार्ड मिळवले असल्याचीही माहिती आहे. ‘असोसिएटेड टाईम्स’ने सूत्रांच्या माहितीच्या आधारे वृत्त दिले आहे की, तो भारत आणि अँटिग्वामधील त्याचे नागरिकत्व आहे हे सिद्ध करण्यातदेखील अयशस्वी ठरला आहे. बेल्जियमने चोक्सी आपल्याच देशात असल्याची माहिती स्पष्ट केली आहे.

बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डेव्हिड जॉर्डेन्स यांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ ला सांगितले की, फेडरल पब्लिक सर्व्हिस (एफपीएस) फॉरेन अफेयर्स यांना या प्रकरणाची जाणीव आहे आणि ते त्याकडे खूप बारकाईने लक्ष देते. परंतु, आम्ही वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करू शकत नाही. तसेच हे प्रकरण फेडरल पब्लिक सर्व्हिस जस्टिसच्या अधिकाराखाली आहे. एफपीएस फॉरेन अफेयर्स या महत्त्वाच्या प्रकरणातील घडामोडींवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे.”
अँटिग्वा आणि बारबुडाचे परराष्ट्र मंत्री ईपी चेट ग्रीन अलीकडेच रायसीना संवादासाठी भारतात आले होते. त्यांनी खुलासा केल्यानंतर मेहुल चोक्सी पुन्हा चर्चेत आला होता. त्यांनी खुलासा केला होता, फरार असलेल्या मेहुल चोक्सीने वैद्यकीय उपचारांसाठी बेट राष्ट्र सोडले आहे. त्यांनी असेही सांगितले होते की, त्यांचा देश या मुद्द्यावर भारत सरकारबरोबर काम करत आहे. “मेहुल चोक्सी आमच्या देशात नाही. मला सांगण्यात आले आहे की, त्याने परदेशात वैद्यकीय उपचारांसाठी अँटिग्वा सोडले आहे.”
“तो अजूनही अँटिग्वा आणि बारबुडाचा नागरिक आहे. तुमचे सरकार आणि माझे सरकार या विषयावर एकत्र काम करत आहेत. लोकशाहीत आपले काही नियम आहेत. दोन्ही देश कायद्याच्या नियमांचा आदर करतात. मेहुल चोक्सीच्या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे. जोपर्यंत त्याविषयी निर्णय होत नाही तोपर्यंत मी काहीही बोलू शकत नाही किंवा आपल्यापैकी कोणीही काहीही बोलू किंवा करू शकत नाही,” असे ग्रीन यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.
चोक्सी हा भारतातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी आहे. तो आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांनी बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग वापरून सरकारी पंजाब नॅशनल बँकेतून (पीएनबी) १३,५०० कोटी रुपये हडप केल्याचा आरोप आहे. नीरव मोदी हा सध्या लंडनच्या तुरुंगात आहे. भारताने ब्रिटनकडून त्याच्यादेखील प्रत्यार्पणाची मागणी केली आहे.
भारत मेहुल चोक्सीचे बेल्जियममधून प्रत्यार्पण करू शकेल का?
मेहुल चोक्सीचे बेल्जियममधून प्रत्यार्पण शक्य आहे. भारत आणि बेल्जियम या दोन्ही देशांचा प्रत्यार्पण करार आहे. दशकांपूर्वीच्या या करारात हत्या, नरसंहार, विवाहबाह्य संबंध, बनावटगिरी आणि फसवणूक इत्यादी गुन्ह्यांसाठी हव्या असलेल्या फरार गुन्हेगारांच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाते. “कोणत्याही परिस्थितीत आत्मसमर्पण करता येणार नाही, जोपर्यंत प्रत्यार्पणासंदर्भात दोन्ही देशांमध्ये लागू असलेल्या कायद्यांनुसार गुन्हा दंडनीय नसेल,” असे करारात म्हटले आहे. जर गुन्हा राजकीय स्वरूपाचा असेल तर प्रत्यार्पणाची विनंती नाकारण्याची परवानगीदेखील यामुळे मिळते.
२०२३ मध्ये, भारत आणि बेल्जियमने गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करार (एमएलएटी) वर स्वाक्षरी केली; ज्यामध्ये दोन्ही देशांना त्यांच्या तपास संस्थांना हवे असलेल्या फरार व्यक्तींविरुद्ध एकमेकांचे शोध वॉरंट आणि समन्स लागू करणे आवश्यक आहे. “बेल्जियममधील कोणत्याही व्यक्तीवर गुन्हेगारी प्रकरणांच्या संदर्भात समन्स किंवा शोध वॉरंट बजावण्यासाठी किंवा अमलात आणण्यासाठी केंद्र सरकारने बेल्जियम राज्य सरकारबरोबर व्यवस्था स्थापन केली आहे,” असे गृह मंत्रालयाने त्यावेळी म्हटले होते.
२०२० मध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बेल्जियममधील प्रत्यार्पण करारावर स्वाक्षरी केली आणि मान्यता दिली; ज्यामुळे दोन्ही देशांना प्रत्यार्पणासाठी मान्यता देण्यात आलेले गुन्ह्यातील आरोपी किंवा दोषी आढळलेल्यांना मायदेशी परत पाठवता येते. प्रत्यार्पणयोग्य गुन्हा म्हणजे दोन्ही देशांच्या कायद्यांतर्गत एक वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेला गुन्हा, अशी त्याची तरतूद आहे. परंतु, मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण गुंतागुंतीचे ठरू शकते. याचे कारण म्हणजे अनेक वृत्तांमध्ये दावा केला जात आहे की, तो एका प्रसिद्ध कर्करोग रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी स्वित्झर्लंडला जाण्याची योजना आखत आहे.