ज्ञानेश भुरे
नीरज चोप्रा… भारतीय ॲथलेटिक्स आणि पर्यायाने क्रीडा क्षेत्राला पडलेले एक सुवर्णस्वप्नच म्हणावे लागले. केवळ भालाफेकच नाही, तर ॲथलेटिक्समध्येही भारत कुणाच्या खिजगणतीत नव्हता. अशा स्थितीतून नीरज चोप्राने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने अवघ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आणि भारताकडे आकर्षित केले आहे. जागतिक स्तरावर आणखी यशाची पावले चढताना नीरजचे जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदक भारतीय ॲथलेटिक्सचा दृष्टिकोन बदलू शकेल का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न…
नीरज चोप्राचा जागतिक सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास कसा आहे?
हरियाणाच्या एका गावातून वजन कमी करण्यासाठी म्हणून खेळाकडे वळलेला नीरज आता आंतरराष्ट्रीय वलयांकित भालाफेकपटू ठरला आहे. आधी हरियाणातील आणि नंतर पुण्यात लष्कराच्या क्रीडा केंद्रात प्रशिक्षण घेतल्यानंतर नीरजने स्पर्धात्मक पातळीवर अशी काही प्रगती केली की, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत २०१६मध्ये सुरू झालेला त्याचा सुवर्णप्रवास सात वर्षांत ऑलिम्पिकमार्गे जागतिक स्पर्धेतील सुवर्णपदकापर्यंत येऊन पोचला आहे. विशेष म्हणजे दुखापतींवर मात करत त्याने सात वर्षांत आठ पदके मिळवली असून, यातील सात सुवर्णपदके आहेत.
नीरजच्या कारकीर्दीला वळण देणारा क्षण कोणता?
नीरजची खरी ओळख २०१६मध्ये कुमार गटाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकाने झाली; पण त्याच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले, ते टोक्यो २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदकाने. ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर मैदानाबाहेरही नीरजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्रिकेटपटूंच्या बरोबरीने कदाचित काही अंशी अधिकच त्याची ‘ब्रँड व्हॅल्यू’ वाढू लागली. अनेक आघाडीचे उद्योजक त्याच्यासाठी प्रायोजक म्हणून उभे राहू लागले. क्रिकेटपलीकडेही भारतात खेळामध्ये कारकीर्द घडू शकते याचा विश्वास नीरजच्या कामगिरीने आला. त्यामुळेच केवळ नीरजच नाही, तर त्याच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाने भारतीय ॲथलेटिक्सला वेगळी दिशा मिळाली.
नीरजच्या ऑलिम्पिक पदकानंतर काय बदल झाला?
ऑलिम्पिक पदकानंतर एक तर नीरज सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत राहिला आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे नीरजपासून प्रेरणा घेऊन भालफेक क्रीडा प्रकाराला जवळ करणारी एक पिढीच उदयास आली. नीरजच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर आजच्या घडीला भारताकडे किमान सहाहून अधिक भालाफेकपटू ८० मीटरहून अधिक भालाफेक करू शकतात. यंदाच्या जागतिक स्पर्धेत एकाच वेळी भारताचे तीन भालाफेकपटू अंतिम फेरीत खेळत होते, ही सर्वात मोठ्या बदलाची पावती म्हणता येईल.
नीरजच्या यशाचे नेमके कारण काय?
कठोर मेहनत आणि अचूक नियोजन ही नीरजच्या यशाची कारणे असू शकतात; पण टोक्यो ऑलिम्पिकनंतर सातत्यपूर्ण कामगिरी हे नीरजचे मुख्य बलस्थान राहिले आहे. गेल्या दोन वर्षांत ९० मीटरचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने सहभाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धेत ८६ मीटरहून अधिक भालाफेक केली आहे. तरी त्याला दुखापतीमुळे अनेक स्पर्धांपासून वंचित राहावे लागले. गेल्या वर्षी जूनमध्ये फिनलंडमध्ये ८६.६९ मीटर, त्यानंतर स्टॉकहोममध्ये ८९.९४ मीटर, डायमंड लीगमध्ये ८८ मीटर असे अंतर त्याने पार केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशात हेच सातत्य सर्वांत महत्त्वाचे आहे.
नीरजच्या कामगिरीने काय बदल होऊ शकतात?
नीरजच्या कामगिरीने सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेत बदल घडून येईल. भारतीय काहीही करू शकतात हे नीरजने दाखवून दिले आहे. आवश्यकता आहे ती मेहनतीची. त्यापासून दूर जाऊ नका असा सल्ला दिला आहे. नीरजने दाखवलेली कणखर मानसिकता सर्वात महत्त्वाची आहे. दुसरे म्हणजे भारतीय ॲथलेटिक्सलादेखील आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आजपर्यंत ॲथलेटिक्ससाठी एकच प्रशिक्षक होता. तोच ट्रेनर, फिजिओ, आहारतज्ज्ञ अशा भूमिका बजावत होता. आता नीरजने यासाठी प्रत्येक आघाडीवर स्वतंत्र तज्ज्ञ आवश्यक असल्याचे दाखवून दिले. केवळ भारतात राहून कामगिरी करता येणार नाही, तर गुणवत्ता असलेल्या प्रत्येक खेळाडू जास्तीत जास्त परदेशात प्रशिक्षणासाठी कसा राहील याचाच विचार करावा लागणार आहे. भारतीय खेळाडूंना केवळ ऑलिम्पिक पात्रतेसाठी भारतात आणणे योग्य नाही ही पारंपरिक विचारसरणी बदलावी लागणार आहे. आपले खेळाडू सातत्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि स्पर्धेच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे. नीरजने हे करून दाखवले आहे.