“xxx रमी पे आओ ना महाराज… कस्टमर सर्विस के लिए हाजिर है आपके लिए…” युट्यूब सुरू केले की ही जाहिरात दिसते. रमी किंवा इतर ऑनलाइन गॅम्बलिंगशी निगडित अनेक जाहिराती सोशल मीडियाच्या विविध साईट्सवरून आपल्यासमोर येत असतात. त्यासोबतच आपल्यासमोर येतात ऑनलाइन रमी किंवा इतर गेम्समुळे झालेल्या आत्महत्येच्या बातम्या. तामिळनाडूमध्ये मागच्या एका वर्षात ४० हून अधिक लोकांनी ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्यानंतर आपले जीवन संपविले. तामिळनाडूप्रमाणेच इतरही राज्यांत या प्रकारामुळे आत्महत्येच्या बातम्या अधूनमधून येत असतात. ऑनलाइन गेम ते ऑनलाइन गॅम्बलिंगपर्यंतचा प्रवास हा फार कठीण नाही. त्यामुळेच या विषयावर आता गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ऑनलाइन गेमिंग व्यवसायात असलेल्या कंपन्यांनी कौशल्यावर आधारित खेळ आणि नशिबावर आधारित खेळ असा युक्तीवाद केल्यामुळे जुगारालाही आता कौशल्याचे वेष्टन लावून नितीनियमाच्या पडद्याखाली हा व्यवसाय सुरूच राहील, असे दिसत आहे. त्यामुळे ऑनलाइन जुगाराच्या दुष्परिणामांची जास्तीत जास्त चर्चा आणि त्यावर निदान शोधण्याची आवश्यकता आहे.

ऑनलाइन गेमिंगवर आता २८ टक्के जीएसटी

ऑनलाइन गेमिंगच्या दुष्परिणामांची चर्चा करण्याचे कारण म्हणजे केंद्रीय अर्थखात्याने घेतलेला एक निर्णय. यापुढे ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोड्यांच्या शर्यतीसारख्या खेळांवर २८ टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलच्या ५१ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी लागू होणार आहे. अंमलबजावणीच्या सहा महिन्यांनंतर त्याचा आढावा घेतला जाईल.

Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

हे वाचा >> ऑनलाइन जुगारावर तामिळनाडू निर्बंध लादणार; ऑनलाइन गेमिंगवरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने का आले?

करोना आणि गेमिंगचा प्रादुर्भाव

शहरांपासून ते छोट्याश्या गावापर्यंत आता स्मार्टफोन पोहोचले आहेत. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाचा बोलबाला झाला, त्यामुळे स्मार्टफोनच्या वापराला आणखीच चालना मिळाली. शिक्षणासाठी मोबाइलचा वापर करता करता हळूहळू लहान मुलांकडून गेम्स खेळण्यासाठीचा स्क्रीनटाईमही वाढत गेला. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पब्जी खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही, ऑनलाइन गेममध्ये आईच्या बँक खात्यातील सर्व पैसे उडविले, काहींना नैराश्य आले; अशा काही कारणांमुळे अनेक मुलांनी आत्महत्या केली आहे. गाव रेडिओ या वृत्त संकेतस्थळाने ग्रामीण भागात जाऊन गेमिंगच्या आहारी गेलेल्या मुलांशी संवाद साधला. तेव्हा कळले की, शालेय विद्यार्थी रोज चार ते पाच तास पब्जीसारखे हिंसक खेळ खेळत असतात. या खेळादरम्यान जर त्यांची पालकांनी अडवणूक केली किंवा नुसती त्यांना हाक जरी मारली तरी त्यांच्या रागाचा पारा चढतो. खेळात व्यत्यय आल्यानंतर आपले रँकिंग घसरते, अशी कबुलीच या मुलांनी गाव रेडिओशी बोलताना दिली.

फक्त शालेय विद्यार्थीच नाही, तर तरुण आणि प्रौढ व्यक्तीही लॉकडाऊनच्या काळात स्मार्टफोनच्या व्यसनाधीन झाल्या. हातात काम नसल्यामुळे विरंगुळा म्हणून रिल्स, व्हिडीओ पाहणे, कँडी क्रशसारखे गेम खेळणे… इथून सुरू झालेला प्रवास आता ऑनलाइन गेम्स आणि गॅम्बलिंगपर्यंत येऊन पोहोचला आहे. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनने जुलै २०२३ मध्ये जुगाराचे मानवी मेंदूवर होणारे परिणाम आणि जुगाराच्या व्यसनाला बळी पडणारा समाजातील नेमका घटक कोणता? याबद्दलचा एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे.

ऑनलाइन गेमिंग आणि ऑनलाइन जुगारामध्ये फरक काय?

ऑनलाइन गेमिंगमध्ये व्हिडीओ गेम्स, रोल प्लेइंग व्हिडीओ गेम्स, मल्टीप्लेअर ऑनलाइन गेम्स, टेबलटॉप गेम्स आणि पझल गेम्सचा समावेश होतो; तर ऑनलाइन जुगार किंवा ज्याला गॅम्बलिंग म्हटले जाते, अशा प्रकारात स्लॉट्स (फँटसी क्रिकेट लीगमध्ये ‘स्लॉट्स’ विकत घेतले जातात), कार्ड गेम्स (रमी वैगरे), लॉटरी, पोकर, रोलेट, बिंगो, बेटिंग, व्हिल ऑफ फॉर्च्युन अशा गेम्सचा समावेश होतो.

ऑनलाइन जुगारासाठीच्या जाहिराती व्हिडीओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येतात. युट्यूबवर तर अधिकृतरित्या या जाहिराती दाखवल्या जातातच; शिवाय इन्स्टाग्राम, टीकटॉक (भारतात आता बंद आहे), फेसबुक या सारख्या सोशल मीडिया साईट्सवर अनेक सेलिब्रिटी, सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर विविध ऑनलाइन गॅम्बलिंग साइटच्या जाहिराती करतात. आयपीएलसारख्या क्रिकेट जगतातील प्रसिद्ध अशा स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व यावेळी ‘ड्रीम ११’ या कंपनीकडे होते. रिअल मनी आणि कौशल्यावर आधारित गेमिंगचा दावा ड्रीम ११ सारख्या कंपन्यांकडून करण्यात येतो.

हे वाचा >> “रमी खेळणं जुगार नाही”, उच्च न्यायालयाचा निकाल; न्यायमूर्ती म्हणाले, “पैसे लावले असतील तर…”

ऑनलाइन जुगाराचे व्यसन किती घातक?

जुगार हा मानवाच्या एका जुन्या व्यसनांपैकी एक आहे. महाभारतात तर द्यूत या जुगाराच्या खेळामुळे काय घडले, हे आपण सर्वच जाणतो. व्यावसायिक भाषेत बोलायचे झाल्यास, “कमी गुंतवणूक करून विनाकष्ट मोठा परतावा मिळण्याची सोपी पद्धत म्हणजे जुगार.” यात लॉटरीचाही उल्लेख करावा लागेल. पण, लॉटरीची किती तिकिटे काढायची? याला मर्यादा असते. शिवाय लॉटरीच्या तारखेपर्यंत थांबावे लागत असल्यामुळे त्याचे व्यसन जुगाराइतके जडत नाही.

मानवाने इतर क्षेत्रात जशी प्रगती केली, तशी जुगार आणि त्याच्या पद्धतीतही बदल होत गेले, पण त्याचे मर्म तेच आहे. कमी वेळेत अधिक पैसे मिळवण्याची लालसा. ऑफलाइन जुगारात मटका, पत्ते, शर्यती, पैज, रोलेट आणि इतर खेळांचा उल्लेख होतो. गोव्यातील कसिनो सोडले तर भारतात बहुतांशी ठिकाणी जुगारावर कायद्याने बंदी आहे. लपून छपून जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईची भीती असते, शिवाय अशा जुगाऱ्यांच्या कुटुंबीयांना याची कुणकुण लागल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जातो.

पण ऑनलाइन जुगाराचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. मुळात ऑनलाइन गॅम्बलिंग अजूनही कायद्याच्या कक्षेत आलेले नाही. तसेच यावर निर्बंध घालण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. तसेच मोबाइलवर तासनतास आपण काय करतोय, याचा इतरांना थांगपत्ता लागणे कठीण असते. बरीच किशोरवयीन मुले, तरुण, प्रौढ आपल्या मोबाइलवर गुपचूपपणे ऑनलाइन जुगार खेळत राहतात. जेव्हा ऑनलाइन जुगारात स्वतःची बचत गमावून, वर भरमसाठ कर्ज होते, तेव्हा अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. तेव्हा इतरांना त्यांच्या या व्यसनाविषयी माहिती मिळते.

जुगारामागील मानसिकता

बेलर विद्यापीठातील औषध महाविद्यालयाने जुगाराचे व्यसनात रुपांतर होण्यामागची कारणे आणि त्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. इतर व्यसनांप्रमाणेच जुगाराचे व्यसनदेखील व्यक्तीला नैराश्याच्या खोल दरीत ढकलू शकते. सर्वस्व गमावल्यानंतर व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही, अशावेळी त्याच्याकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता असते. इतर व्यसनाप्रमाणेच जुगारामुळे मेंदूतील बक्षीस केंद्र (reward center) उत्तेजित होते. जुगारात छोटासा लाभ झाल्यानंतर मेंदूतील या भागात आनंदाच्या लहरी निर्माण होतात, ज्यामुळे अशा व्यक्तीला जुगारात आणखी जिंकण्याची तलफ लागते आणि तो पुन्हा पुन्हा तोच आनंद प्राप्त व्हावा यासाठी जुगार खेळत राहतो.

बेलर औषध महाविद्यालयातील मानसोपचार आणि वर्तणूक विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. असीम शाह यांनी सांगितले की, अमली पदार्थांचे व्यसन जडण्यास मेंदूतील जो भाग कारणीभूत आहे, तोच भाग जुगाराचे व्यसन जडण्यास हातभार लावतो. जुगाराच्या व्यसनात बुडालेली व्यक्ती इतर व्यसनाधीनतेत दिसत असलेलीच लक्षणे दाखवतो.

जुगारी मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी मानसपोचार तज्ज्ञांनी त्यांची तीन प्रकारात विभागणी केली आहे.

जुगारी मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी मानसपोचार तज्ज्ञांनी त्यांची तीन प्रकारात विभागणी केली आहे.

व्यावसायिक जुगारी (Professional Gambler) : या प्रकारातील जुगारी हे खिलाडू वृत्तीने जुगार खेळतात. त्यांचे स्वतःवर नियंत्रण असते. तसेच संयम राखून तर्कशक्ती लावून ते जुगार खेळतात.

कधी-कधी जुगार खेळणारे (Social Gambler) : या प्रकारातील लोक कधी कधी जुगार खेळतात आणि त्यासाठी मर्यादित स्वरुपात पैसे खर्च करतात. मित्रांसमवेत कधी कधी कसिनोत जाणे आणि जुगाराचा आनंद घेणे या लोकांना आवडते.

समस्याग्रस्त जुगारी (Problem Gambler) :

काही जुगारी व्यक्ती जुगाराच्या इतक्या अधीन झालेल्या असतात की, त्या स्वतःसह इतरांसाठी आणि विशेषतः कुटुंबासाठी अनेक समस्या निर्माण करतात. त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण सुटलेले असते. जुगारालाच जगण्याचे साधन बनविल्यामुळे त्यांना त्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. त्यामुळे कुठे थांबायचे याचा सारासार विचार करण्याची शक्ती ते गमावून बसतात.

समस्याग्रस्त जुगारी स्वतःला व्यावसायिक जुगारी किंवा कधी कधी जुगार खेळणारे असल्याचे समजतात किंवा तसे दाखवितात. समस्याग्रस्त जुगाऱ्यांना ओळखण्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत…

  • तीव्र अस्वस्थता दिसणे
  • असहाय्य आणि हताश वाटणे
  • क्षमतेपेक्षाही जास्त कर्ज काढणे
  • गमावलेले पैसे मिळवण्याच्या ईर्षेने आणखी जुगार खेळणे
  • वारंवार खोटे बोलणे
  • समस्या लपवणे आणि सर्व व्यवस्थित असल्याचा अर्विभाव आणणे

डॉ. शाह यांनी जुगाराचे चार टप्पे सांगितले आहेत. जुगार मग तो ऑनलाइन असो किंवा पारंपरिक, या पायऱ्या व्यसनाधीन व्हायला कारणीभूत ठरतात. जिंकणे, हरणे, अगतिक होणे आणि नैराश्य. पहिल्या टप्प्यात जुगारी पैसे जिंकतो, ज्यामुळे त्याच्या आनंदाला पारावर उरत नाही. जिंकण्याची त्याची हाव आणखी वाढत जाते. हळूहळू पैसे गमावल्यानंतर दुसरा टप्पा पूर्ण होतो. मग तिसऱ्या टप्प्यात जुगाऱ्याची अगतिकता वाढत जाते, गमावलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी तो आणखी पैसे जुगारात ओततो. पुन्हा पुन्हा पैसे हरल्यामुळे जुगाऱ्यात एकप्रकारचे नैराश्य निर्माण होते. जुगाराचे व्यसन लागलेल्या व्यक्तीला योग्यवेळी समुपदेशन मिळाले नाही, तर हे दुष्टचक्र सुरूच राहते.

जुगाराला बळी पडलेल्यांना बाहेर कसे काढावे?

डॉ. शाह सांगतात की, अनेकदा जुगाराचे व्यसन लागलेली व्यक्ती सर्वस्व गमावून बसते. जिथून त्याला पुन्हा मागे फिरण्याचा मार्ग मिळत नाही. नियमित जुगार खेळणारे व्यक्ती नोकरी, व्यवसाय गमावून बसतात. घरदार विकावे लागते, कुटुंब आणि नातेवाईक, मित्रपरिवार दुरावतो. “तुमच्या प्रिय व्यक्तीला जर जुगाराचे व्यसन लागले असेल तर त्याला जुगाराचे व्यसन सोडविण्यात तज्ज्ञ असलेल्या व्यावसायिक समुपदेशकाकडे घेऊन जा. व्यसन कमी करण्यासाठी काही औषधे दिली जाऊ शकतात, जी नैराश्य कमी करण्यासाठी कामी येतात. व्यसन प्रतिबंधक केंद्र आणि स्वयंसहाय्यता गटात अशा व्यक्तीला सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे.

तंत्रज्ञान व्यसनाधिनांना बरे करणारे केंद्र

बंगळुरूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्युरो-सायन्स (NIMHANS) यांनी २०१४ साली तंत्रज्ञानाच्या नियंत्रित आणि आरोग्यदायी वापरासाठी एक सेवा सुरू केली, त्याला एसएचयुटी क्लिनिक असे नाव दिले. भारतातील हे पहिले असे आरोग्य केंद्र आहे, जिथे तंत्रज्ञानाशी निगडित मानसिक आरोग्यावर काम केले जाते. क्लिनिक सुरू करताच दर आठवड्याला डिजिटल गेमिंगचे व्यसन असलेले तीन ते चार रुग्ण उपचारासाठी येत होते. आता ही संख्या वाढली असून आठवड्याला २० ते २५ रुग्ण उपचारासाठी येतात, अशी माहिती डॉ. मनोज शर्मा यांनी अल जझिरा या संकेतस्थळाशी बोलताना दिली. क्लिनिकल सायकोलॉजीचे प्राध्यापक असलेले डॉ. शर्मा एसएचयुटी क्लिनिकचे प्रमुख आहेत.

ऑनलाइन गेमिंग आणि गॅम्बलिंगच्या व्यसनाबाबत बोलत असताना डॉ. शर्मा म्हणाले की, हल्लीचे विद्यार्थी जेवढ्या सहजतेने त्यांच्या शिक्षणाशी निगडित असलेले ॲप्स वापरतात, तेवढ्याच सहजतेने ते गेमिंग, गॅम्बलिंग करतात. अनेक मुलांना ते याचे बळी पडत आहेत याची सुतराम कल्पना नसते. अनेक पालक मुलांना उपचारासाठी घेऊन येतात, पण आपल्याला अमूक एखाद्या ॲपचे व्यसन लागले आहे, हे मान्य करायलाच बराच वेळ निघून जातो.

काही लोकांच्या मते, फँटसीसारख्या गेममध्ये पैशांऐवजी पॉईंट्स द्यायला हवेत. जेणेकरून विजेत्याला जिंकण्याचा आनंदही मिळेल आणि ज्यांना केवळ गेम खेळण्याचा छंद आहे, तेच लोक यात सहभागी होतील आणि जुगारामुळे आर्थिक नुकसानही होणार नाही. डॉ. शर्मा सांगतात की, ऑनलाइन गेमिंगवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य होणार नाही. हे क्षेत्र आता आपल्या कल्पनेपेक्षाही अधिक विस्तारले आहे. त्यामुळे निर्बंध लादण्याऐवजी प्रत्येक शहरात एसएचयुटीसारखी आरोग्य केंद्र सुरू करायला हवेत. जेणेकरून तंत्रज्ञानाशी निगडित व्यसनाधीनतेवर योग्य उपचार केले जातील.