देशभरातील वाहतूक विभागांकडून अनेकदा वाहनचालकांवर विविध कारणांमुळे कारवाई केली जात असते. उत्तर प्रदेशमध्ये सध्या जातिवाचक आणि धार्मिक स्टिकर लावलेल्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. नोएडा आणि गाझियाबाद पोलिसांनी मागच्या काही दिवसांत २,३०० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. ११ ऑगस्टपासून या प्रकारची कारवाई सुरू करण्यात आली आहे. गाडीवर कुठेही अशा प्रकारचे स्टिकर लावलेले असल्यास एक हजार रुपये आणि नंबर प्लेटवर स्टिकर लावलेले असल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे. पोलिसांनी सांगितले की, भविष्यातही अशा प्रकारची कारवाई आम्ही सुरूच ठेवणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द इंडियन एक्स्प्रेस’ने मोटार वाहन कायदा आणि मोटार वाहन नियमांचा अभ्यास करून जातिवाचक आणि धार्मिक स्टिकर लावणे गुन्हा आहे का? याचा शोध घेतला. त्यासंबंधी घेतलेला हा आढावा.

वाहन हे दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. भारतासारख्या देशात ज्यांच्याकडे वाहन आहे, ते त्याची जीवापाड जपणूक करतात. वाहन घेणे अनेकांचे स्वप्न असते. ज्यांचे स्वप्न सत्यात उतरते, ते त्याला स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानतात. हे करीत असताना मग वाहनावर वैयक्तिक विचारांचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. जातीय किंवा धार्मिक स्टिकर लावून हे वाहन कुणाचे आहे? हे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक जण वाहनांवर शेरोशायरी किंवा सुविचार लिहीत असतात; तर काही जण देवाचे फोटो लावत असतात. हा वैयक्तिक आस्थेचा विषय असला तरी मोटार वाहन कायद्यात याची परवानगी आहे का? हेही तितकेच महत्त्वाचे असते. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले असले तरी दळणवळणाची शिस्त पाळली जावी, यासाठी मोटार वाहन कायद्यात
काही तरतुदी केलेल्या आहेत. त्यादेखील पाळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यानुसार मोटार वाहन कायदा काय सांगतो, हे पाहू.

कायद्यात काय तरतूद आहे?

मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये वाहनाच्या नंबर प्लेटवर स्टिकर लावण्यासंबंधी नियमावली देण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्य सरकारांनी वाहनांवर किंवा नंबर प्लेटवर जातिवाचक आणि धार्मिक स्टिकर लावण्यासंदर्भात नियमावली केलेली आहे. उत्तर प्रदेश वाहतूक संचालनालयाने १० ऑगस्ट रोजी एक आदेश काढून वाहनांवर अशा प्रकारचे स्टिकर लावण्यास विरोध दर्शविला. त्यानंतर ११ ते २० ऑगस्टदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.

केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार, रजिस्ट्रेशन नंबर प्लेटवर स्टिकर आणि इतर लेबल लावण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या कायद्यातील कलम ५० नुसार, “नंबर प्लेट ही मजबूत व एक एमएमची ॲल्युमिनियम प्लेट असावी आणि प्लेटच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात निळ्या रंगात ‘IND’ असे लिहावे”, असे सांगितले गेले आहे.

जर नंबर प्लेट नियमानुसार नसेल किंवा त्याच्यावर इतर काही लेबल चिकटवलेले असतील, तर याच कायद्याच्या कलम १९२ नुसार, नंबर प्लेटशी निगडित नियमांचे पालन न केल्याच्या कारणास्तव पहिल्यांदा पाच हजार रुपयांचा दंड आणि जर अशाच प्रकारचा गुन्हा पुन्हा केल्यास एक वर्षापर्यंतची कैद आणि १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

जर वाहनाच्या इतर भागावर स्टिकर लावलेले असल्यास मोटार वाहन कायद्याच्या कलम १७९ नुसार पोलिस
चलन फाडून कारवाई करू शकतात. या कलमातील तरतुदीनुसार, “आदेशाची अवज्ञा करणे, अटकाव करणे व माहिती नाकारणे” याबद्दल पोलिस कारवाई करू शकतात.

“जो कोणी, एखादा निदेश देण्याची शक्ती प्रदान झालेल्या कोणत्याही व्यक्तीने किंवा प्राधिकरणाने कायदेशीरपणे दिलेल्या कोणत्याही निदेशाची, या अधिनियमाखाली अवज्ञा करील, अथवा या अधिनियमाखाली अशा व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला जी कार्ये पार पाडावी लागतात किंवा जी कार्ये करण्याची शक्ती प्रदान झालेली आहे, अशी कोणतीही कार्ये पार पाडताना त्यांना अटकाव करील तो अशा अपराधाबद्दल अन्य कोणत्याही शास्तीचा उपबंध केलेला नसल्यास, पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रवदंडास पात्र ठरेल”, अशी कलम १७९ ची व्याख्या करण्यात आली आहे.

कलम १७९ मध्ये जरी ५०० रुपयांच्या दंडाची तरतूद केली असली तर २०१९ साली मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता हा दंड २००० रुपये एवढा करण्यात आला आहे.