देशात करोनाच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे तिसरी लाट आली आहे. रुग्णसंख्या हळूहळू ओसरू लागली आहे. त्यातच ओमायक्रॉन होऊन गेलेल्या रुग्णाला परत ओमायक्रॉन होऊ शकतो का, यासंदर्भात डॉक्टरांनी खुलासा केला आहे. अलीकडेच दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दोन ज्युनिअर डॉक्टरांना ओमायक्रॉनमधून बरे झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात पुन्हा करोनाची लागण झाली. दरम्यान, या डॉक्टरांना पुन्हा ओमायक्रॉनची लागण झाली की हा दुसरा व्हेरियंट आहे, याबद्दल चाचणी सुरू आहे.
ओमायक्रॉनची लागण पुन्हा होऊ शकते का, असं विचारल्यानंतर मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. बैश्य इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, “अशी शक्यता आहे की जर रुग्णाला ओमिक्रॉन व्हेरियंटपासून कमी किंवा मध्यम पातळीचा संसर्ग झाला असेल, तर रुग्णाने या प्रकाराविरूद्ध निर्माण केलेली प्रतिकारशक्ती खूप चांगली नसते आणि त्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. तर, बरे झाल्यानंतर लोकांना पुन्हा संसर्ग का होत आहे, याबाबत अधिक मूल्यमापन करणे आवश्यक आहे,” असं त्यांनी सांगितलं.
सर गंगा राम हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. धीरेन गुप्ता म्हणाले, “करोना पॉझिटिव्ह आलेल्या काही रुग्णांना दोन ते चार आठवड्यांनी पुन्हा कोरोनासारखी लक्षणे दिसू लागली आहेत. याची संख्या खूप कमी आहे. परंतु हे पुन्हा कोरोनाचंच संक्रमण आहे की इतर काही आजार आहे, अद्याप स्पष्ट नाही. नाकात मृत विषाणू कायम राहिल्याने RT-PCR चा निकाल पॉझिटिव्ह येऊ शकतो. त्यामुळे एपिडेमियोलॉजिस्टने या रुग्णांची चौकशी करून योग्य निष्कर्ष काढला पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, “सध्याच्या पुराव्यांवर आधारित, कोविड री-इन्फेक्शन म्हणजे आरटी-पीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आणि पहिल्या संसर्गानंतर तीन महिन्यांनी लक्षणे पुन्हा दिसणे अशी व्याख्या केली जाते. अशा प्रकारे, वरील घटनेचे स्पष्टीकरण केले जाऊ शकत नाही. आपल्याला लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला ओमायक्रॉन होऊन गेला असेल तर पुन्हा होणार नाही, असा विचार करू नये.”
ओमायक्रॉनचा BA.2 हा सब-व्हेरियंट काही भारतीय शहरांमध्ये हळूहळू BA.1 ची जागा घेत आहे, हे दोन्ही व्हेरियंट लसीच्या प्रभावाखाली टिकून राहण्यासाठी लढत आहेत, असं दिसून आलंय. BA.2 हा BA.1 पेक्षा अधिक संक्रमणक्षम आहे, असा अंदाज लावला गेला आहे.
तज्ज्ञांच्या मते, लसीकरण न केलेल्या व्यक्तीला पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांपेक्षा BA.2 सब व्हेरियंटची लागण झालेल्या व्यक्तीकडून करोना होण्याची शक्यता १० टक्के जास्त असते. तर, लसीकरण न केलेल्या व्यक्तीलाही हा संसर्ग होण्याची शक्यता २० टक्के जास्त असते. ज्या व्यक्तीला लसीचा बूस्टर डोस मिळाला आहे त्या व्यक्तीला BA.2 लागण होण्याची शक्यता पूर्ण लसीकरण केलेल्या व्यक्तीपेक्षा २० टक्के कमी असते.