कर्करोग हा आजार संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर आव्हान आहे. भारतात हजारो लोक या आजाराला तोंड देत आहेत. या आजारावरील उपचार खर्चिक असल्यामुळे अनेक रुग्ण धास्तावतात. मात्र, या रोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर विजय मिळवणे शक्य होते. भारतात महिलांनादेखील हा आजार जडण्याचे प्रमाण बरेच आहे. महिलांना होणाऱ्या कॅन्सरवर भाष्य करणारा लॅन्सेट कमिशनने एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात भारतातील महिलांचा कॅन्सरमुळे होणारा मृत्यू तसेच त्याची कारणे, याबाबत भाष्य करण्यात आले आहे. कर्करोगाचे वेळीच निदान झाले असते, तर कर्करोग झालेल्या साधारण ६३ टक्के भारतीय महिलांचा प्राण वाचला असता, असे या अहवलात सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक का आहे? हे मृत्यू होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यायला हवी? तज्ज्ञांचे मत काय आहे? हे जाणून घेऊ या…
६३ टक्के महिलांचा मृत्यू टाळता आला असता
लॅन्सेट कमिशनने आपल्या या अहवालाला ‘वुमन, पॉवर अँड कॅन्सर’ असे नाव दिले आहे. या अहवालानुसार कर्करोगाची वेळेवर तपासणी झाली असती, वेळेवर निदान झाले असते, तर भारतात साधारण ६३ टक्के महिलांचा मृत्यू टाळता आला असता. तसेच कर्करोग झालेल्या भारतातील महिलांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते तर त्यांचेही प्राण वाचवता आले असते. तसेच भारतात कर्करोगामुळे झालेले महिलांचे साधारण ६९ लाख मृत्यू टाळता येण्याजोगे होते. त्यातील साधारण चार दशलक्ष कर्करोगग्रस्त महिलांवर यशस्वी उपचार करता आले असते, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
एकूण मृत्यूमध्ये महिलांचे प्रमाण ४४ टक्के
महिलांना होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण हे दुर्लक्ष न करण्यासारखे आहे. कर्करोगामुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. जागतिक पातळीवर कर्करोगाच्या नव्या प्रकरणात महिला रुग्णांचे प्रमाण हे ४८ टक्के आहे, तर कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूमध्ये महिलांचे प्रमाण हे ४४ टक्के आहे. महिलांमध्ये आढळणारा गर्भाशयाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग यावर उपचार करणे शक्य आहे.
महिलांचा मृत्यूदर अधिक का?
या अहवालात कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक का आहे, याबाबत सांगितले आहे. महिलांना वेळेवर तसेच योग्य उपचार मिळण्यास उशीर होतो. महिलांकडे आर्थिक तसेच अन्य निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. तसेच उपचारांची घराजवळ सोय नसते. या सर्व कारणांमुळे महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जगातील कोणत्याही भागातील महिलांकडे सर्वंकश निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर महिलांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.
तज्ज्ञांचे मत काय?
नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिषेक शंकर यांनी महिलांना होणाऱ्या कर्करोगाबाबत अधिक माहिती दिली. “कर्करोग आणि त्यावरील उपचार याबाबतची स्थिती महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी आहे. गरीब वर्गातील महिलांबाबतीत हा भेद प्रामुख्याने जाणवतो. तंबाखू, धूर यामुळे कर्करोग होण्याची शक्यता महिला आणि पुरुष अशा दोघांमध्येही सारखीच आहे. मात्र, तरीदेखील उपचाराच्या बाबतीत पुरुषांनाच जास्त महत्त्व दिले जाते. याच कारणामुळे कर्करोगावरील उपचारांच्या बाबतीत महिलांची स्थिती तुलनेने अधिक बिकट आहे,” असे डॉ. शंकर म्हणाले.
स्तनांचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त
कर्करोगावरील उपचार आणि प्रतिबंध याविषयी बोलताना सामाजिक बदल होणे गरजेचे आहे, अशी भावना डॉ. शंकर यांनी व्यक्त केली. “महिलांमध्ये स्तनांचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. याच कारणामुळे कदाचित महिला डॉक्टरांकडे जाणे टाळतात. पुरुष डॉक्टरांकडून त्या उपचार घेणे टाळतात. महिला डॉक्टर असल्या तरच महिला जननेंद्रियांची तपासणी करू देतात. परिणामी कधीकधी उपचारास उशीर होतो,” असेही डॉ. शंकर यांनी सांगितले.
कर्करोगाच्या निदानासाठी उपचार, चाचण्यांसाठी महिलांना जिल्ह्यातील, राज्याच्या राजधानीत किंवा अन्य मोठ्या शहरांत जावे लागते, त्यामुळेदेखील उपचारांना उशीर होतो. परिणामी रुग्णांना वाचवणे अशक्य होऊन बसते, असेही डॉ. शंकर यांनी सांगितले.
तपासणीला एवढे महत्त्व का?
महिलांमध्ये स्तनांचा तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. दिलासादायक बाब म्हणेज अशा प्रकारचा कर्करोग झाल्यास त्यावर उपचार करता येतो. रुग्ण पूर्णपैकी बरा होऊ शकतो. याबाबत स्त्रीरोगशास्त्राच्या प्राध्यापक आणि सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टर सरिता शामसुंदर यांनी अधिक माहिती दिली आहे. “कर्करोग शेवटच्या टप्प्यात गेल्यानंतर महिला रुग्णालयात उपचारासाठी येतात. स्तनांचा तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्राथमिक स्तरावर असला तरीदेखील चाचणीच्या माध्यमातून त्याचे निदान होऊ शकते. प्रत्येक महिन्यात महिलांना स्वत:च्या स्तनांची तपासणी करायला हवी. दरवर्षी महिलांनी डॉक्टरांकडे तपासण्या करून घ्यायला हव्यात. ४० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी वर्षातून एकदा मॅमोग्राफी करणे गरजेचे आहे”, असे डॉ. सरिता यांनी सांगितले.
महिलांनी एचपीव्ही टेस्ट करून घेणेही गरजेचे
कर्करोगाप्रमाणे काही लक्षणे दिसल्यास महिलांनी तत्काळ डॉक्टरांकडे संपर्क साधायला हवा, असेही त्या म्हणाल्या. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाबाबतही त्यांनी अधिक माहिती दिली. २५ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांनी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी करण्यासाठी ‘पॅप स्मियर टेस्ट’ करून घ्यावी. बहुतांशवेळा गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) कारणीभूत ठरतो. त्यामुळे एचपीव्ही टेस्ट करून घेणेही गरजेचे आहे. पाच किंवा दहा वर्षांतून एकदा ही चाचणी करून घ्यावी, असे डॉ. सरिता म्हणाल्या.
महिलांमधील कर्करोगाला रोखण्यासाठी सरकार काय करू शकते?
कर्करोगामुळे महिलांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी सरकारदेखील महत्त्वाची भूमिका बजावू शकते. याबाबत डॉ. शंकर यांनी सविस्तर सांगितले आहे. कर्करोगाविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. ही जागृती निर्माण झाल्यास महिला कर्करोगाची चाचणी करण्यासाठी पुढे येतील, असे डॉ. शंकर म्हणाले. “करोना महासाथीच्या काळात सरकारने करोना प्रतिबंधक लसीचे महत्त्व पटवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या जनजागृतीमुळे लोक लस घेण्यासाठी पुढे आले. हीच बाब कर्करोगाच्या बाबतीतही व्हायला हवी. कर्करोगाविषयी लोकांना समजले, तर ते चाचणी करण्यासाठी पुढे येतील”, असे शंकर म्हणाले.
२५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींचे लसीकरण व्हायला हवे
एचपीव्ही लसीमुळे महिलांमधील कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकते. याबाबत डॉ. शामसुंदर यांनी सांगितले आहे. “एचपीव्ही विषाणूमुळे महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो. मात्र, एचपीव्ही विषाणूचा हल्ला रोखणारी लस घेतल्यास हा आजार होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपण त्यासाठी एक स्वदेशी लसही विकसित केलेली आहे. तरुण मुलींना ही लस देण्याचा सरकारचा विचार आहे. लैंगिक क्रियाकलपांमध्ये पडण्याआधी २५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींना ही लस द्यावी लागते. या लसीमुळे एचपीव्ही विषाणू महिलांच्या शरीरात जात नाही”, असे डॉ. शामसुंदर यांनी सांगितले.
कर्करोगावर उपचार घेताना अनेक अडचणी येतात
प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्रांवर कर्करोगाविषयीच्या तपासण्या केल्यास महिलांना लवकर उपचार मिळू शकतो, असेही डॉ. शामसुंदर म्हणाल्या. “कर्करोगावर उपचार घेताना अनेक अडचणी येतात. रुग्णाला अनेकदा रुग्णालयाला भेट द्यावी लागते. रुग्णालय दूर असल्यामुळे डॉक्टरांकडे जाणे डोकेदुखी वाटायला लागते. मात्र, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सेसच्या (योग्य प्रशिक्षण दिलेल्या नर्सेस) मदतीने उपचार केले जाऊ शकतात. बांगलादेशमध्ये हीच पद्धत वापरली जाते,” असे डॉ. शामसुंदर म्हणाल्या.
अहवालातील शिफारसी काय आहेत?
कर्करोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी लिंगाधारित माहिती नियमित जमा करणे गरजेचे आहे. कर्करोगाची जोखीम कमी करण्यासाठी धोरण आणखी कडक करण्याची गरज आहे. तसेच अशा धोरणांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. कर्करोगावर अभ्यास करण्यामध्ये पुरुषांचेच प्रमाण जास्त आहे. कोणत्या बाबींवर अभ्यास करणे गरजेचे आहे, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे, कोणत्या क्षेत्राला आर्थिक मदत पुरवणे गरजेचे आहे याबाबतचे निर्णय पुरुषच घेतात. त्यामुळे अशा ठिकाणी महिलांना समान संधी मिळणे गरजेचे आहे, अशा शिफारसी या अहवालात करण्यात आल्या आहेत.