बुद्धिबळातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘कॅन्डिडेट्स’ म्हणजेच आव्हानवीरांच्या स्पर्धेला ३ एप्रिलपासून टोरंटो, कॅनडा येथे प्रारंभ होणार आहे. यंदाची स्पर्धा भारतासाठी खूपच खास ठरणार आहे. प्रथमच एकापेक्षा अधिक भारतीय बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभाग नोंदवतील. खुल्या विभागातील आठपैकी तीन, तर महिला विभागातील आठपैकी दोन बुद्धिबळपटू भारतीय असतील. त्यामुळे भारतीय बुद्धिबळाची सामर्थ्य दाखवणारी अशी ही स्पर्धा ठरू शकेल. या स्पर्धेचे स्वरूप कसे असेल आणि मुळात ही स्पर्धा इतकी प्रतिष्ठेची का मानली जाते, याचा आढावा.
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा इतकी प्रतिष्ठेची का?
‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेतील विजेत्या बुद्धिबळपटूला जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सध्याच्या जगज्जेत्याला आव्हान देण्याची संधी मिळते. सध्या पुरुषांमध्ये डिंग लिरेन आणि महिलांमध्ये जू वेन्जून हे चीनचे बुद्धिबळपटू जगज्जेते आहेत. या दोघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळवण्यासाठी ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागात प्रत्येकी आठ बुद्धिबळपटू आपले सर्वस्व पणाला लावतील.
हेही वाचा : विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
या स्पर्धेचे स्वरूप कसे असेल?
यंदाची ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धा ३ ते २२ एप्रिल या कालावधीत टोरंटोतील ‘द ग्रेट हॉल’ या ठिकाणी खेळवली जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच खुल्या आणि महिला विभागातील सामने एकाच ठिकाणी होणार आहेत. ३ एप्रिलला स्पर्धा सुरू होणार असली, तरी पहिल्या दिवशी केवळ उद्घाटन समारंभ असेल. ४ एप्रिलपासून सामन्यांना सुरुवात होईल. खुल्या विभागातील आठ बुद्धिबळपटू एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन असे एकूण १४ डाव खेळतील. प्रत्येक बुद्धिबळपटूला अन्य सात बुद्धिबळपटूंविरुद्ध एकदा पांढऱ्या मोहऱ्यांनी आणि एकदा काळ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळेल. महिला विभागातील स्पर्धाही अशाच पद्धतीने खेळवली जाईल. चौथ्या, सातव्या, १०व्या आणि १२व्या फेरीनंतर विश्रांतीचा दिवस असेल. १४ फेऱ्यांअंती सर्वाधिक गुण असलेला बुद्धिबळपटू विजेता ठरेल. मात्र, पहिल्या स्थानासाठी दोन बुद्धिबळपटूंमध्ये बरोबरी असल्यास १४व्या फेरीनंतर ‘टायब्रेकर’ खेळवला जाईल. यात बाजी मारणारा बुद्धिबळपटू जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीसाठी पात्र ठरेल.
भारताचे कोणते बुद्धिबळपटू?
पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदच्या आधी किंवा नंतर भारतीय बुद्धिबळपटू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरू शकले नव्हते. यंदा मात्र एकाच वेळी तब्बल पाच भारतीय बुद्धिबळपटूंना ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळवण्यात यश आले आहे. खुल्या विभागात विदित गुजराथी (वय २९ वर्षे), आर. प्रज्ञानंद (१८ वर्षे), आणि डी. गुकेश (१७ वर्षे), तर महिलांमध्ये कोनेरू हम्पी (३६ वर्षे) आणि आर. वैशाली (२२ वर्षे) असे विक्रमी पाच भारतीय ग्रँडमास्टर यंदा ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळताना दिसतील. भारतीय बुद्धिबळाने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली आहे. आता या पाच जणांपैकी कोणाला ‘कॅन्डिडेट्स’ जिंकण्यात यश आल्यास भारतीय बुद्धिबळाचे वर्चस्व अधोरेखित होईल.
हेही वाचा : विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?
अन्य कोणत्या बुद्धिबळपटूंचा सहभाग?
‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याचे विविध निकष आहेत. त्यांच्या आधारे दोन्ही विभागांसाठी प्रत्येकी आठ बुद्धिबळपटू पात्र ठरतात. यंदा खुल्या विभागात तीन भारतीयांव्यतिरिक्त गेल्या दोन जागतिक लढतीतील उपविजेता रशियाचा इयन नेपोम्नियाशी, अमेरिकेचे फॅबियानो कारुआना आणि हिकारू नाकामुरा, अझरबैजानचा निजात अबासोव, फ्रान्सचा अलिरेझा फिरूझा हे बुद्धिबळपटू खेळताना दिसतील. महिला विभागात हम्पी, वैशालीसह चीनच्या ले टिंगजी आणि टॅन झोंगी, रशियाच्या कॅटेरीना लायनो आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना, बल्गेरियाची नुरग्युल सलिमोवा आणि युक्रेनची ॲना मुझिचुक यांचा सहभाग असेल. रशियाचे बुद्धिबळपटू या स्पर्धेतही ‘फिडे’च्या ध्वजाखाली खेळतील.
कोणते बुद्धिबळपटू कशा प्रकारे पात्र ठरले?
(खुला विभाग) –
इयान नेपोम्नियाशी : २०२३च्या जागतिक लढतीचा उपविजेता
आर. प्रज्ञानंद : २०२३च्या विश्वचषकाचे उपविजेतेपद
फॅबियानो कारुआना : २०२३च्या विश्वचषकात तिसरे स्थान
निजात अबासोव : २०२३च्या विश्वचषकात चौथे स्थान
विदित गुजराथी : २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेचे जेतेपद
हिकारू नाकामुरा : २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेत दुसरे स्थान
अलिरेझा फिरूझा : सर्वोत्तम रेटिंग
डी. गुकेश : २०२३च्या ‘फिडे’ सर्किटचा विजेता
हेही वाचा : विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
(महिला विभाग) –
ले टिंगजी : २०२३च्या जागतिक अजिंक्यपद लढतीची उपविजेती
आर. वैशाली : २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेचे जेतेपद
टॅन झोंगी : २०२३च्या ग्रँड स्विस स्पर्धेत दुसरे स्थान
कॅटेरीना लाग्नो : २०२२-२३ महिला ग्रांप्रीचे जेतेपद
अलेक्झांड्रा गोर्याचकिना : २०२२-२३ महिला ग्रांप्रीचे उपविजेतेपद
नुरग्युल सलिमोवा : २०२३च्या विश्वचषकात दुसरे स्थान
ॲना मुझिचुक (युक्रेन) : २०२३च्या विश्वचषकात तिसरे स्थान
कोनेरू हम्पी : सर्वोत्तम रेटिंग
मॅग्सन कार्लसनने सहभागास नकार का दिला?
विश्वातील सर्वोत्तम बुद्धिबळपटू आणि पाच वेळचा जगज्जेता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन गेल्या वर्षीची विश्वचषक स्पर्धा जिंकून ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरला होता. मात्र, जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीचे स्वरूप आणि वेळमर्यादा याबाबत नाखुश असल्याने कार्लसनने ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्याची संधी धुडकावून लावली. त्याने गेल्या वर्षीही जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याला जगज्जेतेपद सोडावे लागले होते. यंदा त्याने माघार घेतल्यामुळे विश्वचषकात चौथे स्थान मिळवलेल्या निजात अबासोवला ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
हेही वाचा : X वरचा Click here ट्रेंड काय आहे? त्यावर टीका कशासाठी?
विजेत्यांना किती रक्कम मिळणार?
खुल्या विभागातील विजेता ४८ हजार युरोचे (अंदाजे ४३ लाख रुपये) पारितोषिक आपल्या नावे करेल. दुसऱ्या क्रमांकासाठी ३६ हजार युरो (अंदाजे ३२ लाख रुपये) आणि तिसऱ्या क्रमांकासाठी २४ हजार युरो (अंदाजे २१ लाख रुपये) मिळतील. याव्यतिरिक्त, प्रत्येक अर्ध्या गुणासाठी खेळाडूंना ३,५०० युरो (अंदाजे ३ लाख रुपये) मिळतील. महिला विभागातील विजेत्यांना याच्या अर्धी रक्कम मिळेल. म्हणजेच जेतेपद पटकावणारी खेळाडू २४ हजार युरोचे पारितोषिक मिळवेल.