ऑस्कर्स सन्मानचिन्हाचा इतिहास काय आहे ?
सोन्याचा वर्ख असलेले उभ्या आकारातील सन्मानचिन्ह प्राप्त करणे हे दृकश्राव्य माध्यमातीलप्रत्येकाचे स्वप्न असते. साडेतेरा इंचांचे सोनेरी रंगातील हे सन्मानचिन्ह जगातील सुप्रतिष्ठित असा सन्मान आहे. पण मुळात ते कुणाच्या कल्पनेतून आकाराला आले आणि त्याची दृश्यसंकल्पना कुणी प्रत्यक्षात आणली?
आणखी वाचा : विश्लेषण: सौदी अरेबिया आणि इराणमधील कराराने तणाव निवळणार? चीनच्या यशस्वी मध्यस्थीमुळे अमेरिकेला किती धक्का?
साडेतेरा इंच उंचीचे सोनेरी रंगातील सन्मानचिन्ह हाच जगासमोरचा ऑस्करचा बहुपरिचित असा चेहरा आहे. हा पुरस्कार स्वीकारतानाचे आपले छायाचित्र जगभरात पोहोचावे, या सन्मानचिन्हाने आपल्या डेस्कवर जागा पटकवावी, अशी अनेकांची मनीषा असते. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात अकॅडमी अॅवॉर्ड्सची ही बहुचर्चित सोनेरी बाहुली तब्बल २४ कर्तृत्ववान कलावंतांच्या हाती विसावली… सर्वोत्कृष्ट माहितीपट-लघुपटासाठी कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांना ‘द एलिफंट व्हिस्परर’साठी तर एसएस राजमौली यांच्या ‘ट्रिपल आर’ला ‘नाटू नाटू’ या गाण्यासाठी बेस्ट ओरिजिनल साँगसाठीचा ऑस्कर मिळाला. त्या निमित्ताने हे सन्मानचिन्ह कुणी डिझाईन केले आणि कुणी साकारले, त्याचे ऑस्कर असे नामकरण कुणी केले आदी प्रश्नांचा घेतलेला हा शोध.
आणखी वाचा : विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
हे सन्मानचिन्ह कुणी डिझाईन केले?
१९२७ साली अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेसची स्थापना झाल्यानंतर लॉस एंजेलिसमधील बिल्टमोर हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. यामध्ये वार्षिक पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमजीएमचे प्रसिद्ध कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स याने तिथलाच एक रुमाल घेऊ फिल्मच्या रिल्सवर तलवारीसह सज्ज असलेल्या लढवय्याचे रेखाटन केले. तलवारीचे टोक खालच्या दिशेला आहे. त्यानंतर अमेरिकन शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ली त्याने ते डिझाईन प्रत्यक्षात आणताना पाच रिल्सवर त्या लढवय्याला उभे केले. ही पाच रिल्स सिनेमाची अभिनेता- कलावंत, दिग्दर्शक, निर्माता, तंत्रज्ञ आणि लेखक अशा पाच अंगांचे प्रतिनिधित्व करतात, असा संकल्पनेचा आशय त्या शिल्पकृतीला प्राप्त करून दिला. प्रसिद्ध मेक्सिकन अभिनेता आणि निर्माता एमिलियो फर्नांडिस याने सांगितले की, १९२० साली हॉलीवूडमध्ये असताना त्याने या शिल्पकृतीसाठी मॉडेल म्हणून काम केले. अर्थात हा दावा ना अकादमीने स्वीकारला, ना कधी नाकारला!
आणखी वाचा : विश्लेषण: मार्च महिना एवढा दाहक का ठरत आहे?
पहिले सन्मानचिन्ह कसे तयार झाले?
पहिले सन्मानचिन्ह हे साडेतेरा इंच उंचीचे आणि ८१/२ पौंड वजनाचे होते. ब्रॉन्झमध्ये साकारलेल्या या शिल्पकृतीला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता. नंतर मात्र त्यासाठी ब्रिटानिया मेटलचा वापर करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर धातू मिळेनासा झाल्यानंतर त्या तीन वर्षांच्या कालखंडात पेंटेंड प्लास्टरचा वापर करण्यात आला. मात्र नंतर पुन्हा सोन्याचा मुलामा दिलेल्या धातूमध्येच सन्मानचिन्ह साकारण्यात आले.
आणखी वाचा : विश्लेषण : लष्करात दोषींना शिक्षा कशी ठोठावली जाते? चौकशी कशी होते? जाणून घ्या
याचे ऑस्कर असे नामकरण कुणी केले?
मुळात या पुरस्काराचे नाव ‘अकॅडमी अॅवॉर्ड ऑफ मेरिट’ असे आहे, मात्र तो ऑस्कर या नावाने ओळखला जातो आणि १९३९ सालापासून अकॅडमीनेही त्याचे ऑस्कर हे नाव स्वीकारल्याचा इतिहास आहे. ऑस्कर या नावाची कूळकथा माहीत नाही, मात्र असे सांगितले जाते की, अकॅडमीचे ग्रंथपाल मार्गारेट हेर्रिक यांनी हे सन्मानचिन्ह पाहताच उद्गार काढले की, ही शिल्पकृती हुबेहूब त्यांचे काका ऑस्कर यांच्यासारखी दिसते. १९३४ साली तर हॉलीवूडचे स्तंभलेखक असलेल्या सिड्नी स्कोल्स्की यांनी कॅथरीन हेपबर्न यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला त्या वेळेस त्याचा उल्लेख ऑस्कर असा केल्याचा संदर्भ सापडतो.
या पुरस्काराच्या सन्मानचिन्हाची निर्मिती कशी आणि कुठे केली जाते?
सुरुवातीस इलिनॉइसमधील बताविया येथे सीडब्लू शमवे अॅण्ड सन्स या भट्टीमध्ये त्याचे ओतकाम करण्यात आले. १९८२ साली ते काम शिकागोच्या आरएस ओवेन्स अॅण्ड कंपनीला मिळाले. तर २०१६ सालापासून न्यू यॉर्कच्या रॉक ताव्रेन येथे तब्बल एक लाख चौरस फुटांमध्ये पसरलेल्या पोलिच टॅलिक्स फाइन आर्ट फाउन्ड्रीमध्ये सन्मानचिन्हाचे काम करण्यास सुरुवात झाली. थ्रीडी प्रिंटरच्या माध्यमातून डिजिटल ऑस्कर साकारण्याची ही प्रक्रिया सुमारे तीन महिने सुरू असते.
असे तयार होते सन्मानचिन्ह…
प्रथम त्यावरील शिल्पकृतीचा साचा तयार करण्यात येतो. त्यासाठी मेण वापरले जाते. मेणातील शिल्पकृतीवर नंतर सिरॅमिकचे आवरण चढविण्यात येते. काही आठवड्यांनंतर ते १६०० अंश सेल्सिअसला तापविले जाते. त्यानंतर वितळवलेल्या ब्रॉन्झच्या मदतीने प्रत्यक्ष शिल्पकृती साकारली जाते. ती थंड झाल्यावर पॉलिश करून नंतर ब्रुकलिन येथील एप्नेर टेक्नॉलॉजीजमध्ये त्यावर २४ कॅरेटमधील सोन्याचा मुलामा चढवण्यासाठी पाठविली जाते. प्रतिवर्षी केवळ २४ पुरस्कारच दिले जात असले तरी सन्मानचिन्हे मात्र ५० तयार केली जातात. काही वेळेस पुरस्कार विभागूनही दिला जातो. किंवा काही वेळेस एकाच गटात विजेत्यांची संख्याही अधिक असते.
प्रत्यक्षात या सन्मानचिन्हाची किंमत किती आहे?
सन्मानचिन्हाच्या निर्मितीसाठी प्रत्येकी ४०० अमेरिकन डॉलर्सचा खर्च येत असला तरी अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेसच्या नियमनानुसार विजेते किंवा इतर कुणालाही या सन्मानचिन्हाची बाजारात विक्री करण्याचा अधिकार नाही. विक्रीच करायची असेल तर ती एक डॉलर या किमतीला अकॅडमीलाच करावी लागते.
असे म्हणतात की, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला ऑस्कर पुरस्कार चक्क एका कुत्र्यालाच मिळणार होता. हे खरे आहे का?
हो, हे खरे आहे. पहिल्या महायुद्धामध्ये युद्धभूमीवरच एक जर्मन शेफर्ड कुत्रा अमेरिकन सैनिकाला सापडतो. त्या सैनिकाशी नंतर त्याचे जिवाभावाचे मैत्र जडते. ‘रिन टिन टिन : द लाइफ अॅण्ड लीजंड’च्या माध्यमातून सुसान ओर्लिअन यांनी त्याचे दस्तावेजीकरण केले. त्या कुत्र्याच्या प्रेमात सारे जग पडले. आणि ती भूमिका साकारणाऱ्या कुत्र्यालाच १९२९ साली सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठीची सर्वाधिक नामनिर्देशने मिळाली. पण कुत्र्याला पुरस्कार देण्यास अकॅडमीने विरोध केला आणि मग नामनिर्देशनाची दुसरी फेरी पार पडली. त्या फेरीत एमिल जेनिंग या जर्मन अभिनेत्यास तो पुरस्कार मिळाला.
सर्वाधिक ऑस्कर्स कुणाला मिळाली?
आजवर सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार वॉल्ड डिस्ने यांना मिळाली आहेत, तब्बल २६ ऑस्कर्स. त्यानंतरचे सर्वाधिक आठ ऑस्कर पुरस्कार अमेरिकन वेशभूषाकार एडिथ हेड यांना मिळाले.