भारतीय लष्करातील कॅप्टन अंशुमन सिंह यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या आई आणि पत्नी स्मृती सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारताना त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचदरम्यान एका वापरकर्त्याने स्मृती सिंह यांच्याविरोधात अश्लील टिप्पणी केली आणि नव्या वादाला तोंड फुटले. स्मृती सिंह यांच्या राष्ट्रपती भवनातील एका छायाचित्रावर ही टिप्पणी करण्यात आली होती.
संतप्त सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अश्लील टिप्पणी करणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला आयोगानेही (एनसीडब्ल्यू) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. “एनसीडब्ल्यू या वर्तनाचा निषेध करते आणि तत्काळ पोलीस कारवाईची विनंती करते,” असे आयोगाने ‘एक्स’वर लिहिले. नेमके हे प्रकरण काय? कोण आहेत कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी? जाणून घेऊ.
हेही वाचा : संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
सियाचीनच्या आगीत अंशुमन शहीद
गेल्या जुलैमध्ये सियाचीनमध्ये लागलेल्या भीषण आगीत अंशुमन यांचा मृत्यू झाला होता. २६ पंजाब रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेले अंशुमन हे भारतीय सैन्यात वैद्यकीय अधिकारी होते. ऑपरेशन मेघदूतदरम्यान ते सियाचीनमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, या अपघातादरम्यान अंशुमन यांनी आपल्या अनेक साथीदारांना वाचवले. ‘एनडीटीव्ही’नुसार, सियाचीनमधील भारतीय लष्कराचा दारूगोळा असलेल्या एका खोलीत १९ जुलै २०२३ रोजी शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अंशुमन यांना आग लागल्याचे दिसल्यावर त्यांनी न डगमगता आत धावत जाऊन अनेकांचे प्राण वाचवले.
मात्र, त्यानंतर आग जवळच असलेल्या वैद्यकीय तपासणी कक्षात पसरली. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, अंशुमन वैद्यकीय तपासणी कक्षात औषध आणण्यासाठी गेले असता त्यांना आपला जीव गमवावा लागला. २२ जुलै २०२३ रोजी अंशुमन यांच्यावर बिहारमधील भागलपूर येथे पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपतींच्या हस्ते कीर्ती चक्र
शुक्रवारी अंशुमन यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. हा भारताचा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे. अंशुमन यांच्या पत्नी स्मृती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना अंशुमन यांची आई मंजु सिंह आणि पत्नी स्मृती सिंह यांचे डोळे पाणावलेले दिसले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्नी स्मृती सिंह आपल्या भावना व्यक्त करताना दिसल्या. कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा नजरानजर झाली आणि त्यातच मी त्यांच्या प्रेमात पडले होते. मग आठ वर्षांच्या दीर्घ अंतराच्या नात्यानंतर आम्ही लग्न केले, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही कॉलेजच्या पहिल्या दिवशी भेटलो. मी पहिल्या नजरानजरेच्या क्षणी त्यांच्या प्रेमात पडले होते. महिनाभरानंतर त्यांची एएफएमसी (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज)मध्ये निवड झाली. आम्ही एका अभियांत्रिकी महाविद्यालयात भेटलो; पण नंतर त्यांची वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली. ते अतिशय हुशार होते. तेव्हापासून केवळ एका महिन्याच्या भेटीनंतर आम्ही आठ वर्षे एकमेकांच्या प्रेमात होतो,” असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, “मग आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने लग्नानंतर दोनच महिन्यांत त्यांची सियाचीनला पोस्टिंग झाली. येत्या ५० वर्षांत आपलं आयुष्य कसं असेल याविषयी १८ जुलै रोजी आमच्यात चर्चा झाली होती. घर कसे बांधायचे, मुलांचा जन्म अशा विविध विषयांवर आम्ही बोललो. परंतु, १९ तारखेला मी सकाळी उठले, तेव्हा मला एक फोन आला आणि सांगण्यात आले की, अंशुमन या जगात नाहीत.”
त्यांनी सांगितले, “पहिल्या सात-आठ तासांत असे काही घडले आहे हे आम्ही स्वीकारूच शकलो नाही. पण, आता माझ्या हातात कीर्ती चक्र आहे. त्यामुळे जे घडलं ते सगळं खरं आहे हे आता समजलं आहे. अंशुमन हीरो आहेत. इतर तीन लष्करी कुटुंबांना वाचवता यावं म्हणून त्यांनी आपलं जीवन आणि कुटुंबाचा त्याग केला.” त्यांच्या याच व्हिडीओ आणि छायाचित्रांवर अश्लील टिप्पणी करण्यात आली आहे.
त्वरित अटकेची मागणी
‘एनडीटीव्ही’च्या वृत्तानुसार, एनसीडब्ल्यूने सांगितले की, दिल्लीचे रहिवासी अहमद के. यांनी ही अश्लील टिप्पणी केली होती. सोमवारी जारी केलेल्या एका पत्रात, एनसीडब्ल्यूने भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७९ चे उल्लंघन करणाऱ्या विशिष्ट कायदेशीर तरतुदींचा संदर्भ दिला. त्यानुसार महिलेच्या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या हेतूने केलेल्या कृत्यांविरोधात दंड आकारला जातो आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ नुसार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य प्रकाशित किंवा प्रसारित करण्यासाठी शिक्षा केली जाते.
या कायद्यांतर्गत शिक्षेची रूपरेषा या पत्रात नमूद करण्यात आली आहे. एनसीडब्ल्यूने दिल्ली पोलिसांना त्या व्यक्तीविरुद्ध त्वरित गुन्हा नोंदवावा आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्यास सांगितले आहे. आयोगाने या प्रकरणाचा निष्पक्ष आणि वेळेवर तपास करण्याची मागणी केली असून, तीन दिवसांत सविस्तर कारवाईचा अहवाल देण्याची विनंती केली आहे.