जॉर्जियातील लोकप्रिय गुडौरी स्की रिसॉर्ट या भारतीय हॉटेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली. राजधानी तिबिलिसी येथील भारतीय मिशननुसार, कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेमुळे रिसॉर्टमध्ये १२ भारतीय मृतावस्थेत आढळून आल्याची शक्यता प्राथमिक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांचे मृतदेह परत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिबिलिसीमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, ते मृतांच्या कुटुंबीयांना शक्य ते सर्व सहकार्य देण्यास वचनबद्ध आहेत. परंतु, रिसॉर्टमध्ये नक्की काय घडले? मृत्यूमागील नेमकं कारण काय? काय आहे कार्बन मोनोऑक्साइड? याचा शरीरावर कसा आणि काय परिणाम होतो? त्याविषयी जाणून घेऊ.
जॉर्जिया स्की रिसॉर्टमध्ये घडलं तरी काय?
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोविएत प्रदेशातील सर्वांत मोठे आणि सर्वोच्च गुडौरी स्की रिसॉर्ट रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावर झोपलेले १२ भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळून आले. समुद्रसपाटीपासून सुमारे २,२०० मीटर उंचीवर असणारे हे स्की रिसॉर्ट काकेशस पर्वताच्या मत्खेटा-मटियानेती प्रदेशात वसलेले आहे. १९ व्या शतकात जॉर्जिया आणि रशियाला जोडणाऱ्या ऐतिहासिक जॉर्जियन मिलिटरी रोडवरील हे व्यापारी केंद्र होते. जॉर्जियाच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनानुसार, प्राथमिक तपासात हिंसा किंवा दुखापत झाल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. जॉर्जियाच्या मंत्रालयाने दावा केला आहे की, १२ बळींपैकी ११ परदेशी नागरिक आहेत. त्याउलट भारतीय मिशनने दावा केला की, सर्व १२ बळी भारतीय रेस्टॉरंटमधील कर्मचारी होते, जे भारतीय होते. जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाचा तपास सुरू असून, पीडितांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : एलियन की शत्रू राष्ट्रांचा धोका? रहस्यमयी ड्रोन्समुळे अमेरिकेत खळबळ; नेमकं प्रकरण काय?
मृत्यू कशामुळे झाले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांचा मृत्यू कार्बन मोनोऑक्साइडच्या विषबाधेमुळे झाला. प्राथमिक तपासणीनुसार, शयनकक्षांजवळ असलेल्या एका बंद असलेल्या आतील भागात पॉवर जनरेटर ठेवण्यात आला होता. शुक्रवारी रात्री इमारतीची वीज गेली, तेव्हा तेलावर चालणारे जनरेटर कार्यान्वित झाले आणि त्यामुळे या बळी गेलेल्यांचा श्वास कोंडला. प्रारंभिक सिद्धांतानुसार, जनरेटरच्या हानिकारक धुरामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जॉर्जियन गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, “जनरेटर झोपण्याच्या क्वार्टरजवळ एका मर्यादित ठिकाणी ठेवण्यात आला होता आणि आदल्या रात्री वीज खंडित झाल्यामुळे त्याचा वापर करण्यात येत होता. या दुर्घटनेचा व त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीचा अद्याप तपास सुरू आहे आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी काम करीत आहेत.” पोलिसांनी जॉर्जियाच्या फौजदारी संहिता, अनुच्छेद ११६ च्या अनुषंगाने तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक वैद्यकीय तपासणीद्वारे मृत्यूचे नेमके कारणदेखील निश्चित केले जाईल.
कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा म्हणजे काय?
सामान्यतः कार्बन मोनोऑक्साइडला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. कार्बन मोनोऑक्साइड हा रंगहीन, गंधहीन व चवहीन वायू आहे. जेव्हा कार्बन मोनोऑक्साइड रक्तप्रवाहात शिरतो तेव्हा कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होते. लाल रक्तपेशींमधील ऑक्सिजनमध्ये हा वायू जातो; ज्यामुळे उतींचे गंभीर नुकसान होऊ शकते किंवा मृत्यूदेखील येऊ शकतो. दरवर्षी यामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतो आणि हजारो लोक अधिक आजारी पडतात. गॅस, लाकूड, प्रोपेन किंवा चारकोल यांसारखे इंधन जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड बाहेर पडतो. विशेषतः लहान भागात जर इंजिन किंवा उपकरणे पुरेशा प्रमाणात हवेशीर नसतील, तर त्यातून निघणारा वायू जमा होऊ शकतो. उदाहरणार्थ- गॅरेजमध्ये कार चालवणे किंवा घरामध्ये चारकोल बार्बेक्यू वापरणे धोकादायक असू शकते.
कार्बन मोनोऑक्साइड विषबाधा आगीच्या धुराच्या संपर्कात आल्यानेदेखील होऊ शकते. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दावा केला आहे की, हुक्का पिणेदेखील कार्बन मोनोऑक्साइड विषबाधेच्या दुर्घटनांमध्ये वाढ होण्याशी जोडलेले आहे; विशेषत: तरुण लोकांमध्ये. कार्बन मोनोऑक्साइडसह विषबाधा कोणालाही होऊ शकते. लहान मुले, वृद्ध आणि अशक्तपणा, तीव्र हृदयरोग किंवा श्वसनाचे विकार असलेल्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. अमेरिकेत कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा सामान्य आहे. तिथे दरवर्षी ४०० पेक्षा जास्त लोक अनावधानाने झालेल्या विषबाधेमुळे आपला जीव गमावतात आणि १,००,००० पेक्षा जास्त लोकांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात येते, अशी माहिती ‘सीडीसी’ने दिली आहे.
कार्बन मोनोऑक्साइड विषबाधेची लक्षणे
अशा प्रकारची विषबाधा प्रामुख्याने हृदय आणि मेंदूवर परिणाम करते. या वायूच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यानंतर एखाद्यामध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळ किंवा उलट्या होणे, श्वास भरून येणे, दृष्टी कमकुवत होणे, तंद्री, स्नायूंवर नियंत्रण कमी होणे, चेतना गमावणे इत्यादी लक्षणांचा समावेश होतो. कार्बन मोनॉक्साईड विषबाधेतून बरे झाल्यानंतर मेंदू आणि न्यूरोलॉजिकल सिस्टीमवर परिणाम करणारी लक्षणे वृद्ध व्यक्तींना जाणवतात. त्यातील काही लक्षणे म्हणजे स्मरणशक्ती कमी होणे, व्यक्तिमत्त्वातील बदल व हालचालींत त्रास होणे. अशा प्रकारची विषबाधा विशेषत: झोपेत असलेल्या, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या किंवा औषधांच्या प्रभावाखाली असलेल्यांसाठी धोकादायक आहेत. कारण- समस्या ओळखण्याआधीच यामुळे मृत्यू किंवा मेंदूचे नुकसान होऊ शकते.
हेही वाचा : २०२५ मध्ये ‘या’ देशांतील प्रवासाचे नियम बदलणार; याचा भारतीयांवर काय परिणाम होणार?
धोका कसा कमी करता येतो?
प्रत्येक हिवाळ्यात आणि वसंत ऋतूमध्ये तुमच्या घरातील कार्बन मोनोऑक्साइड डिटेक्टरच्या बॅटरी चांगल्या पद्धतीने काम करीत आहेत की नाही, हे तपासणे आवश्यक आहे. दरवर्षी वॉटर हीटर, हीटिंग सिस्टीम आणि कोळसा, तेल किंवा वायू जळणाऱ्या इतर कोणत्याही उपकरणांची तपासणी प्रमाणित तंत्रज्ञाकडून करून घ्या. दरवर्षी तुमच्या घरातील गॅसच्या चिमणीची तपासणी करा किंवा ती स्वच्छ करा. चिमणीमध्ये काही अडथळे असल्यास घरामध्ये किंवा केबिनमध्ये कार्बन मोनोऑक्साइड जमा होऊ शकतो. कोळसा कधीही घरामध्ये जाळू नये. लाल, राखाडी, काळा किंवा पांढरा कोळसा जाळल्यावर कार्बन मोनोऑक्साइड सोडला जातो. अशी गॅस उपकरणे खरेदी करा; ज्यावर राष्ट्रीय चाचणी संस्थेचा शिक्का आहे. खिडक्या आणि दरवाजे उघडे असतानाही तुमच्या घरात किंवा गॅरेजमध्ये जनरेटर कधीही चालवू ठेवू नका. जनरेटरचा वापर फक्त घराबाहेर, खिडक्या, दारे आणि घरापासून कमीत कमी २० फूट अंतरावर करा.