ब्रिटनमधील ‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्राने महिन्याभरापूर्वी दिलेल्या एका वृत्तामुळे भारतात खळबळ उडाली होती. अपोलो हॉस्पिटल ‘कॅश फॉर किडनी’ रॅकेटमध्ये कथितकपणे गुंतलेले असल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला होता. या वृत्तानंतर भारत सरकारने या प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. म्यानमारमधील गरीब लोकांना त्यांचे मूत्रपिंड त्याच देशातील श्रीमंत रुग्णांना विकण्यासाठी आमिष दाखवले जाते अेस द टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर भारतात अवयवदानासंदर्भात काय कायदे आहेत? बेकायदेशीरपणे अवयवदान केल्यास किंवा करायला लावल्यास काय शिक्षा होऊ शकते? हे जाणून घेऊ या….
अपोलो रुग्णालयाने आरोप फेटाळले
पैशांच्या बदल्यात अवयवदान किंवा अवयवांचे प्रत्यारोपण करणे हा भारतात गुन्हा आहे. गरीब लोकांचे संरक्षण व्हावे तसेच त्यांचे शोषण होऊ नये यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. द टेलिग्राफ या वृत्तात करण्यात आलेले सर्व दावे अपोलो रुग्णालयाने खोटे असल्याचे म्हटले आहे. अधिकृत समितीने प्रत्यारोपणाची परवानगी दिल्यानंतरच आमच्या रुग्णालयात अवयवांचे प्रत्यारोपण केले जात. तसेच म्यानमार दूतावासाने अवयव दान करणारी व्यक्ती ही रुग्णाची नातेवाईक असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच आम्ही प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पाडतो, असे स्पष्टीकरण रुग्णालयाने दिलेले आहे.
दरम्यान, याआधाही कॅश फॉर किडनीची प्रकरणे समोर आलेली आहेत. बहुतांश प्रकरणात रुग्ण तसेच अवयवदान करणाऱ्या व्यक्तीमध्ये नाते असल्याचे दाखवण्यासाठी बनावट कागदपत्रांची मदत घेतली जाते.
भारतातील कायदा काय सांगतो?
भारतीय कायद्यानुसार एखाद्या मृत व्यक्तीचे वयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. मात्र त्यासाठी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची संमती आवश्यक असते. ‘द ट्रान्सप्लान्टेशन ऑफ ह्यूमन ऑरगन्स अँड टिश्यूज अॅक्ट १९९४’ या कायद्यात अवयव दानासंदर्भात वेगवेगळे नियम घालून देण्यात आलेले आहेत.
नातेवाईकांना अवयवदानास परवानगी
या कायद्यानुसार बहुतेक प्रकरणांत रुग्णांचे पालक, भावंडं, मुले, बायको किंवा नवरा, आजी-आजोबा, नातू यांच्याकडून अवयवदान करणे वैध मानले जाते. तसेच दुरच्या नातेवाईकांकडून किंवा फार काळापासून मित्र असलेल्यांनाही रुग्णासाठी अवयवदान करण्यास परवानगी दिली जाते. मात्र या अवयवदानाचा मोबदला म्हणून आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही ना, याची खात्री केली जाते.
प्रत्यारोपणाआधी सखोल चौकशी
जिंवत असलेला जवळचा नातेवाईक रुग्णाला अवयव दान करत असेल, तर रुग्ण आणि अवयव दान करणाऱ्यांत काय नाते आहे, हे अगोदर तपासले जाते. त्यासाठीच्या कादगपत्रांची छाननी केली जाते. तसेच अवयवदान करणारी व्यक्ती आणि रुग्ण यांच्यातील नाते स्पष्ट करणारे फोटोग्राफ्स तपासले जाते. तसेच रुग्ण आणि अवयवदान करणारी व्यक्ती यांची ओळख पटवली जाते. त्यांची वंशावळ शोधली जाते. या सर्व बाबींची खात्री करूनच रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकास अवयवदान करण्याची परवानगी दिली जाते. तसेच अशा प्रकरणांत अवयवदात्याला पैसे दिलेले नाहीत ना, याचीदेखील तपासणी केली जाते.
बाह्य समितीकडून तपासणी
रुग्णाशी नाते नसलेली व्यक्ती जर अवयवदान करत असेल तर विशेष तपासणी केली जाते. रुग्ण तसेच अवयवदान करणारी व्यक्ती हे दीर्घकालापासून एकमेकांना ओळखतात, त्यांच्यात मैत्री आहे का? हे शोधण्यासाठी कागदपत्रे तपासली जातात. अशा प्रकरणांत बाह्य समितीकडून तपासणी केली जाते. अवयवदानासाठी कोणतेही बेकायदेशीर काम झालेले नाही ना, याचीदेखील यावेळी तपासणी केली जाते.
दोषी आढळल्यास काय शिक्षा?
भारतीय कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला अवयवाच्या बदल्यात पैसे दिल्यास, पैशांच्या रुपात अवयवांचा पुरवठा केल्यास, अवयवांसाठी व्यक्तीचा शोध घेणे, अवयवदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी खोटी कागदपत्रे जमा करणे हे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांत दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १ कोटी रुपयांपर्यंतचा आर्थिक दंड ठोठावला जातो.
१२ हजार लोकांनाच प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळते
वेगवेगळ्या अवयवांपैकी मूत्रपिंडाची मागणी खूप आहे. भारतात दरवर्षी साधारण २ लाख रुग्ण असे असतात, ज्यांचे मूत्रपिंड निकामी झालेले असते. अशा सर्वच रुग्णांना एकतर मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करावे लागते किंवा डायलिसीस करावे लागते. मात्र या दोन लाख रुग्णांपैकी फक्त १२ हजार लोकांनाच प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड मिळते. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडाची मोठ टंचाई असते.
मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यासाठीचा खर्च परवडणारा
मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण ही फा महागडी प्रक्रिया नाही. साधारण ५ लाख रुपयांत मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करता येते. याच कारणामुळे मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. भारतात साधारण ५०० असे केंद्र आहेत, ज्या ठिकाणी मूत्रपिंड काढता तसेच त्याचे प्रत्यारोपण करता येते. परिणामी अवयवांचे प्रत्यारोपण करण्याऱ्या रुग्णांची संख्या जास्त असते.
मूत्रपिंड कार्यक्षम राहण्याचा कालावधी सर्वाधिक
मूत्रपिंड हा असा अवयव आहे जो शरीराच्या बाहेर काढल्यानंतर साधारण २३ ते ३६ तास कार्यक्षम राहू शकतो. फुफ्फूस हे फक्त ४ ते ६ तास आणि यकृत हे ८ ते १२ तास कार्यक्षम राहू शकते.
प्रत्यारोपणासाठी अवयवांची एवढी कमतरता का?
भारतात मूत्रपिंड तसेच अन्य अवयवयांची मोठी कमतरता भासते. त्यामुळे अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटवून सांगण्यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे. ब्रेनडेड झालेल्या लोकांचे अवयव दान करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. ज्या लोकांचा मेंदू मृतावस्थेत आहे, त्यांचे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरता येतात. अवयवदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सरकारकडून अवयवदान करणाऱ्या व्यक्तीची नावनोंदणी आधारकार्डच्या मदतीने केली जाते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना संबंधित व्यक्तीला अवयवांचे दान करायचे होते, हे सांगता यावे, यासाठी या आधार नंबरची मदत घेतली जाते. तरीदेखील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अवयव घेऊन त्याचे अन्य व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपण करण्याचे प्रमाण हे फक्त १६ टक्के आहे. लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यास हे प्रमाण वाढू शकते.