AGS Transact Technologies : एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर तिथे ‘नो कॅश’ असा संदेश आला, तर ग्राहकांची पार निराशा होते. सध्या अशाच प्रकारचा अनाकलनीय जाच एटीएम वापरकर्त्यांना सहन करावा लागत आहे. देशभरातील एटीएमची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या आणि त्यात रोकड भरणाऱ्या ‘AGS Transact Technologies’ या कंपनीचं कामकाज कोलमडलं आहे. परिणामी, अनेक प्रमुख बँकांच्या एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. ज्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, बँकांमधील गर्दी वाढली आहे. दरम्यान, एटीएमची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचं कामकाज कशामुळे कोलमडलं? एटीएममध्ये अजून किती दिवस पैशांचा तुटवडा जाणवणार? याबाबत जाणून घेऊ?
‘एजीएस ट्रान्झॅक्ट’चे कामकाज का कोलमडलं?
मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या बहुतांश एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला होता. यामागचं कारण म्हणजे ‘AGS Transact Technologies’ या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये रोकड भरण्यास नकार दिला. “कंपनीकडे आमचा दोन-तीन महिन्यांचा पगार थकीत असून, जोपर्यंत तो मिळणार नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नाही, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. याचा त्रास मात्र बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागतोय.
एजीएस ट्रान्झॅक्ट कंपनी बंद पडणार?
एजीएस ट्रान्झॅक्ट ही भारतीय उद्योगपती रवी गोयल यांची कंपनी आहे. कंपनीत त्यांचा ६०.५ टक्के हिस्सा आहे. सुमारे १५ टक्के मार्केट शेअर असलेली ही कंपनी सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, एजीएस ट्रान्झॅक्ट ही कंपनी लवकरच बंद पडणार अशी चर्चा फेब्रुवारीमध्ये सुरू झाली होती. एजीएस ट्रान्झॅक्टच्या ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला जवळपास वर्षभरापासून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोयल यांचे १० टक्के शेअर्स आधीच बँकांकडे तारण ठेवण्यात आले आहेत.
कंपनीच्या व्यवस्थापकांनी काय सांगितलं?
गेल्या आठवड्यात कंपनीनं या संदर्भात एक परिपत्रक जाहीर केलं. त्यात असं म्हटलं आहे, “एजीएस ट्रान्झॅक्ट आणि त्यांची उपकंपनी सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेडनं सुमारे ३८५.९ लाख रुपयांची देयकं भरण्यात चूक केली आहे. त्याशिवाय कंपनी आणि तिच्या उपकंपनीला दोन हजार १२३ लाखांचं कर्ज कर्जही फेडता आलेलं नाही. ‘एजीएस ट्रान्झॅक्ट’नं स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेसह त्यांच्या कर्जदारांचं एकूण ७.१९ अब्ज रुपये देणं बाकी आहे.”
सध्या एजीएस ट्रान्झॅक्ट कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे क्रिसिल आणि इंडिया रेटिंग्ज एजन्सींनी त्यांचं क्रेडिट रेटिंग कमी केलं आहे. वैयक्तिक कारणास्तव कंपनीच्या चारही स्वतंत्र संचालकांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, बँका या कंपनीला नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून घोषित करू शकतात. असं झाल्यास ‘एजीएस’चा व्यवहार दिवाळखोरीत जाण्याचा धोका वाढू शकतो.
प्रमुख बँका ‘एजीएस’च्या ग्राहक
एका रिपोर्टनुसार, AGS Transact Technologies’कडे गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत सुमारे तीन हजार ८०० एटीएम आणि कॅश रिसायकलिंग मशीनचं (सीआरएम) जाळं होतं. कंपनीचा कॅश मॅनेजमेंट व्यवसाय त्याची उपकंपनी सिक्युअर व्हॅल्यू इंडिया लिमिटेडकडे आहे. देशातील प्रमुख बँका एजीएस ट्रान्झॅक्ट कंपनीच्या ग्राहक आहेत. त्यामध्ये आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
बँकांच्या एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा
इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, एजीएस ट्रान्झॅक्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये रोकड भरण्यास नकार दिल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयसीआयसीआय बँकसारख्या प्रमुख बँकांच्या एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर सुमारे ३८,००० एटीएमच्या सेवाही विस्कळित झाल्या आहेत. एसबीआयची १४ हजार एटीएम प्रभावित झाली आहेत. त्यापैकी सात ते आठ हजार एटीएम एजीएस ट्रान्झॅक्टद्वारे व्यवस्थापित केली जातात. त्याच वेळी अॅक्सिस बँकेच्या सुमारे पाच हजार एटीएमची सेवा कोलमडली आहे. आउटलूक मनीनुसार, इंडिया पोस्टचे एक हजार एटीएम आणि येस बँकेची ५०० एटीएम यामुळे प्रभावित झाली आहेत.
हेही वाचा : Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला करण्यासाठी रशियाचे सैनिक पाईपलाईनमध्ये?
बँक अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
एका मोठ्या बँकेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मनीकंट्रोलला सांगितले, “एटीएममध्ये अजिबात पैसे नसल्याच्या तक्रारी आम्हाला ग्राहकांकडून प्राप्त झाल्या होत्या. आम्ही परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्हाला आढळले की, या एटीएममध्ये अजिबात रोख रक्कम भरली जात नव्हती; जरी आम्ही एजीएस ट्रान्झॅक्टला एटीएममध्ये रोख रक्कम भरण्याचे निर्देश दिले होते. आमच्यासाठी या समस्येची माहिती नियामकाला देणं महत्त्वाचं होतं. कारण- आम्ही इतर सेवा प्रदात्यांना नियुक्त करू शकत नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँकेला कारणं द्यावी लागतील. सध्या बहुतांश बँकांनी एजीएस ट्रान्झॅक्टला रोख रक्कम देणं बंद केलं आहे.”
एजीएस ट्रान्झॅक्टचे पुढे काय होईल?
एजीएस ट्रान्झॅक्ट कंपनीला दिवाळखोरीच्या कारवाईचा सामना करावा लागू शकतो. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या कर्जदारांपैकी एक असलेल्या मॅक्सवेल एअरकॉन इंडियाने थकबाकीमुळे दिवाळखोरीचा दावा दाखल करण्याची योजना आखली आहे. दरम्यान, बँकांनाही या समस्येचा सामना करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. “एजीएस ट्रान्झॅक्टच्या संभाव्य दिवाळखोरीमुळे अनेक बँकांना त्यांच्या एटीएमची सेवा देण्यात अडचणी येत आहेत,” असे या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यानं वृत्तपत्राला सांगितलं. दुसरीकडे एजीएस ट्रान्झॅक्टनं वृत्तपत्राला सांगितलं की, आम्ही आमच्या नेटवर्कमध्ये कामकाज पुन्हा सुरू करीत आहोत आणि आवश्यकतेनुसार एटीएम स्थलांतरित करण्याचा विचार केला जाईल.