घुमटाकार बंदिस्त खोलीत रात्रीच्या अंधाराचा आभास निर्माण करून खगोलाची अनुभूती देणाऱ्या ‘तारांगण’ या तंत्रज्ञानाधारित संकल्पनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त या संकल्पनेचे मूळ व पुढच्या विस्ताराविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तारांगण म्हणजे काय ?

आकाशातील तारे, ग्रह-उपग्रह, नक्षत्रांच्या प्रतिमा यांचे अस्तित्व सूर्याच्या प्रखर तेजापुढे पृथ्वीवरील जीवांना दिवसा अनुभवता यावे या संकल्पनेतून तारांगण (प्लॅनिटोरियम) या संकल्पनेची निर्मिती झाली. अवघे तारामंडल, आकाशगंगा, सूर्यमाला भूतलावर अवतरल्याचा आभास तारांगणमधून होतो.

या संकल्पनेची पूर्वपीठिका कधीची ?

१९१२ साली ऑस्कर वॉर्न मिलर या इलेक्ट्रिकल अभियंता आणि ड्यूश संग्रहालयाच्या संस्थापकांना लोकांना खगोलीय तत्त्वे दाखवायची अशी कल्पना सुचली. पण त्यासाठी काही तांत्रिक उपकरणांची गरज होती. या अभिनव संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी मिलरने जर्मनीतील जेना येथील कार्ल झीस कंपनीकडे एक उपकरण (प्रोजेक्टर) तयार करून द्यावे म्हणून संपर्क साधला. झीसचा मुख्य अभियंता वॉल्थर बाऊर्सफेल्ड याच्या मार्गदर्शनाखाली ग्रह-ताऱ्यांच्या हालचाली टिपण्याच्या यंत्रावर काम सुरू झाले. यातून दोन तारांगण भासतील असे यंत्र तयार झाले. एकातून सूर्य केंद्रित (कोपर्निकस) आकाश दिसणार होते. त्यामध्ये तारे, ग्रह सूर्याभोवती फिरतानाचे दृश्य पाहिल्याचा आभास होणार होता. तर दुसरे भूकेंद्रित, आकाश (टॉलेमी) दाखवणार होते. त्यामध्ये दर्शकांना ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभे असल्याचा आभास होणार होता.

हेही वाचा : विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?

तारांगणचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक कधी घेतले?

म्युनिचमधील ड्यूश संग्रहालयाच्या समितीसमोर २१ ऑक्टोबर १९२३ रोजी झीस प्रारूपाच्या यंत्राद्वारे (प्रोजेक्टर) तारांगणचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पार पडले तेव्हा ‘हे तारांगण एक चमत्कार आहे’, असा एक अहवालच वॉर्न मिलरने त्यांच्या प्रशासकीय अहवालात नोंदवला. त्यानंतरपासून झीसने कंपनीच्या कारखान्याच्या छतावरील १६ मीटर अर्धगोलाकार सिमेंटच्या घुमटावर तारांगणची प्रात्यक्षिके दाखवण्यास सुरुवात केली. जुलै ते सप्टेंबर १९२४ या तीन महिन्यांत ३० हजारांहून अधिक अभ्यागतांनी तारांगणची अनुभती घेतली. त्यानंतर ७ मे १९२५ रोजी जगातील पहिले प्रक्षेपित तारांगण अधिकृतपणे ड्यूश संग्रहालयात खुले करण्यात आले. झीस प्रारूपाने तब्बल साडेचार हजार तारे, आकाशगंगा, सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी प्रदर्शित केले.

शतकोत्सवाचे आयोजन जगभर कुठे ?

आज जगभरात ४ हजारांहून अधिक तारांगण कार्यरत आहेत. या तारांगणांमध्ये शतकपूर्तीनिमित्त उत्सवासारखे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतात तारांगणांची प्रमुख ५२ ठिकाणे आहेत, तर महाराष्ट्रात नेहरू सेंटर, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक आदी काही मोजक्या शहरांमध्येच तारांगणची व्यवस्था असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. या उपक्रमाबाबत श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तारांगण संस्था (आयपीएस), राष्ट्रीय खगोल वेधशाळा-जपान (एनएओए) व आंतरराष्ट्रीय खगोल महासंघ (आयएयू) यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक स्तरावर चार हजार तारांगणांच्या माध्यमातून ‘शंभर तास खगोलशास्त्र-तारांगणाची शंभर वर्षे’ अशा शतकोत्सवी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थी, जिज्ञासू, शिक्षकांमध्ये खगोल, अंतराळाचा अभ्यास, माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याचा उद्देश आहे.

हेही वाचा : जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?

‘तारांगण’चे विस्तारित रूप कसे असेल ?

दुसरे महायुद्ध आणि जर्मनीच्या विभाजनानंतर झीस कंपनीही दोन भागात विभागली. दोन्ही शाखांनी झीस प्रारूपाद्वारे तारांगण विकसित करण्याचे काम सुरू ठेवले. पूर्वी ऑप्टिकल (ऑप-टू-मेकॅनिकल) म्हणजे भिंगांचे यंत्र होते. त्यातून थेट ताऱ्यांच्या जवळपासचा वेध घेण्याला काही अडचणी यायच्या. मग अत्याधुनिक यंत्रे येऊ लागली. डिजिटल प्रोजेक्टर येऊ लागले. आगामी काळात त्रिमितीय (थ्री-डी), ए-आर (अॅग्युमेंटेड रिअॅलिटी), व्ही-आर (व्हर्च्युअली रिअॅलिटी-आभासी वास्तविकता) आदी तंत्रज्ञान येत आहे. परभणीतही एक तारांगण साकारण्यात येत आहे. त्याविषयी सांगताना विज्ञानाचे जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेले सुधीर सोनुनकर यांनी सांगितले की, येत्या काळात परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातही तारांगण व इतर उपक्रमासाठी आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल साकारण्यात येणार आहे. त्यासाठी १० एकर जागा देण्यात आली आहे. तेथे २४ इंची टेलिस्कोप बसवण्यात येणार आहे. सौर मंदिरही करण्यात येणार आहे. मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्राची ४० ते ४५ फिरती वाहने आहेत. तारांगणसह इतरही वैज्ञानिक प्रयोग (एक्झिबिट) दाखवण्यात येतात. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासोबतच आरोग्य, स्वच्छतेचेही महत्त्व मुलांना पटवून देण्यात येते. तारांगणात रंजक वाटण्यासाठी अॅनिमेशनद्वारेही पाहण्याची व्यवस्था आकारास आली आहे.
bipin.deshpande@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Centenary of planetarium concept will increase the astronomical curiosity print exp css