ंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण केले जाण्याची शक्यता आहे. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. येत्या २६ मे रोजी या शपथविधीला नऊ वर्षे पूर्ण होतील. हेच औचित्य साधून मोदी नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे. मोदी सरकार येणारे पावसाळी अधिवेशन संसदेच्या नव्या इमारतीत आयोजित करण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम नोव्हेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार होते. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेची नवी इमारत कशी आहे? या इमारतीचे वैशिष्य काय आहे? हे जाणून घेऊ या….
संसदेच्या नव्या इमारतीसाठी १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च
संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या बाजूलाच ही नवी इमारत बांधण्यात येत आहे. एचसीपी डिझाईन्स, अहमदाबाद कंपनीचे वास्तूविशारद बिमल पटेल यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे बांधकाम केले जात असून इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडून केले जात आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एकूण ५ हजार कलाकृती असणार आहेत. त्रिकोणी आकार असलेली ही चार मजली इमारत एकूण ६४ हजार ५०० स्केअर किलोमीटर परिसरात वसलेली आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: श्रीलंकेत हिंदू मंदिरे का उद्ध्वस्त होत आहेत? सिंहली विरुद्ध तमीळ हिंदू संघर्ष का धुमसतोय?
संसदेच्या प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या प्राणी-पक्षांच्या मूर्ती
संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभेच्या सभागृहात एकूण ८८८ तर राज्यसभेत ३८४ आसने आहेत. संसदेच्या आवारात असलेल्या २००० स्क्वेअर किलोमीटर प्रांगणात एक वटवृक्ष असणार आहे. या नव्या इमारतीमध्ये एकूण तीन प्रवेशद्वार असतील. ‘ज्ञान द्वार’, ‘शक्ती द्वार’, ‘कर्म द्वार’ असे या तीन प्रवेशद्वारांचे नावे असतील. लोकप्रतिनिधी, महत्त्वाच्या व्यक्ती आणि संसदेला भेट देणाऱ्यांच्या प्रवेशासाठी वेगवेगळे द्वार असतील. संसदेच्या प्रवेशद्वारांवर वेगवेगळे प्राणी, पक्ष्यांच्या एकूण सहा मूर्ती (पुतळे) असतील. भारतीय वास्तूशास्त्र, भारतीय परंपरेतील महत्त्वानुसार या प्राण्यांची निवड करण्यात आली आहे.
इमातीच्या उत्तरेस असलेल्या प्रवेशद्वारावर बुद्धी, भाग्य, स्मरणशक्तीचे प्रतिक असलेल्या हत्तीची मूर्ती असणार आहे. दक्षिणेस सामर्थ्य, शक्ती, वेगाचे प्रतिक असलेल्या घोड्याची मूर्ती असेल. विविधतेतील एकतेचे प्रतिक असलेल्या ‘मकर’ आणि लोकशक्तीचे प्रतिक असलेल्या ‘शार्दुल’ अशा दौन पौराणिक प्राण्यांच्याही मूर्ती प्रवेशद्वारावर असतील. पूर्वेकडे लोकांची आकांक्षा, इच्छेचे प्रतिक असलेल्या गरुडाची तर उत्तर-पूर्वेच्या प्रवेशद्वारावर बुद्धी, शहाणपणाचे प्रतिक असलेल्या हंसाची मूर्ती असणार आहे.
हेही वाचा >> मानवी मलमूत्राचा पुनर्वापर करून शेती करणे शक्य आहे?
संसदेच्या नव्या इमारतीत काय असेल?
संसदेच्या सध्याच्या इमारतीत मोठा सेंट्रल हॉल आहे. मात्र नव्या इमारतीत ‘संविधान हॉल’ असेल. मोराची थीम असलेले लोकसभा कक्ष सध्याच्या लोकसभा कक्षाच्या तीन पटीने मोठे असणार आहे. राज्यसभेचे नवे कक्ष देशाचे राष्ट्रीय फूल असलेल्या ‘कमळा’च्या थीमवर उभारण्यात आले आहे. संसदेच्या इमारतीवर राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोक स्तंभातील ‘सिंहमुद्रे’ची प्रतिकृती बसवण्यात आली असून मागील वर्षाच्या जुलै महिन्यात नरेंद्र मोदी यांनी यांच्या हस्ते या प्रतिकृतीचे अनावरण करण्यात आले होते. ही सिंहमुद्रा एकूण ६.५ मीटर उंच असून तिचे वजन ९ हजार ५०० किलो आहे.
संसदेच्या इमारतीत महत्त्वाच्या नेत्यांची चित्रे
संसदेच्या इमारतीत देशातील महत्वाच्या व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळेही असणार आहेत. तसेच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये प्रत्येक चार गॅलरीज असणार आहेत. तीन ‘भारत गॅलरी’, एक ‘संविधान गॅलरी’, तर तीन समारंभ कक्ष असतील. नव्या इमारतीत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांची चित्रे असतील. संसदेतील प्रत्येक भिंतीवर देशासाठी योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती देण्यात आलेली आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: तडीपारीचा नेमका अर्थ काय? तडीपार करण्याचे अधिकार कोणाला? तडीपार कुणाला करतात?
२०१२ साली संसदेच्या नव्या इमारतीची मागणी
दरम्यान, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान, पंतप्रधानांचे नवे कार्यालय, उपराष्ट्रपतींचे निवासस्थान, राजपथाचे नुतनिकरण ही सर्व कामे सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचेच भाग आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संसदेच्या नव्या इमारतीची मागणी २०१२ सालापासूनच केली जात होती. तत्कालीन ओएसडींनी तत्कालीन सभापती मीरा कुमार यांना संसदेच्या नव्या इमारतीसाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर मीरा कुमार यांनी नगरविकास सचिवांना पत्र लिहून नवे संसदभवन बांधण्यासाठी विद्यमान संसदेच्या परिसरातील क्षेत्राचे संरक्षण करावे, अशा सूचना केल्या होत्या. २०१६ साली तत्कालीन सभापती सुमित्रा महाजन यांनीदेखील संसदेच्या नव्या इमारतीत जागा अपुरी पडत आहे, अशा भावना व्यक्त करत नव्या इमारतीची गरज व्यक्त केली होती.