अमेरिकेतील बहुराष्ट्रीय गुंतवणूक कंपनी ‘बर्कशायर हॅथवे’ ही बुधवारी (२८ ऑगस्ट) एक ट्रिलियन डॉलर्स (८४ लाख कोटी) बाजार भांडवल असणारी पहिली नॉन-टेक कंपनी ठरली आहे. कंपनीने ॲपलमधील जवळपास निम्मे शेअर्स विकल्याच्या अवघ्या काही आठवड्यांनंतर ही माहिती समोर आली, त्यामुळे आता कंपनीकडे २८० बिलियन डॉलर्स (२३.२५ लाख कोटी) रोख रक्कम जमा झाली आहे. ‘ओरॅकल ऑफ ओमाहा’ म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांची गणना जगातील महान गुंतवणूकदारांमध्ये केली जाते. ते ‘बर्कशायर हॅथवे’ या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी आहेत. गुंतवणूक विश्वात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी त्यांना ओळखले जाते. फोर्ब्सच्या मते, आज ते १४६ बिलियन डॉलर्स (१२.८ लाख कोटी) संपत्तीचे मालक आहेत. वॉरेन बफे नक्की कोण आहेत? जाणून घेऊ.
जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे
१९३० मध्ये काँग्रेसमॅन हॉवर्ड बफे यांच्या घरी वॉरेन यांचा जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात वॉरेन यांनी व्यवसायात खूप रस घेतला. १४ वर्षांच्या वयात त्यांनी पहिली गुंतवणूक केली. सॉफ्ट ड्रिंक्स आणि वृत्तपत्रे विकून केलेल्या बचतीचा वापर करून त्यांनी ४० एकर जमीन खरेदी केली आणि ती जमीन भाड्याने दिली. बफे यांनी नेब्रास्का विद्यापीठातून ‘बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’मध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी प्रवेशासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूल गाठले, जिथे त्यांना प्रवेशास नकार देण्यात आला. पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांच्या वडिलांच्या ‘बफेट-फॉक अँड कंपनी’मध्ये त्यांनी १९५१-५४ पर्यंत गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम केले. १९५५-५६ पर्यंत ते सिक्युरिटीज विश्लेषक म्हणून ‘ग्रॅहम-न्यूमन कॉर्पोरेशन’ या कंपनीत कार्यरत होते. १९६२ सालापर्यंत ते लक्षाधीश झाले, तेव्हा ते केवळ ३० वर्षांचे होते.

हेही वाचा : कॅनडापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही विद्यार्थ्यांना मोठा धक्का, नवे निर्बंध लागू; भारतीयांवर काय परिणाम होणार?
वॉरेन बफे १९५९ मध्ये चार्ली मुंगेर यांना भेटले, दोघांच्या तारा जुळल्या आणि वर्षानुवर्षे दोघांनी एकत्र राहून व्यवसाय उभा केला. १९६५ साली दोघांनी मिळून न्यू इंग्लंडमधील तोट्यात जाण्याच्या मार्गावर असलेल्या ‘बर्कशायर हॅथवे’ या टेक्स्टाईल कंपनीचे अधिकार मिळवले. कंपनीच्या प्रथम कमाईचा वापर त्यांनी गुंतवणुकीसाठी केला आणि नंतर कापड व्यवसाय पूर्णपणे बंद करून एक गुंतवणूक कंपनी म्हणून या कंपनीला पुढे नेले. आज, बफे हे गुंतवणूक बाजारातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या यशाचे गमक आहे मूल्य गुंतवणूक.
मूल्य गुंतवणूक
कोलंबियामध्ये असताना त्यांना बेंजामिन ग्रॅहम यांनी मार्गदर्शन केले होते. बेंजामिन ग्रॅहम यांना मूल्य गुंतवणूकीचे जनक मानले जाते. बफे हे या तत्त्वाचे सर्वात प्रखर पुरस्कर्ते ठरले. त्यांनी स्टॉक मार्केटद्वारे कमी लेखले जाणारे स्टॉक्स खरेदी केले आणि नफा मिळवला. हे स्टॉक मार्केटमधील अस्थिर आकलनावर आधारित असतात. मूल्य गुंतवणूकदार सवलतीच्या दरात स्टॉक खरेदी करून नफा मिळवतात आणि ते सामान्यतः उच्च गुणवत्तेच्या कंपन्यांचे दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात.
‘बर्कशायर हॅथवे’ कंपनीचे यश
सीबरी स्टँटन या कंपनीचे पूर्वी मालक होते. कापड व्यवसाय तोट्यात जात असताना या व्यवसायाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी बफेट आणि सीबरी स्टँटन यांच्यात व्यवहार झाला. मात्र, हा व्यवहार अयशस्वी ठरला. या उद्योगातील वाढीच्या मर्यादित संधींमुळे वस्त्रोद्योग व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणे व्यर्थ आहे, बफे यांना त्वरित समजले. त्यांनी आपल्या गुंतवणुकीत विविधता आणण्याचा प्रयत्न केला. मूल्य गुंतवणुकीच्या तत्त्वावर विसंबून त्यांनी अशा कंपन्यांचा शोध घेतला, ज्यांना या क्षेत्रात आपण कुठेतरी मागे पडत आहोत असे वाटत होते. अशाप्रकारे बर्कशायरने गेईको, फ्रूट ऑफ द लूम, कोका-कोला, ड्युरासेल आणि वर्ल्ड बुक एन्सायक्लोपीडियासारख्या विविध प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली.

बफेने त्यांच्या गुंतवणुकीवर दीर्घकाळ टिकून राहण्याच्या उद्देशाने अनेक वर्षांपासून या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. १९७८ मध्ये ‘बर्कशायर हॅथवे’चे उपाध्यक्ष म्हणून सामील झालेले मुंगेर यांनी गुंतवणुकीसाठी त्यांच्या सामायिक तत्त्वज्ञानाचे वर्णन केले, “गुंतवणुकीसाठी आम्ही तीन गोष्टी लक्षात घेतो. त्या म्हणजे होय, नाही, आणि समजण्यास खूप कठीण.” याचा अर्थ टेक कंपन्यांमधील गुंतवणूक टाळणे असा होता. ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात शेअर मार्केट क्रॅश झाल्याने अनेक कंपन्या बंद पडल्या होत्या, मात्र बर्कशायर कंपनी स्थिर उभी होती. मुंगेर यांनी सांगितलेल्या गुंतवणूक तत्वज्ञानाचा कंपनीला फायदा झाला.
हेही वाचा : राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ‘जिउ-जित्सू’ आणि ‘आयकिडो’ यांचा केला होता सराव, ते काय आहे?
बफेट यांनी अनेकदा मुंगेर यांना ‘सिगार-बट’ म्हणजेच बंद होण्याच्या मार्गावर असणार्या कंपनींमध्ये गुंतवणुकीपासून दूर नेण्याचे श्रेय दिले आहे. “चार्ली नसता तर आज जो वॅारेन आहे, तो वॉरेन दिसला नसता,” असे स्वतः वॉरेन बफे लिहितात. “त्याने मला दिलेली ब्लूप्रिंट अगदी सोपी होती: अद्भूत किमतीत वाजवी व्यवसाय खरेदी करण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते विसरून जा. त्याऐवजी, वाजवी किमतीत चांगले व्यवसाय खरेदी करा,” असे बफे यांनी २०१५ मध्ये भागधारकांना लिहिले होते.