IRCTC and IRFC Navratna Status : केंद्र सरकारने सोमवारी (तारीख ३ मार्च) रेल्वे मंत्रालयाच्या दोन सार्वजनिक उपक्रमांना नवरत्न दर्जा दिला. त्यामुळे इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) या दोन्ही कंपन्या स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकतील. आयआरसीटीसी ही २५ वी आणि आयआरएफसी ही २६ वी नवरत्न कंपनी झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय रेल्वेच्या सर्व सात सूचीबद्ध केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (CPSEs) आता नवरत्न दर्जा मिळाला आहे. भारतीय रेल्वेमध्ये एकूण १२ सीपीएसई उपक्रम आहेत. दरम्यान, नवरत्न दर्जा म्हणजे काय? तो कशामुळे मिळतो? त्यासाठी कोणकोणते निकष पूर्ण करावे लागतात? याबाबत जाणून घेऊ.
कंपनीला नवरत्न दर्जा कशामुळे मिळतो?
नवरत्न कंपन्या म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीच्या ‘रत्न’ कंपन्यांची दुसरी श्रेणी. नवरत्न दर्जा मिळवण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करणे आवश्यक असते. ज्यामध्ये कंपनीचा नफा, निव्वळ संपत्ती, कमाई, आंतर-क्षेत्रीय कामगिरी इत्यादी बाबींवर आधारित निकष असतात. याआधारे महारत्न आणि मिनीरत्न यांच्यात कंपनीला स्थान दिले जाते. अर्थ मंत्रालयाचा सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE) नवरत्न दर्जा देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची निवड करतो. त्यामध्ये खालीलप्रमाणे सहा निर्देशकांचा विचार केला जातो.
१) निव्वळ नफ्याचे निव्वळ मूल्याशी गुणोत्तर, २) उत्पादन किंवा सेवांच्या एकूण खर्चातील मनुष्यबळ खर्चाचे प्रमाण. ३) , घसारा, व्याज तसेच करांचा आधीचा नफा (PBIT) आणि कंपनीच्या उलाढालीचे प्रमाण, ४) व्याज आणि कराच्या (PBIT) पूर्वीच्या नफ्याचे उलाढालीशी गुणोत्तर, (५) कंपनीला प्रति शेअर मिळणारी कमाई, ६) कंपनीचे आंतरक्षेत्रीय कामगिरी. या सहा निर्देशकांचे वजन १० (प्रति शेअर कमाईसाठी) ते २५ (निव्वळ नफा ते निव्वळ मालमत्ता गुणोत्तरासाठी) पर्यंत आहे. जर एखाद्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाचा सर्व सहा निर्देशकांचा एकूण स्कोअर ६० किंवा त्याहून अधिक असेल आणि कंपनीने गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षात उत्कृष्ट किंवा खूप चांगले रेटिंग मिळवले असेल, तर ती कंपनी नवरत्न दर्जासाठी पात्र ठरवली जाते.
आणखी वाचा : BAPS संस्थेची जगभरात किती मंदिरं आहेत? अमेरिकेतील हिंदू मंदिरात तोडफोड का झाली?
IRCTC आणि IRFCची आर्थिक स्थिती काय आहे?
केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दोन वेगवेगळ्या पोस्टमध्ये माहिती दिली. त्यात असं म्हटलंय की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात आयआरसीटीसीची वार्षिक उलाढाल ४,२७०.१८ कोटी रुपये होती. तर कंपनीचा निव्वळ नफा १,१११.२६ कोटी रुपये इतका होता. याशिवाय कंपनीची एकूण मालमत्ता ३,२२९.९७ कोटी रुपये होती. दुसरीकडे आयआरएफसीची वार्षिक उलाढाल २६,६४४ कोटी रुपये, कंपनीचा नफा सहा हजार ४१२ कोटी आणि एकूण मालमत्ता ४९,१७८ कोटी रुपये होती. आयआरसीटीसी ही भारतीय रेल्वेची एक विस्तारित शाखा आहे. ऑनलाइन रेल्वे तिकिटं विकणारी ही एकमेव संस्था आहे.
IRCTC आणि IRFC मध्ये केंद्राचा किती हिस्सा?
आयआरसीटीसीमध्ये रेल्वे मंत्रालयाचा ६२.४०% हिस्सा आहे. मार्च २०२४ पर्यंत आयआरसीटीसीची वार्षिक उलाढाल चार हजार २७० कोटी रुपये होती आणि नफा एक हजार १११ कोटी रुपये होता. तसेच संस्थेची एकूण मालमत्ता तीन हजार २३० कोटी रुपये आणि बाजार भांडवल ७४,३७६ कोटी रुपये होते. आयआरएफसीचे मुख्य कार्य म्हणजे, भारतीय रेल्वेच्या अतिरिक्त गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातून कर्ज घेतल्यावर अत्यंत स्पर्धात्मक दर आणि अटींवर निधी मिळवणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाचा आयआरएफसीमध्ये ८६.३६% हिस्सा आहे. मार्च २०२४ पर्यंत कंपनीचे बाजार भांडवल एक लाख ८६ हजार ३० कोटी रुपये होते.
नवरत्न दर्जा मिळाल्याने काय होते?
केंद्र सरकारकडून नवरत्न दर्जा मिळाल्याने कंपनीला अनेक प्रकारचा फायदा होतो. जसे की, अधिक आर्थिक स्वायतता मिळवणे, जागतिक विस्तार सुलभ करणे, चांगली बाजारपेठी चांगले स्थान मिळवणे. यांसारखे फायदे कंपनीला होतात. “नवरत्न दर्जा मिळाल्यास या कंपन्या सरकारी मंजुरीशिवाय त्यांच्या विवेकबुद्धीनुसार एकाच प्रकल्पात १००० कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या एकूण मालमत्तेच्या १५ टक्के गुंतवणूक करू शकतात. यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत होतात,” असे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : What is Hantavirus : हंता व्हायरस म्हणजे काय? हा आजार कशामुळे होतो? त्यावर उपचार शक्य आहे का?
ते म्हणाले, “या कंपन्या आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रवेश करू शकतील. तसेच संयुक्त उपक्रम आणि सहाय्यक कंपन्या तयार करू शकतील. विलिनीकरण किंवा अधिग्रहणांमध्ये सरकारच्या थेट हस्तक्षेपाशिवाय कंपन्यांना सामील होता येईल. त्यांना खाजगी क्षेत्रातील कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी स्वतंत्र व्यवसाय आणि गुंतवणुकीचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल. नवरत्न कंपन्या आर्थिकदृष्ट्या स्थिर मानल्या जातात, ज्यामुळे त्यांना अधिक गुंतवणूकदार आकर्षित करण्यास आणि भागधारकांना चांगले परतावा देण्यास मदत होते,” असेही अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेच्या कोणकोणत्या कंपन्यांना नवरत्न दर्जा?
आयआरसीटीसी आणि आयआरएफसीच्या आधी भारतीय रेल्वेच्या इतर पाच कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे. ज्यामध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CONCOR), रेल विकास निगम लिमिटेड (RVNL), राइट्स लिमिटेड, आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा समावेश आहे. जुलै २०१४ मध्ये कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रेल्वेची पहिला नवरत्न दर्जा मिळणारी कंपनी ठरली होती. त्यानंतर २०२३ मध्ये रेल विकास निगम लिमिटेड, आयआरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड नवरत्न दर्जा मिळाला. ऑगस्ट २०२४ मध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवरत्नाचा दर्जा प्राप्त केला होता.
रेल्वेच्या कंपन्या कशा काम करतात?
कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही मालवाहतुकीसाठी एक मल्टीमॉडेल लॉजिस्टिक्स कंपनी आहे. तर रेलटेल ही स्थानकांवरील आयपी-आधारित व्हिडिओ देखरेख प्रणाली आणि एनआयसी ‘ई-ऑफिस’ सेवा यासारख्या कनेक्टिव्हिटी सेवा प्रदान करते. आयआरकॉन भारत आणि परदेशात रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांच्या बांधकामात तरबेज आहे. राइट्स लिमिटेड ही एक वाहतूक पायाभूत सुविधा सल्लागार संस्था आहे. रेल विकास निगम लिमिटेड जलदगतीने रेल्वे पायाभूत सुविधांची निर्मिती आणि क्षमता वाढविण्याशी संबंधित प्रकल्पांवर काम करते.