ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रशियातील कझान येथे दाखल झाले असता त्यांचे पारंपरिक रशियन पाककृतींनी स्वागत करण्यात आले. दोलायमान तातार कपडे परिधान करून स्थानिक महिलांनी चक-चक आणि कोरोवाई या खाद्यपदार्थांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदींसह इतर जागतिक नेत्यांचेही या पाककृतींनी स्वागत करण्यात आले. या दोन्ही पदार्थांना इतिहास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टींमध्ये महत्त्व आहे. काझानचा समावेश असलेल्या रशियाच्या तातार आणि बश्कीर प्रदेशांच्या आदरातिथ्य आणि पाक परंपरांमध्ये त्यांचे मूळ आहे. हे पदार्थ नक्की काय आहेत? जागतिक परिषदेत या खाद्यपदार्थांनी नेत्यांचे स्वागत का करण्यात आले? त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय? त्याविषयी जाणून घेऊ.
चक-चक म्हणजे काय?
चक-चकचा अर्थ होतो ‘थोडासा’ किंवा ‘छोटा.’ ही गव्हाच्या पिठाच्या तळलेल्या तुकड्यांपासून तयार केली जाणारी मिठाई आहे, जी गोल आकाराची असते. पंतप्रधान मोदींना आलेली ही मिठाई ओडिशातील मुआ, बंगालमधील मुरी-र-मोआ किंवा बिहारमधील मुर्ही-का-लई म्हणजेच मुरमुर्यांच्या लाडूसारखी दिसते. ही मिठाई तातारस्तान आणि बाशकोर्तोस्तान प्रदेशातील वैशिष्ट्य आहे. पौराणिक कथेनुसार, मध्य आशियातील भटक्या समुदायांमध्ये चक-चक हा पदार्थ सर्वात आधी दिसून आला. मात्र, हा मूळ पदार्थ बल्गेरियातील व्होल्गा येथील आहे. १९९० च्या आधी, बल्गेरिया शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनचा जवळचा मित्र होता.
येकातेरिनबर्गस्थित एमिलिया यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, चक-चक ही केवळ एक मिठाई नसून कौटुंबिक कार्यक्रम, लग्न समारंभातील महत्त्वाचा भाग आहे. ही मिठाई प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे, जी कुटुंबांना एकत्र जोडून ठेवते. चक-चक तयार करण्यासाठी बेखमीर पिठाला अनेक आकारात कापले जाते, त्यानंतर कणकेचे हे तुकडे तेलात तपकिरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळले जातात. त्यानंतर तळलेल्या तुकड्यांवर साखर, मध आणि पाण्याचे गरम मिश्रण टाकले जाते.
कोरोवाई म्हणजे काय?
कोरोवई ही गव्हाच्या पिठाने तयार करण्यात येणारी भाकरी आहे. ही दिसायला अगदी केकप्रमाणे दिसते; ज्याला फुलांच्या आकृतींनी सजवले जाते. कोरोवाई तयार करताना गव्हाच्या पिठाच्या भाकरी एकावर एक ठेवून याला तयार करण्यात येते. मोठ्या सांस्कृतिक महत्त्वासह, विवाहसोहळ्यांमध्ये ही पारंपरिक भाकरी आवश्यक असते, कारण याला नवविवाहित जोडप्याच्या भविष्याचे प्रतीक मानले जाते. यावर सजावटीसाठी लावण्यात येणार्या कणकेपासून तयार केलेल्या प्रत्येक फुलाचा विशिष्ट अर्थ असतो. उदाहरणार्थ, गुलाब सौंदर्याचे प्रतीक आहे, पेरीविंकलचा पुष्पहार जोडप्याला एकत्र बांधून ठेवण्याचे प्रतीक आहे. रशियामध्ये या पदार्थाला खूप जास्त महत्त्व आहे. एमिलियाने ‘इंडिया टुडे’ला सांगितले, “कोरोवाई हा लोकप्रिय पदार्थ मूळ पूर्व स्लाव्हिक देशांतीलआहे. पूर्वी स्लाव सूर्य देवाची पूजा करीत, त्यामुळे भाकरीचा असणारा गोल आकार सूर्याचा गोल आकार दर्शवतो.
कोरोवाई हा पदार्थ एकता आणि समृद्धीचेही प्रतीक आहे. कोरोवाई तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पिठाचे अनेक थर एकावर एक लावले जातात; ज्यामुळे हा पदार्थ अधिक आकर्षक दिसतो. या पदार्थाशी संबंधित अनेक मनोरंजक प्रथा आहेत. उदाहरणार्थ, मीठ घालून ब्रेडच्या स्लाईसचा आनंद घेणे म्हणजे पाहुण्यांशी जवळीक साधणे आणि त्यांच्या सर्व चिंता आणि समस्या सामायिक करणे असा होतो.