आगामी म्हणजेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी महाराष्ट्रातून गेल्या वेळचे संख्याबळ राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच अजित पवार यांच्या गटाला सत्तेत घेण्यात आले. २०१९ मध्ये महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या होत्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला पाच आणि एमआयएमला एक जागा तर नवनीत राणा या अपक्ष म्हणून विजयी झाल्या. आता समीकरणे बदललीत. भाजप-शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट ही महायुती आहे. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार यांचा गट, काँग्रेस तसेच डावे पक्ष यांनी देशव्यापी इंडिया आघाडी उभारलीय. दोन्हीकडे नव्या मित्रांमुळे जागावाटपात गोंधळच दिसतो. अंतिम फैसला होण्यासाठी दिल्लीकडेच डोळे आहेत. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागांमुळे सत्तेचा मार्ग तेथून सुकर होतो हे जरी खरे असले, तरी महाराष्ट्र हे जागांमध्ये (४८) दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रातील सत्तेला स्थैर्य महाराष्ट्रातून किती जागा मिळणार, यावर ठरते. म्हणूनच राज्यात आतापासूनच दोन्ही बाजूंकडून जागा वाटपावर काथ्याकूट सुरू झाला आहे. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न दिसतो.
महायुतीत खल…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात भाजप २६ तर मित्रपक्ष २२ जागा लढवतील असे सूतोवाच करतात, त्याची प्रतिक्रिया उमटली. मग फडणवीस यांनी हे जागा वाटप अंतिम नाही हे स्पष्ट केले. गेल्या वेळी भाजप २५ जागी लढला होता. त्यातील २३ ठिकाणी यश मिळवले. यंदा त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर महायुतीत जागावाटप सौहार्दाने होणे महत्त्वाचे ठरते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या गटाच्या मेळाव्यात चार जागांची घोषणाच केली. त्यात बारामती, सातारा, शिरूर तसेच रायगडचा समावेश आहे. यात रायगड लढण्याच्या दृष्टीने भाजपने तयारी केली होती.
हेही वाचा… विश्लेषण : हवामानबदल संकटांबद्दल गरीब राष्ट्रांना मिळणार नुकसानभरपाई… कशी, किती, कोणाकडून?
आता एक पाऊल मागे घ्यावे लागेल. भाजपला बारामतीत अजित पवार यांच्या कलाने घ्यावे लागणार हे स्पष्ट आहे. तर सातारा मतदारसंघात उदयनराजे व आमदार शिवेंद्रसिंहराजे हे भाजपमध्ये असले तरी, स्थानिक पातळीवर अजित पवार गटाची ताकद आहे. विशेषत: आमदार मकरंद पाटील तसेच रामराजे निंबाळकर यांचा गट प्रभावी आहे. अर्थात निंबाळकर हे माढा मतदारसंघात येतात. पण साताऱ्यात त्यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे बारामती व सातारा हे यापूर्वी लढलेले मतदारसंघ भाजपला सोडावे लागतील असे दिसते.
शिंदे गटाची ताकद
गेल्या वेळी शिवसेनेचे १८ सदस्य निवडून आले. त्यांनी २३ जागा लढवल्या होत्या. आता पक्षातील फुटीनंतर १३ खासदार हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. त्या जागांवर त्यांचा दावा राहणारच. जिंकलेल्या जागा सहजासहजी कोण सोडणार नाही. शिंदे यांनाही आपल्या खासदारांना दुखावणे कठीण आहे. विशेषत: मुंबई तसेच कोकणपट्ट्यात शिंदे यांना मानणारा वर्ग असून, या जागा भाजपच्या पदरात पडणार नाहीत. शिवसेनेतील आमदारही मोठ्या संख्येने शिंदे यांच्या बरोबर आहेत अशा वेळी पूर्वीच्या जागांसाठी ते आग्रही राहणारच. फार तर विदर्भात एखाद्या जागेची अदलाबदल करता येईल. मात्र उर्वरित ठिकाणी महायुतीमधील अन्य घटक पक्ष भाजपच्या दबावाला दाद देतील असे नाही. मराठवाड्यात विरोधकांचे बळ चांगले आहे. येथे जागावाटपात भाजप अतिरिक्त जागांसाठी आग्रही राहील ही शक्यता नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती ४८ पैकी ४५ जागा जिंकेल असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. राज्यात विरोधकांची ताकद दुर्लक्षित करता येणार नाही. जर इंडिया आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन महासंघाला बरोबर घेतले तर लोकसभेची लढाई तीव्र होईल. मग महायुतीला यश सहजसाध्य नाही.
राज्यावर भाजपची आशा
उत्तर प्रदेशातील सध्याची समीकरणे पाहता भाजपची स्थिती चांगली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा उत्तम आहे. विरोधी समाजवादी पक्षाला अपेक्षित सूर गवसलेला दिसत नाही. तेलंगणचा कल पाहता भाजपला दक्षिणेत कर्नाटक वगळता इतरत्र मोठे यश मिळेल अशी शक्यता नाही. गेल्या वेळी दक्षिणेतील लोकसभेच्या १४९ जागांपैकी भाजपला २९ जागा मिळाल्या होत्या. यात कर्नाटकमधील २५ तर तेलंगणमधील चार जागांचा समावेश आहे. केरळमधील जातीय समीकरण पाहता तेथील २० जागांपैकी तिरुअनंतपुरमची जागा वगळता अन्यत्र सत्तारूढ डावी आघाडी विरुद्ध काँग्रेसप्रणीत आघाडी असाच सामना आहे. तमिळनाडूतील ३९ जागांमध्ये भाजपसाठी फार आशादायक चित्र नाही. अण्णा द्रमुक भाजपपासून बाजूला झालाय. सत्तारूढ द्रमुकने काँग्रेस तसेच डाव्यांसह छोट्या पक्षांना बरोबर घेत व्यापक आघाडी तयार केलीय. ज्यातून जातीय समीकरण साधले गेले आहे. पुदुच्चेरीत एक जागा आहे. ती जागा भाजपच्या मित्रपक्षाला मिळेल इतकेच काय ते यश. याखेरीज दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या आंध्र प्रदेशात ४२ जागांवर भाजपचे फारसे अस्तित्व नाही. माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसमशी आघाडी झाल्यास काही जागांची अपेक्षा ठेवता येईल. मात्र तेथेही खात्री नाही. बिहारमध्ये नितीशकुमार यांचा जनता दल विरोधी आघाडीत सामील आहे. तर पंजाबमध्ये अकाली दल हा सर्वात जुना मित्र दुरावलाय. यामुळे गेल्या वेळच्या पुनरावृत्तीसाठी महाराष्ट्रावर भाजपची भिस्त दिसते. यासाठीच जागावाटप महत्त्वाचे आहे. कार्यकर्ते एकदिलाने लढले तर यश शक्य आहे. विरोधी इंडिया आघाडीचीही कसून तयारी आहे. पक्षश्रेष्ठींना जागा वाटपाचा तिढा सोडवणे हे निवडणुकीच्या तयारीचे पहिले पाऊल आहे.
hrishikesh.deshpande@expressindia.com