– अन्वय सावंत
‘युएफा’ चॅम्पियन्स लीग या युरोप आणि किंबहुना जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या क्लब फुटबॉल स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (१५ फेब्रुवारी) तारांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन संघांमधील पहिल्या टप्प्यातील (पहिला लेग) सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पॅरिस सेंट-जर्मेनने रेयाल माद्रिदवर १-० अशी सरशी साधली. मात्र, रेयालला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची अजूनही संधी असून या लढतीचा दुसरा टप्पा (दुसरा लेग) १० मार्च रोजी खेळवला जाईल. घरच्या मैदानावर होणारा दुसऱ्या टप्प्यातील सामना जिंकण्यात यश आल्यास रेयाल स्पर्धेत आगेकूच करेल, अन्यथा सेंट-जर्मेन संघाचा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा मार्ग मोकळा होईल. यंदा या दोन्ही संघांसह गतविजेता चेल्सी, गतउपविजेता मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल आणि बायर्न म्युनिक या संघांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु यंदा या संघांना वेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागेल. या हंगामापासून ‘युएफा’ने ‘अवे गोल’ (प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील गोल) नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाद फेरीच्या दोन्ही टप्प्यातील सामन्यांना समसमान महत्त्व प्राप्त झाले असून सर्वोत्तम खेळ करणारा संघच आगेकूच करण्याची शक्यता बळावली आहे.
‘अवे गोल’ नियम काय होता?
चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग यांसारख्या ‘युएफा’च्या स्पर्धांचे बाद फेरीतील सामने हे दोन टप्प्यांत (दोन लेग) खेळवले जातात. प्रत्येक संघाचा एक सामना घरच्या मैदानावर, तर दुसरा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होतो. या दोन टप्प्यांनंतरही दोन्ही संघांच्या गोलसंख्येत बरोबरी असल्यास ‘अवे गोल’ नियमाचा अवलंब केला जात असे. या नियमानुसार, प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अधिक गोल करणाऱ्या संघाला पुढील फेरीत प्रवेश मिळायचा. १९६५ साली सर्वप्रथम या नियमाची अंमलबजावणी केली गेली.उदा. अ संघाने स्वतःच्या मैदानावर ब संघाविरुद्ध १-० असा सामना जिंकला. मग दुसऱ्या टप्प्यातील सामना (ब विरुद्ध, त्या संघाच्या मैदानावर) १-२ असा गमावला. तर दोन्ही संघांचे दोन सामन्यांमध्ये मिळून प्रत्येकी २ गोल झालेले, तरी अ संघाने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर १ गोल अधिक झळकावल्यामुळे त्याला विजयी घोषित केले जाई. दोन्ही निकषांवर समसमान गोल झाल्यास पेनल्टी शूट-आऊटचा अवलंब केला जाई.
नियमाचा कोणत्या संघांना फायदा झाला?
वर्षानुवर्षे अनेक अविस्मरणीय सामन्यांचा निकाल ‘अवे गोल’ नियमानुसार लागला. २००८-०९ हंगामात चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत चेल्सी आणि बार्सिलोना हे बलाढ्य संघ आमनेसामने आले. बार्सिलोनाच्या घरच्या मैदानावर झालेला पहिल्या टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. चेल्सीच्या मैदानावरील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात नवव्या मिनिटाला मायकल एसियेनने केलेल्या गोलमुळे यजमानांना १-० अशी आघाडी मिळाली. ते हा सामना असे जिंकणार असे वाटत असतानाच ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत आंद्रेस इनिएस्टाने गोल करत बार्सिलोनाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. अखेर याच निर्णायक अवे गोलमुळे बार्सिलोनाने अंतिम फेरी गाठली. तसेच २०१८-१९ हंगामात टॉटनहॅमने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे मँचेस्टर सिटी आणि आयेक्स यांच्यावर ‘अवे गोल’ नियमाने मात केली होती.
नियम रद्द करण्यामागे कारण काय?
पहिल्या टप्प्यातील सामना प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणाऱ्या संघांसाठी ‘अवे गोल’ नियम जास्त लाभदायी ठरत होता. या सामन्यात गोल केल्यास त्यांच्यावरील दडपण कमी होई. मात्र, त्याच वेळी पहिल्या टप्प्यातील सामना घरच्या मैदानावर खेळणारा संघ बहुतांश वेळा बचावात्मक खेळ करण्यास प्राधान्य देत असल्याने सामन्याची रंजकता कमी होत असे. तसेच दोन्ही संघांच्या गोलसंख्येत बरोबरी असताना केवळ प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर अधिक गोल केले म्हणून एका संघाने आगेकूच करणे आणि दुसरा संघ स्पर्धेबाहेर होणे कितपत योग्य आहे, असा सवाल चाहते, खेळाडू, प्रशिक्षक आणि संघांकडून अनेकदा उपस्थित केला गेला. त्यामुळे गेल्या वर्षी जूनमध्ये ‘युएफा’ने अवे गोल नियम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
बरोबरीनंतर आता विजेता संघ कसा ठरवणार?
बाद फेरीत दोन्ही टप्प्यांतील सामन्यांअंती एकूण लढतीत बरोबरी असल्यास आता विजेता ठरवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात ९० मिनिटांच्या नियमित वेळेनंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेचा खेळ होईल. त्यानंतरही दोन्ही संघांतील बरोबरी कायम राहिल्यास ही कोंडी फोडण्यासाठी पेनल्टी शूटआऊट खेळवण्यात येईल. यात बाजी मारणारा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल.