Chandra Shekhar Azad fight against British : भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतीकारकांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचं नाव आघाडीवर घेतलं जातं. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी आझाद यांचं निधन झालं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना देशभरातून आदरांजली वाहण्यात आली. अतिशय कमी वयात आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली होती. अवघड प्रसंगातही त्यांनी देशासाठी लढण्याचं धाडस दाखवलं. स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान आजही अनेकांच्या स्मरणात आहे. एकूणच चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरीब कुटुंबात चंद्रशेखर आझाद यांचा जन्म

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म १९०६ मध्ये अलिराजपूर (सध्याचे मध्य प्रदेश) येथील एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते. वयाच्या १५ व्या वर्षी आझाद यांनी घर सोडले. काही काळ त्यांनी मुंबईच्या डॉकयार्डमध्ये काम केलं. नंतर ते वाराणसीला गेले आणि एका संस्कृत पाठशाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र, आझाद यांचे अभ्यासात फारसे मन रमले नाही. याच काळात महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरोधात असहकार चळवळ सुरू केली होती. त्यामुळे राजकीयदृष्ट्या वाराणसी शहर अशांत होते.

कमी वयातच काँग्रेसच्या युवा संघटनेत सहभागी

त्यावेळी काँग्रेसने स्थापन केलेल्या युवा संघटनेत चंद्रशेखर आझाद हे सहभागी झाले. त्यांनी दारुच्या दुकानांविरोधातील अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. यादरम्यान, आझाद यांना पोलिसांनी अटकही केली. त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप ठेवण्यात आला. पोलिसांनी आझाद यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले, तेव्हापासूनच आझाद यांच्या मनात स्वातंत्र्यलढ्याचा विचार सुरू झाला. इतिहासकार अपर्णा वैदिक आपल्या ‘Swatantra’ [Independence] and his home address was a jail cell’ या पुस्तकात लिहितात, “जेव्हा न्यायाधीशांनी चंद्रशेखर आझाद यांना त्यांचे नाव आणि कुटुंबाबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी, “माझे नाव आझाद, वडिलांचे नाव ‘स्वतंत्रता’ आणि घराचा पत्ता तुरुंगातील कोठडी आहे असे उत्तर दिले.”

आणखी वाचा : Amir Khusrau : कव्वालीचे जनक म्हणून अमीर खुसरो यांना कशी मिळाली ओळख?

चंद्रशेखर आझाद यांना १५ फटके मारण्याचे आदेश

चंद्रशेखर यांच्या उत्तराने न्यायाधीश प्रचंड संतापले. त्यांनी आझाद यांना चाबकाचे १५ फटके मारावेत, असा आदेश पोलिसांना दिला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी आपले ब्राह्मण नाव सोडून दिले आणि आझाद ही पदवी धारण केली. पुन्हा कधीही इंग्रजांच्या कैदेत सापडायचं नाही, अशी शपथच त्यांनी घेतली. फेब्रुवारी १९२२ मध्ये महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतली. तेव्हा आझाद हे प्रचंड अस्वस्थ झाले, त्यांनी मवाळ मार्गाकडून जहाल मार्गाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

मवाळ मार्गाकडून जहाल मार्गाकडे

एनएमएमएल पेपर्स या वृत्तपत्रानुसार, स्वातंत्र्यसैनिक मन्मथ नाथ गुप्ता म्हणाले, ‘हा तो प्रसंग होता की, जेथून चंद्रशेखर आझाद आणि माझ्यासारख्या अनेक लोकांच्या जीवनात एक नवीन बदल घडून आला. कारण, यापूर्वी आम्ही महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गावर चालत होतो. मात्र, आता आमच्या मनात क्रांतीकारी विचाराच्या भावनेने जन्म घेतला होता. पुढे लवकरच चंद्रशेखर आझाद हे राम प्रसाद बिस्मिल आणि सचिंद्रनाथ सन्याल यांच्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेशी जोडले गेले. जिथे त्यांनी सरकारी खजाना लुटून संघटनेच्या क्रांतीकारी कार्यासाठी पैसे जमवण्याचे काम सुरू केले. हे सगळे धन भारतीयांचेच आहे जे इंग्रजांनी लुटले आहे असे त्यांचे म्हणणे होते.

१९२५ मधील काकोरीची घटना

यादरम्यान १९२५ मध्ये उत्तर प्रदेशातील काकोरी गावाजवळ, क्रांतिकारकांनी ब्रिटीश सरकारचा खजिना घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर हल्ला केला. या मोहिमेचे नेतृत्व चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि रोशन सिंह यांनी केले होते. क्रांतिकारकांच्या या कारवाईमुळे ब्रिटीश सरकारचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर आझाद हे इंग्रजांच्या तावडीतून निसटले आणि झाशी येथील गुप्त ठिकाणी राहू लागले. इतिहासकारांच्या मते काकोरीचा खटला संपेपर्यंत आझाद हे झाशीमध्येच होते.

१९२८ मध्ये भगतसिंह यांच्याबरोबर ओळख

काकोरीचे प्रकरण शांत झाल्यानंतर आझाद यांनी पुन्हा आपली संघटना सुरू केली आणि या काळात त्यांची भेट भगतसिंग यांच्याबरोबर झाली. त्यावेळी दोन्ही क्रांतिकारकांनी मिळून संयुक्त प्रांत आणि पंजाबमधील स्वातंत्र्यसैनिकांना एकत्र आणले. १९२८ मध्ये त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) ची स्थापना केली. भगतसिंह हे या क्रांतिकारी संघटनेचे राजकीय विचारवंत होते. तर आझाद यांच्याकडे लष्करी नेतृत्वाची जबाबदारी होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या माध्यमातून चंद्रशेखर आझाद हे रणनीती आणि नियोजन आखत असत, तसेच कृती अंमलात आणण्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती.

लाला लजपतराय यांच्या हत्येचा बदला

डिसेंबर १९२८ मध्ये लाहोरमध्ये ब्रिटीश पोलिस अधिकारी जॉन सॉन्डर्स यांच्या हत्येची योजना चंद्रशेखर आझाद यांनी आखली. भगतसिंग आणि राजगुरू या क्रांतिकारकांनी सॉन्डर्सवर गोळ्या झाडल्या, चंद्रशेखर आझाद यांनी पाठलाग करणाऱ्या एका पोलिस कॉन्स्टेबलला ठार केले. ब्रिटीश पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन एक अधिकृत पत्रक जाहीर केलं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, “लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्सची हत्या करण्यात आली आहे. आज संपूर्ण जगाने पाहिलं आहे की भारतातील लोक मेलेले नाहीत, त्यांचे रक्त थंड झालेले नाही. आमचं ध्येय क्रांती घडवणे असून सर्वसामान्यांचे शोषण थांबवणे आहेत. इन्कलाब जिंदाबाद!” या पत्रकावर ‘बलराज’ या टोपन नावाने स्वाक्षरी करण्यात आली होती.

दिलीतील संसदेत बॉम्बस्फोट

१९२९ मध्ये, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने आणखी एक मोठे क्रांतिकारी पाऊल उचलले. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिलीतील संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ज्याचा उद्देश फक्त इंग्रज सरकारला इशारा देण्याचा होता. या बॉम्बस्फोटात कुणालाही दुखापत झालेली नव्हती. यानंतर, ब्रिटिश सरकारने क्रांतिकारी संघटनेविरुद्ध मोहीम सुरू केली आणि त्यातील सर्व प्रमुख लोकांना अटक केली. सॉन्डर्सच्या हत्येप्रकरणी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. सहकाऱ्यांनी देशासाठी प्राणाची आहुती दिल्यानंतरही चंद्रशेखर आझाद यांनी भूमिगत राहून संघटना सुरूच ठेवली.

हेही वाचा : Crying Disease : रडता-रडता होतोय अनेकांचा मृत्यू, नेमका काय आहे हा थैमान घालणारा आजार?

ब्रिटिशांबरोबर चंद्रशेखर आझाद यांची चकमक

त्यांचे सहकारी गेल्यानंतरही चंद्रशेखर आझाद भूमिगत राहून काम करत राहिले. २७ फेब्रुवारी १९३१ साली अल्फ्रेड पार्कमधल्या जांभळाच्या झाडाखाली चंद्रशेखर आझाद आपल्या एका साथीदाराबरोबर काहीतरी बोलत होते. त्यावेळी एका खबऱ्याने त्यांची माहिती ब्रिटीश अधिकाऱ्यांना दिली. त्यावेळी ब्रिटीश सैन्याने संपूर्ण उद्यानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार सुरू केला. यादरम्यान आझाद यांनीही ब्रिटीश सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. इतिहासकारांच्या मते, आझाद यांच्याजवळील बंदुकीतील गोळ्या संपल्या होत्या. त्यामुळे ते जास्तवेळ ब्रिटीश सैनिकांचा सामना करू शकत नव्हते.

स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून दिली प्राणाची आहुती

काहीही झालं तरी आपण ब्रिटिशांच्या तावडीत जिवंत सापडायचं नाही, असा निश्चय चंद्रशेखर आझाद यांनी केला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या बंदुकीतील शेवटची गोळी स्वत:च्या डोक्यात झाडून घेतली. प्राण गेल्यानंतरही आझाद यांच्याजवळ जाण्याची ब्रिटीश सैनिकांची हिंमत नव्हती. खात्री पटल्यानंतर ब्रिटीश सैन्य त्यांच्याजवळ गेले आणि आझाद यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या उद्यानात आझाद यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्या उद्यानाला चंद्रशेखर आझाद उद्यान असे नाव देण्यात आले. पोलिसांच्या गोळीबारापासून बचाव करण्यासाठी आझाद यांनी ज्या झाडाचा आक्षय घेतला होता, त्या झाडासमोर त्यांचे स्मारकही उभारण्यात आलं.