भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आहे. आज २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम हे लँडर चंद्रपृष्ठावर उतरणार आहे. रशियानेही लूना-२५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ऐन वेळी रशियाच्या या यानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते चंद्रपृष्ठावर कोसळले. असे असताना भारताची चांद्रयान मोहीम किती यशस्वी होणार याकडे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या चांद्रयान-२ व चांद्रयान-१ या मोहिमांचीही आता चर्चा होत आहे. त्यामुळे भारताच्या या मोहिमा काय होत्या? त्यामध्ये भारताला कितपत यश आले? भारताला कोणकोणत्या अडचणींचा समाना करावा लागला होता? हे जाणून घेऊ या …

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चांद्रयान-१ साठी अब्दुल कलाम यांचा खास सल्ला

२००८ साली भारताने चंद्रावर संशोधन करण्यासाठी चांद्रयान-१ ही मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम फक्त ऑर्बिटर होती. या मोहिमेसाठी अंतराळयानाचे सुटे भाग एकत्र करण्यात येत होते, तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) भेट दिली होती. या भेटीबाबत ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी सांगितले आहे. या भेटीदरम्यान भारताचे यान चंद्रावर पोहोचले हे जगाला कळावे, त्याचा पुरावा आपल्याकडे असावा म्हणून आपण काय करणार आहोत? असे त्यांनी विचारले.

“फक्त फोटो पुरेसे नाहीत”

यावेळी भारतीय संशोधकांनी सांगितले की, चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर हे यान चंद्रपृष्ठाचे फोटो घेणार आहे. ते फोटो आपल्याकडे असतील. अब्दुल कलाम यांनी मान हलवली आणि फक्त फोटो पुरेसे नसल्याचे सांगितले. भारताने यानात एखादे उपकरण ठेवले पाहिजे. तसेच भारताची ओळख म्हणून ते उपकरण चंद्रपृष्ठावर टाकले पाहिजे, असा सल्ला दिला.

कलाम यांच्या या सल्ल्यावर इस्रोतील संशोधकांनी विचार केला आणि त्यानुसार अंतराळयानाच्या रचनेत बदल करण्याचे काम सुरू केले. कलाम यांच्या सल्ल्यानुसार भारताच्या संशोधकांनी मून इम्पॅक्ट प्रोब या नावाचे उपकरण तयार केले. नंतर ठरल्यानुसार भारताने चंद्रपृष्ठावर ते उपकरण टाकले.

चांद्रयान-२ साठी रशिया करीत होता मदत; पण;…

रशियाचे लूना-२५ हे यान नुकतेच चंद्रावर कोसळले आहे. रशियाचे अशाच प्रकारचे एक लँडर भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेंतर्गत चंद्रपृष्ठावर जाणार होते; मात्र ते शक्य झाले नाही. चांद्रयान-२ मोहिमेत भारताच्या अंतराळयानात लँडर व रोव्हर ही दोन उपकरणे होती. ही दोन्ही उपकरणे घेऊन यान २०११-१२ या कालावधीत अवकाशात झेपावणार होते. मात्र, त्या काळात भारताकडे स्वत:चे लँडर आणि रोव्हर नव्हते. त्यामुळे चांद्रयान-२ या मोहिमेसाठी रशियाची मदत घेण्यात येणार होती. म्हणजेच चांद्रयान-२ ही मोहीम रशिया आणि भारत अशा दोन देशांकडून संयुक्तपणे पार पाडली जाणार होती. या मोहिमेत भारत रॉकेट व ऑर्बिटर देणार होता; तर रशियाकडून लँडर व रोव्हर पुरवले जाणार होते.

… आणि भारताने तयार केले स्वत:चे लँडर व रोव्हर

ठरल्यानुसार दोन्ही देशांनी आपले काम सुरू केले होते. मात्र, रशियाच्या लँडर व रोव्हरमध्ये वेगवेगळ्या मोहिमांदरम्यान तांत्रिक अडचणी येत होत्या. परिणामी रशियाच्या रोसकोसमोस या अंतराळ संशोधन संस्थेला आपल्या लँडर व रोव्हरच्या संरचनेत बदल करावे लागले. रशियाने तयार केलेले लँडर व रोव्हर आकाराने खूप मोठे होते. ते भारताच्या रॉकेटवर बसणे अशक्य होते. परिणामी रशियाने या मोहिमेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

…म्हणून २०१९ पर्यंत वाट पाहावी लागली

रशियाच्या या निर्णयामुळे नंतर इस्रोने स्वत:च लँडर व रोव्हर यांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यासाठी इस्रोला बराच वेळ लागला. भारताच्या चांद्रयान-२ ला भरारी घेण्यास २०१९ पर्यंत वाट पाहावी लागली.

भारताची आगामी मोहीम चांद्रयान नाही

अन्य देशांत चांद्रमोहिमांची एक साखळी आहे. जसे की रशिया आपल्या चांद्रमोहिमांना लूना-२३, लूना-२४, लूना-२५, लूना-२६ अशी नावे देतो. भारताच्याही पुढच्या चांद्रमोहिमांची नावे ही चांद्रयान-४, चांद्रयान-५, चांद्रयान-६ अशीच असतील. मात्र, त्याआधी भारत व जपान चांद्र संशोधनासाठी एक संयुक्त मोहीम राबवणार आहे. या मोहिमेला लुपेक्स (LUPEX)असे नाव दिलेले आहे. या मोहिमेंतर्गत २०२४-२५ साली अंतराळयान अवकाशात झेपावण्याची शक्यता आहे.

युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे रशियाच्या चांद्रमोहिमांना फटका

दुसरीकडे चंद्रावर संशोधन करण्यात रशियादेखील तेवढाच उत्सुक आहे. रशियाने लूना-२६, लूना-२७ या मोहिमांची तयारी केलेली आहे. त्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीदेखील (ईएसए) मदत करणार आहे. लूना-२५ या मोहिमेसाठीही ‘ईएसए’ने रशियाला सहकार्य केलेले आहे. ईएसएने लूना-२५ मोहिमेत नेव्हिगेशन कॅमेरा व ऑप्टिकल नेव्हिगेशन सिस्टीम पुरवली होती. लूना-२६ व लूना-२७ या मोहिमांसाठी ईएसए संस्था रोबोटिक्स तंत्रज्ञनावर आधारलेली काही उपकरणे देणार होती. रशियाच्या मंगळ मोहिमांसाठीही अशाच प्रकारचे सहकार्य करण्यात येत होते.

रशिया आता नासाकडून मदत घेणार

मात्र, रशियाने युक्रेनविरोधात युद्ध छेडल्यामुळे ईएसएने या सर्व मोहिमांतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता रशियाला ईएसएकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. ईएसएकडून मिळणारी मदत आता रशिया नासाकडून घेत आहे.

जपान, इस्राईल हेदेखील शर्यतीत

गेल्या काही दशकांत एकूण पाच देशांनी चंद्रपृष्ठावर उतरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये चीन, इस्राईल, भारत, जपान व रशिया या देशांचा समावेश आहे. मात्र, या मोहिमांत आतापर्यंत फक्त चीनला यश आलेले आहे. इस्राईल व जपान यांनी अनुक्रमे बेरेशीट व हाकुटो-आर या मोहिमा राबवल्या आहेत. या दोन्ही मोहिमा तेथील खासगी अंतराळ संशोधन संस्थानी राबवल्या होत्या. सध्या जपानची JAXA अंतराळ संशोधन संस्था आपले अंतराळयान चंद्रावर पाठवण्याचा प्रयत्न करीत आहे. या मोहिमेला जपानने SLIM म्हणजेच स्मार्ट लँडर ऑफर इन्व्हेस्टिगेटिंग मून असे नाव दिले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 2 lander to land on moon know about chandrayaan 1 and chandrayaan 2 mission prd