(टीप: हा मूळ लेख इंडियन एक्स्प्रेस मध्ये दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित झालेला आहे. या लेखाचे मूळ लेखक मिथकशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक देवदत्त पटनाईक हे आहेत.)
आपल्याकडे अनेक स्वर्गीय कथा, दंतकथा, आख्यायिका आहेत ज्या, आपल्या सांस्कृतिक सत्याचा अविभाज्य भाग आहेत, आपल्या भारतीयत्वाची एक ओळख आहेत. त्यापैकी शिव आणि चंद्राविषयी काही कथा, दंतकथा, आख्यायिका यांचा आढावा चांद्रयान-३ च्या निमित्ताने…
चांद्रयान- तीन जसे चंद्रावर उतरले, अशाच स्वरूपाचे काहीतरी सांगणारे रहस्य भारताचे विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावात दडले आहे. चंद्रचूड या नावाचा अर्थ “ज्याच्या ललाटावर चंद्र आश्रय घेतो” असा आहे. चंद्रचूड हे शिवाचेच एक नाव आहे.
शिव आणि चंद्र यांच्यातील ऋणानुबंध
शिवाने चंद्राला मस्तकी का धारण केले, यामागे अनेक कथा आहे. त्यापैकी एक म्हणजे खूप आधी चंद्राला रोगग्रस्त- क्षय होण्याचा (wasting disease) शाप मिळाला होता. चंद्राला २७ पत्नी (नक्षत्र) होत्या, असे असूनही चंद्र केवळ एकाच पत्नीची बाजू घेत असे, त्यामुळे हा शाप मिळाला होता. दुसर्या एका कथेनुसार, चंद्राचा क्षय होवू लागला, कारण त्याने बृहस्पतीची पत्नी तारा हिच्याबरोबर पळून जाण्याचे धाडस केले. दोन्ही बाबतीत, तो क्षीण होवू लागला. तो कायमचा नाहीसा होईल या भीतीने त्याने मदतीसाठी देवांकडे धाव घेतली. देवांनी त्याला शिवाची उपासना करण्यास सांगितले. (साहजिकच येथे प्रश्न असा पडतो की, इतके सगळे देव असताना भगवान शिवचं का?).
आणखी वाचा: हिंदू राजांनी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तू नष्ट केल्या होत्या का?
शिवच का? आणि चंद्रकोरीचा आणि शिवाजी महाराजांचा संबंध कसा?
कारण शिवाच्या जटांमधून गंगा उगम पावते जिच्यामध्ये मृतांचा पुनर्जन्म होण्यास मदत करण्याची शक्ती आहे. मृतांना जीवनाची आणखी एक संधी जर शिव देऊ शकत असेल तर तो निश्चितपणे लुप्त होत चाललेल्या चंद्राचे पुनरुत्थान करू शकतो. याच कारणामुळे चंद्राला शिवाची उपासना करण्यास सांगण्यात आले. पौराणिक कथेनुसार, चंद्राने शिवाची उपासना केली. त्याच्या उपासनेवर प्रसन्न होवून शिव चंद्रासमोर प्रकट झाले. गुजरातच्या किनार्यावर, ज्याला आपण आता सोमनाथ म्हणतो, त्या जागेवर शिव चंद्रासमोर प्रकट झाले आणि चंद्राला त्याच्या जटांवर धारण केले आणि त्याला पुन्हा उभारी देण्यास मदत केली.
सोम ही नवनिर्मितीची वैदिक औषधी वनस्पती आहे. त्यातून शिवाची ओळख होते. कालांतराने, चंद्रालाच सोम म्हणून ओळखले जाऊ लागले, कारण तो पुन्हा निर्माण होतो आणि आपल्या सर्वांना आठवण करून देतो की आकार, शक्ती, तीव्रता कमी- अधिक होत असते, हे कालचक्र आहे. जे कमी होते ते पुन्हा उसळून वरही येते. मग ती मंदिरे असोत, लोकशाही असो किंवा नागरी समाज असो! आख्यायिकेनुसार, १७ व्या शतकात मुघलांच्या अधिपत्याला झुगारून मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कपाळावर चंद्राची खूण घेतली होती. त्याला “चंद्र-कोर” म्हणतात. स्वातंत्र्याचा (स्वराज्याचा) विचार कधीही सोडू नये यासाठी लोकांना प्रेरणा देण्यासाठी, अमावास्येच्या अंधाऱ्या रात्रीनंतर प्रकाशाची सुरूवात होते आणि आपण पौर्णिमेच्या दिशेने मार्गक्रमण करतो हे सर्वांना स्मरण करून देण्यासाठी हे होते, असे अभ्यासक मानतात. तेव्हापासून महाराष्ट्रातील शूर योद्धा स्त्री-पुरुषांनी पारंपारिक तिलकासोबत आपल्या राजाच्या गतिमान चंद्र-कोरीची निवड केली आहे.
चंद्रकोर आणि इस्लाम
बर्याच लोकांसाठी अर्धचंद्र इस्लामचे प्रतीक आहे, कारण ती कोर पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या ध्वजांवर दिसते. हे खरेतर ऑट्टोमन साम्राज्याचे प्रतीक आहे, मध्ययुगीन काळात ज्या साम्राज्याने पूर्व युरोप आणि पश्चिम आशियाचा बराचसा भाग नियंत्रित केला होता, त्यांचे ते राजचिन्ह होते. आणि चंद्रकोर त्यांनी केवळ १५ व्या शतकापासून वापरण्यास सुरुवात केली होती. बायझॅन्टियमच्या विजयानंतर संस्थापक उस्मानने एका क्षितिजापासून दुसऱ्या क्षितिजापर्यंत पसरलेल्या अर्धचंद्राचे स्वप्न पाहिले. मूलतः हे स्वप्न त्याच्या साम्राज्याची व्याप्ती दर्शवते. ऑट्टोमन सुलतान जवळपास चार शतके खलिफा मानला जात होता.
आणखी वाचा: तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा !
चंद्र आणि प्राचीन भारतीय राजे
राजेशाहीशी चंद्राचा संबंध प्राचीन आहे. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त याला असे नाव देण्यात आले, कारण एका जैन कथेनुसार, त्याच्या आईला चंद्राचे पाणी प्यायची इच्छा होती. चाणक्याने चंद्रप्रकाशात ठेवलेले पाणी म्हणजेच चंद्रप्रकाश आणि चंद्रकोरीचे प्रतिबिंब पडलेले पाणी तिला दिले होते. म्हणूनच मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त म्हणून ओळखला गेला, अशी आख्यायिका आहे.
भारताचे दोन वंश चांद्रवंश आणि सूर्यवंश
हिंदू धर्मशास्त्रानुसार, भारतात नेहमी दोन राजवंश होते, जे सूर्यापासून अवतरले/ उत्पन्न झाले ते सूर्यवंशीय आणि जे चंद्रावरून उत्पन्न झाले ते सोमवंशीय. रामायण ही सौर वंशातील राजांची कथा आहे तर महाभारत ही चंद्रवंशातील राजांची कथा आहे. भारतातील बहुतेक राजे त्यांचा वंश यापैकी एका वंशात शोधतात दख्खनच्या यादव राजांनी त्यांचा वंश चंद्र-देवात शोधला होता.
राम आणि चंद्र यांच्यातील ऋणानुबंध
सौर वंशातील असलेल्या रामाला रामचंद्र का म्हणतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच्या नावात चंद्र का आहे? यामागे लोकप्रिय कथा अशी आहे की त्याचे चंद्रावर इतके प्रेम होते की जोपर्यंत त्याची आई त्याला त्याच्या पलंगाच्या शेजारी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात चंद्राचे प्रतिबिंब दाखवत नाही तोपर्यंत त्याला झोप येत नव्हती. त्याने चंद्राला आपल्या आईचा भाऊ म्हणून पाहिले, म्हणूनच रामाप्रमाणे आजही आपण चंद्राला चांदो-मामा, प्रिय मामा असे संबोधतो, जो आपल्या बहिणीच्या घरी नियमित येतो परंतु नेहमी निघून जातो.
देवदत्त पटनाईक यांनी पुढे म्हटल्याप्रमाणे, जयपूरमधील एका टॅक्सी चालकाने त्यांना एकदा वेगळे स्पष्टीकरण दिले. टॅक्सी चालकाने सांगितल्याप्रमाणे, ‘रामाने पत्नी सीतेचा त्याग केल्यामुळे, त्याच्या राजेशाही प्रतिष्ठेला चंद्राने ग्रहण लावले होते आणि त्यामुळे त्याच्या नावात नेहमी चंद्र असतो’.
चंद्राचा मुंडा जातीशी असलेला संबंध
व्युत्पत्तिशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आज आपण चंद्रासाठी मास हा शब्द वापरतो तो इंडो-आर्यांचा नसून स्थानिक मुंडा जमातींमधून आला आहे. आर्य पुरुषांनी स्थानिक आदिवासी स्त्रियांशी विवाह केला आणि म्हणूनच वैदिक शब्दसंग्रहात मिश्रण आढळते, ते ध्वनी, शब्द आणि व्याकरण यांचे मिश्रण होते. काही गोष्टी वडिलांकडून आलेल्या आहेत तर काही आईकडून आल्या आहेत. मुंडा माता चंद्राला मां म्हणत. चंद्राचे एक चक्र एका महिन्याची (मास) वाढ करते. ज्यावेळी चंद्राच्या पूर्ण कला असतात त्यावेळी पौर्णिमा- पूर्णा-मा होते. आणि त्याच कलांचे क्षय होते त्यावेळी अमावस्या होते म्हणजे अ-मा होते.
आणखी वाचा: इंग्रज ताजमहाल चोरून नेणार होते? इतिहासातील पुरावे काय सांगतात?
चंद्र आणि बुद्ध
कला- चित्र- शिल्पामध्ये चंद्र देव हा नेहमी राजहंस किंवा हरिणाने युक्त रथावर दर्शविला जातो. त्याच्या हातात ससा असतो, म्हणून त्याला शशांक म्हणतात. हा काही सामान्य ससा नाही. तो बुद्ध आहे, त्याच्या पूर्वीच्या आयुष्यातला. जातक कथेनुसार, या सशाने भुकेल्या माणसाला अन्न देण्यासाठी स्वत:ला ज्वालेत समर्पित केले होते, त्यामुळे आकाशातील देव प्रभावित झाले, आणि यामुळे त्या ससास्वरूपी बुद्धाला चंद्रावर कायमस्वरूपी निवास मिळाला.
या सर्व कथा भारताचे सांस्कृतिक सत्य आहेत. पण आता भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेल्या चांद्रयान (चंद्र-वाहन) नावाच्या उपग्रहासह वैज्ञानिक सत्याचा मार्ग पत्करला आहे. ही दोन्ही सत्ये आपले भारतीयत्व घडवतील, यामुळे अभिमानाने आपली मान उंचावेल आणि आशा आहे की आपल्याला शहाणेही करतील!