भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला १४ जुलै (शुक्रवार) रोजी सुरुवात झाली आहे. या यानाने यशस्वीरित्या उड्डाण केले असून ते चंद्राच्या दिशेने झेपावले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून (SDSC ) दुपारी २.३५ वाजता या यानाने उड्डाण घेतले. दरम्यान, या मोहिमेसाठी सतीश धवन अंतराळ केंद्राच्या निर्मितीसाठी श्रीहरीकोटाचीच निवड का करण्यात आली? सतिश धवन अंतराळ केंद्राची निर्मिती कशी झाली? या अंतराळ केंद्राची विशेषता काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या..
१९७१ साली अंतराळ केंद्र कार्यान्वित
सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतातील सर्व उपग्रह, अंतराळयान प्रक्षेपित केले जातात. ९ ऑक्टोबर १९७१ रोजी रोहिणी-१२५ नावाच्या एक छोट्या यानाच्या प्रक्षेपणानंतर हे अंतराळ केंद्र प्रत्यक्षात कार्यान्वित झाले. अगोदर या अंतराळ केंद्राला श्रीहरीकोटा रेंज (SHAR) म्हटले जायचे. मात्र इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांच्या सन्मानार्थ सप्टेंबर २००२ मध्ये या अंतराळ केंद्राचे नाव सतीश धवन अंतराळ केंद्र असे करण्यात आले.
संशोधकांना अंतराळ केंद्रासाठी श्रीहरीकोटा योग्य का वाटले?
भारतातील शास्त्रज्ञांना अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचा वेगळा ठसा उमटवायचा होता. त्यामुळे भारताकडे स्वत:चे अंतराळ केंद्र असणे गरजेचे होते. त्यासाठी योग्य जागेचा शोध सुरू झाला. अंतराळ केंद्रासाठी योग्य ठिकाणाचा शोध घेण्याच्या मोहिमेला साधारण १९६० साली सुरूवात झाली होती. भारतीय अंतराळ कार्यक्रमाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात अंतराळ केंद्राच्या उभारणीसाठी योग्य शोधण्याचे काम केले जात होते. ही जाबाबदारी धवन यांनी सहकारी शास्त्रज्ञ ई. व्ही चिटणीस यांच्यावर सोपवली होती. इस्त्रोतील एका माजी शास्त्रज्ञाने ‘फ्रॉम फिशिंग हॅम्लेट टू रेड प्लॅनेट : इंडियाज स्पेस जर्नी’ या पुस्तकात तशी माहिती दिली आहे.
१९६८ साली जागेचा शोध सुरू झाला
अंतराळ केंद्रासाठी जागा शोधण्यासाठी चिटणीस यांनी १९६८ साली आंध्र प्रदेशच्या उद्योग विभागाचे संचालक अबीद हुसैन यांची मदत घेतली. त्यांच्या मतदीने चिटणीस यांनी अंतराळ केंद्रासाठी योग्य असणाऱ्या संभाव्य जागांची माहिती गोळा केली. त्या जागांचे नकाशे तयार केले. या प्रक्रियेबाबत चिटणीस यांनी एका मुलाखतीत सविस्तर सांगितले आहे. याच मुलाखतीचा आधार घेत फ्रॉम फिशिंग हॅम्लेट टू रेड प्लॅनेट : इंडियाज स्पेस जर्नी या पुस्तकात “ऑगस्ट महिन्यात विक्रम साराभाई यांनी श्रीहरीकोटा या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा गेलो. तेव्हा आम्ही श्रीहरीकोटा येथील साधारण ४० हजार एकर जमीन घेतली. ही प्रक्रिया खूप जलद गतीने पार पडली. आम्ही पूर्ण केलेली ही सर्व प्रक्रिया आणि त्याची गती आश्चर्यकारक होती, असे चिटणीस यांनी एका मुलाखतीत सांगितले होते,” असे पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे.
अंतराळ केंद्रासाठी श्रीहरीकोटाची निवड का करण्यात आली?
भारतीय अंतराळ केंद्राची उभारणी करण्यासाठी श्रीहरीकोटा हे स्थान निवडण्यामागे दोन मुख्य कारणे होती. यातील एक कारण म्हणजे श्रीहरीकोटा हे ठिकाण भारताच्या पूर्वेकडे आहे. भारताच्या पूर्व भागातून यानाचे किंवा उपग्रहाचे प्रक्षेपण करणे तुलनेने सुलभ आणि सोपे आहे. कारण पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्व दिशेला वेगाने फिरत असते. तेव्हा या गतीचा फायदा घेत श्रीहरीकोटावरुन आणखी पूर्व दिशेला प्रक्षेपक-रॉकेट हा आणखी वेगाने जाऊ शकतो. त्यातच श्रीहरीकोटा हे विषुववृत्ताच्या जवळ असल्याने पृथ्वीचा वेग हा तिथे सर्वात जास्त असतो, प्रक्षेपकाला त्यामुळे चांगली गती मिळते. तसंच श्रीहरीकोटा हे एका किनारपट्टीवर असून त्याच्या पूर्व-दक्षिण दिशेला पश्चिम बंगालचा अथांग समुद्र पसरला आहे. त्यामुळे ऐनवेळी काही दुर्घटना झाली तर प्रक्षेपकाचे जळते आणि जमीनीच्या दिशेने वेगाने येणारे अवशेष भर वस्तीऐवजी ते समुद्रात कोसळणे हे केव्हाही सुरक्षित.
त्याचबरोबर असा परिसर भरवस्तीपासून कोसो दूर असल्याने, आजुबाजूला पाणथळ परिसर, समुद्राचा परिसर असल्याने या जागेची सुरक्षा राखणे हे तुलनेत सोपे होते.
अंतराळ केंद्राच्या जवळच समुद्रकिनारा
यानांच्या, उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा हेच ठिकाण निवडण्यामागे त्याची भौगोलिक स्थिती हेदेखील एक महत्वाचे कारण आहे. श्रीहरीकोटा समुद्राच्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे यानाचा मार्ग हा पूर्णपणे समुद्रावरूनच जातो. त्यामुळे कोणत्याही अडथळ्यांविना ही मोहीम यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
सतीश धवन कोण होते?
सतीश धवन यांचा जन्म श्रीनगर येथे झाला होता. ते भारतातील प्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ होते. त्यांना ‘फादर ऑफ एक्सपेरिमेंटल फ्लुइड डायनॅमिक्स रिसर्च’ असे म्हटले जाते. इस्त्रोच्या संचालकपदी असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या. त्यांच्या कार्यकाळात अंतराळ संशोधनात भारताने महत्त्वाची कामगिरी केली. त्यांची मेहनत आणि मार्गदर्शनाखाली इस्त्रोने INSAT- टेलिकम्यूनिकेशन सॅटेलाईट, IRS- इंडियन रिमोट सेंन्सिग सॅटेलाईट, PSLV- पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल अशा वेगवेगळ्या उपग्रहांची निर्मिती केली. या कामिगीरीमुळे भारताला अंतराळ संशोधन करणाऱ्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळाले. दरम्यान त्यांच्या निधनानंतर २००२ साली त्यांच्या सन्मानार्थ श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्राला सतीश धनवन अंतराळ केंद्र असे नाव देण्यात आले.