भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. या मोहिमेत चांद्रयान-२ व असलेले विक्रम हे लँडर चंद्रपृष्ठावर उतरले आहे. विक्रम लँडरमधील प्रज्ञान हे रोव्हरदेखील चंद्रावर उतरले असून त्याने माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, ही मोहीम चंद्रावरील फक्त एका दिवसाची असणार आहे. त्यानंतर चंद्रावर रात्र झाल्यानंतर लँडर आणि रोव्हर यांची काम करण्याची क्षमता खूप कमी होणार आहे. त्यामुळे आपली मोहीम फत्ते केल्यानंतर चांद्रयान, लँडर आणि रोव्हर यांचे काय होणार? ते पृथ्वीवर परतणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…
चांद्रयान चंद्रपृष्ठावर उतरल्यापासून काय काय घडले?
भारताचे चांद्रयान-३ २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रपृष्ठावर उतरले. त्यानंतर आता या यानातील विक्रम नावाचे लँडरही चंद्रावर उरले आहे. या विक्रम लँडरमध्ये प्रज्ञान नावाचे रोव्हर आहे.लँडर आणि रोव्हर यांची काम करण्याची क्षमता ही चंद्रावरील एका दिवसापुरतीच आहे. विक्रमने चंद्रवर आपले काम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याने चंद्रपृष्ठाचे काही फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. हे फोटो भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने एक्सच्या (पूर्वीचे ट्विटर) माध्यमातून सार्वजनिक केले होते. विक्रम चंद्रपृष्ठावर उतरल्यानंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हरदेखील चंद्रपृष्ठावर उतरले. आता लँडर आणि रोव्हर असे दोघेही त्यांच्यावर सोपवण्यात आलेली कामे करत आहेत. विक्रम चंद्रपृष्ठावर उतरल्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात धुळ झाली होती. या धुळीचे कण प्रज्ञानवर बसण्याचा धोका होता. या धुळीमुळे प्रज्ञानवरील कॅमेरा तसेच इतर उपकरणं खराब होण्याचा धोका होता. त्यामुळे इस्त्रोतील शास्त्रज्ञांनी प्रज्ञानला चंद्रपृष्ठावर उतवरण्याआधी धुळीचे कण खाली स्थिरावण्याची वाट पाहिली.
चंद्रपृष्ठावर उतरल्यानंतर रोव्हरने काम सुरू केले
पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावर धुळीचे कण खाली स्थिरावण्यास जास्त कालावधी लागतो. मात्र सुदैवाने शास्त्रांना अपेक्षित असलेल्या वेळेआधीच विक्रमच्या आजूबाजूची धूळ स्थिरावली आणि प्रज्ञानचाही चंद्रपृष्ठावर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. चंद्रपृष्ठावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञाननेही आपले काम लगेच सुरू केले. त्यानंतर भारत सरकारच्या अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेल्या INSPACE या स्वायत्त कंपनीचे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी रोव्हरचा पहिला फोटो पोस्ट केला होता.
प्रज्ञान रोव्हर चंद्रपृष्ठावर, आता पुढे काय होणार?
चंद्रपृष्ठावर प्रज्ञान रोव्हर वेगवेगळे प्रयोग करणार आहे. ते चंद्रावरील वेगवेगळी माहिती डेटाच्या सुरुपात इस्त्रोकडे पाठवणार आहे. रोव्हर चंद्रपृष्ठावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहे. आपल्या या प्रवसात ते चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करेल. रोव्हरवर अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्टोमीटर हे उपकरण आहे. या उपकरणाच्या माध्यमातून रोव्हर चंद्रावरील रासायनिक संरचनांचा अभ्यास करणार आहे. यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे.
भविष्यातील चांद्रमोहिमांसाठी माहिती उपयोगी पडणार
दुसरीकडे विक्रम लँडरवर तीन पॉलिलोड्स आहेत. या पॉलिलोड्सच्या माध्यमातून चंद्रपृष्ठावरील प्लाझ्मा डेनसिटी तसेच त्यात कालांतराने होत आलेला बदलाचा अभ्यास केला जाणार आहे. विक्रम लँडर चंद्रावरील उष्णता, त्या उष्णतेचे गुणधर्म याचा अभ्यास करणार आहे. यासह लँडर चंद्रावरील सेसीमिसीटी (भूकंपाची तीव्रता), चंद्रपृष्ठाची रचना याचाही अभ्यास करणार आहे. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भविष्यात ज्या मोहिमा आखल्या जातील, त्यांना चांद्रयान-३ मधील लँडर आणि रोव्हरने गोळ्या केलेल्या माहितीची खूप मदत होणार आहे.
माहिती पृथ्वीवर कशी पाठवली जाणार?
लँडर आणि रोव्हर जी माहिती गोळा करेल, ती सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या रुपात इस्त्रोकडे पाठवली जाणार आहे. चंद्राच्या कक्षेत असलेले चांद्रयान-२ चे ऑरबिटर मॉड्यूलही त्यासाठी मदत करणार आहे. कारण या मॉड्यूलवर अजूनही रिसिव्हर्स आहेत. हे रिसिव्हर्स बॅकअप म्हणून काम करणार आहेत. चांद्रयान-२ वरील प्रोपल्शन मॉड्यूल आणि ऑरबिटर ही माहिती पृथ्वीवर पाठवणार आहेत.
चंद्रावरील एक दिवस संपल्यानंतर नेमके काय होणार?
चंद्रावरील एक दिवस हा पृथ्वीवरील १४ दिवसांचा आहे. म्हणजेच जेव्हा पृथ्वीवर १४ दिवस होतात तेव्हा चंद्रावर एक दिवस पूर्ण होतो. चंद्रावरील एका दिवसानंतर तेथे रात्र असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र झाल्यानंतर तेथील वातावरण खूप थंड होते. चंद्रावर सध्या दिवस असल्यामळे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून लँडर आणि रोव्हर काम करण्यासाठी उर्जानिर्मिती करत आहेत. मात्र रात्र झाल्यावर त्यांना उर्जा निर्माण करता येणार नाही. परिणामी त्यांची काम करण्याची क्षमता कमी होईल. असे असले तरी चंद्रावर पुन्हा एकदा दिवस झाल्यावर लँडर आणि रोव्हर आपले काम नव्याने सुरू करू शकतात. तशी शक्यता आहे. मात्र इस्त्रोने लँडर आणि रोव्हर यांचे चंद्रावरील आयुष्य फक्त एका दिवसाचे असेल, असे गृहित धरलेले आहे.
चांद्रयान-३ पुन्हा पृथ्वीवर परतणार का?
आपले काम संपल्यावर चांद्रयान-३ लँडर आणि रोव्हर यांना घेऊन पुन्हा पृथ्वीवर परतणार नाही. इस्त्रोच्या मोहिमेत तसे कोणतेही नियोजन नाही. एकदा काम संपल्यानंतर लँडर, रोव्हर आणि चांद्रयान चंद्रावरच असतील.