India Moon Mission Update : जगात अवकाश तंत्रज्ञानात रुची असणाऱ्यांचे आणि एकंदिरतच संबंध भारताचे चंद्रयान ३ (chandrayaan 3) मोहिमेकडे लक्ष लागलेले आहे. चंद्रावर यान अलगद उतरण्याचा आणि रोव्हरद्वारे संचार करण्याचा प्रयत्न इस्रो (ISRO ) चंद्रयान ३ मोहिमेद्वारे करणार आहे. एकीकडे भारत – इस्रो चंद्रावर जात आहे तर चीनने चंद्रावर आत्तापर्यंत सात मोहिमा यशस्वी करुन दाखवल्या असून २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेची नासा (NASA) २०२५ च्या अखेरीस चंद्रावर तीन अंतराळवीरांना उतरवणार आहे. चंद्राकडे जाण्याचे तंत्रज्ञान असलेली रशिया आता पुन्हा चांद्र मोहिमा हाती घेत आहे. युरोपियन स्पेस एजन्सी, युएई, इस्त्राईल, जपान हे येत्या काळात चंद्रावर मोहिमा आखत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेव्हा चंद्रावर जाण्याची एकच छुपी स्पर्धा जगातील बड्या देशांमध्ये सुरु असल्याचं चित्र आहे. कारण चंद्रावर असलेल्या helium 3 च्या अस्तित्वामुळे चंद्र एक मोठा इंधनाचा स्त्रोत म्हणून भविष्यात ओळखला जाण्याची शक्यता आहे. यामुळेच भविष्याच्या दृष्टीने चंद्राकडे मोहिमा आखल्या जात आहेत.

हेही वाचा… चांद्रयान-३ मोहिमेला १४ जुलैला सुरुवात, चांद्रयान-२ मध्ये नेमकं काय चुकलं ? लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर का कोसळले? जाणून घ्या ….

helium 3 चे महत्व

निष्क्रीय वायू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेलिमयमचे helium 3 हे समस्थानिक (isotopes) आहे. helium 3 हा इतर मुलद्रव्यांप्रमाणे पृथ्वीवर सहज उपलब्ध नाही आणि तो कृत्रिमरित्या तयार करणेही खूप खार्चिक आहे. अणु भट्टीत उर्जा निर्मितीच्या वेळी किंवा अगदी अणु बॉम्ब तयार करण्याच्या प्रक्रियेत helium 3 ची निर्मिती होते. helium 3 चा उपयोग न्युट्रॉनच्या शोधासाठी तसंच वैद्यकीय वापरासाठी काही प्रमाणात केला जातो. अतिप्रगत अशा नव्या fusion प्रक्रियेत (जी अजुनही कादावरच आहे) helium 3 वापर केला तर अणु उर्जेपासून शाश्वत ऊर्जा – वीज मिळू शकते. पण मुद्दा तोच मोठ्या प्रमाणात helium 3 च्या उपलब्धतेतेचा अभाव.

नेमकं हेच helium 3 हे चंद्रावर विपूल प्रमाणात आहे. उपलब्ध माहितीनुसार अंदाज वर्तवण्यात आला असून चंद्रावर helium 3 चे साठे हे काही लाख मेट्रिक टन एवढे असावेत. याचा योग्य पद्धतीने वापर झाला तर पुढील शेकडो वर्षे पुरेल एवढी वीज निर्मिती ही अणु भट्टीद्वारे करणे शक्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे helium 3 हे किरणोत्सारी नाही.

हेही वाचा… चांद्रयान-३ : इस्रोसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव महत्त्वाचा का आहे?

चंद्रावर एवढं helium 3 कसे आले?

सूर्य हा चारही बाजूंना सौर ऊर्जा अविरत फेकत असतो. या सौर वाऱ्यातून helium 3 हा अवकाशात प्रवास करतो. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणामुळे helium 3 पृथ्वीवर प्रवेश करु शकत नाही. तर चंद्रावर वातावरण नसल्याने तसंच अनेक गेल्या कोटी वर्षात अनेक उल्का धडकल्याने helium 3 चंद्रवर पसरला आहे, विवरांमध्ये विपूल प्रमाणात असल्याचा अंदाज आहे. अर्थात या चंद्रावरील मातीवर प्रक्रिया करत helium 3 वेगळा काढावा लागणार आहे.

चंद्रावरील helium 3 वर अनेकांचा डोळा

चीनच्या चांद्र मोहिमांसाठीचा छुपा पण मुख्य उद्देश हा helium 3 हाच असल्याचं गेली काही वर्षे जगात उघडपणे बोललं जात आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील जमीन घेण्याबाबतचे – भूभाग ताब्यात घेण्याबाबतचे कायदे-नियम आहेत तसे सात-बारासारखे कायदे हे चंद्राच्या बाबतील ठरलेच नाही. एवढंच काय पृथ्वीच्या वातावरणाबाहेर मुक्त संचाराचे ठोस असे जगाने मान्य केलेले नियमच नाहीत. त्यामुळे एकेकाळी दक्षिण ध्रुवावरील भूभागावर दावा ठोकण्याची स्पर्धा लागली होती तशी भविष्यात चंद्राच्या जमिनीबाबत लागू शकते. त्यातच चंद्रावर जाणे हे आजच काय भविष्यातही मोजक्या देशांना शक्य होणार आहे. त्यामुळेच चंद्रावर मक्तेदारी ही मोजक्या देशांचीच असणार आहे.

हेही वाचा… विश्लेषण : ‘चंद्रयान-३’ मोहीम काय आहे?

helium 3 पृथ्वीवर आणणे शक्य आहे का?

helium 3 चा वापर हा तिथेच चंद्रावर ऊर्जा निर्मितीसाठी जसा केला जाऊ शकतो तसा पृथ्वीवर आणतही केला जाऊ शकतो. पण मुळात चंद्रावर जाणे हे आज काय भविष्यातील पुढील अनेक वर्षे अत्यंत खार्चिक ठरणार आहे. त्यामुळे चंद्रावर जात , तिथल्या जमिनीखाली असलेला helium 3 प्रक्रिया करत बाहेर काढत पृथ्वीवर आणणे हे सध्या तरी अशक्य आहे. अर्थात जशी अवकाश तंत्रज्ञानात प्रगती होईल हे केव्हाना केव्हा तरी प्रत्यक्षात येईल. सध्या जगात विविध उर्जा स्त्रोत हे संपत चालले आहेत, तेव्हा दिर्घकाळ उर्जा स्त्रोतांबाबत जगात मोठं संशोधन सुरु आहे. तसा तो विकसित झाला तर helium 3 गरज उरणार नाही. तेव्हा सध्या तरी भविष्याच्या दृष्टीने helium 3 ची एक पर्याय म्हणून चाचपणी केली जात आहे.

अमेरिका, चीन यांसारख्या विविध देशांच्या अवकाश तंत्रज्ञानातील स्पर्धेत आपण मागे नसावं, चंद्रापर्यंत पोहचणे, चंद्रावर संचार करणे, चंद्रावरील खनिजांचा तपशील माहित असणे एवढे तरी साध्य व्हावे हाच चंद्रयान ३ मोहिमेचा उद्देश. helium 3 हा काही त्यामधला सध्या तरी मुख्य अजेंडा नाही हे निश्चित.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chandrayaan 3 what is the connection between isros mission and helium 3 on the moon why this mineral is very important asj
Show comments