-मंगल हनवते
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याच्या उद्देशाने म्हाडा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. म्हाडाच्या मालकीच्या जागेवर घरे बांधून सोडत प्रक्रियेद्वारे घरांचे वितरण केले जाते. आधी चिठ्ठ्यांच्या माध्यमातून सोडत काढण्यात येत असे पुढे त्यात बदल होऊन ऑनलाइन पद्धती आली. सोडत आणि सोडतीनंतरच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप होत असून म्हाडा आणि दलालांच्या संगनमताने भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडतीची संपूर्ण प्रक्रिया बदलली असून सोडतपूर्व, सोडतीनंतरची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. पारपत्र काढताना जशी पात्रता तपासली जाते तशीच सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चिती होणार आहे. हे बदल नेमके काय आहेत, यापुढे सोडत कशी काढली जाणार याचा आढावा…
सोडत पद्धती म्हणजे काय?
म्हाडाकडून मुंबईसह राज्यभरात गृहनिर्माण प्रकल्प राबविले जातात. म्हाडाच्या या गृहनिर्माण प्रकल्पात एखादा अपवाद वगळता उपलब्ध घरांच्या तुलनेत घरे घेण्यास इच्छुकांची संख्या अधिक असते. त्यामुळे घरांची विक्री करण्यासाठी म्हाडाने लॉटरी अर्थात सोडत पद्धती स्वीकारली आहे. चिठ्ठ्यांच्या माध्यमातून सोडत काढण्याची प्रक्रिया बंद करून ऑनलाइन सोडत काढण्यास म्हाडाने सुरुवात केली. त्यासाठी अत्याधुनिक संगणक प्रणाली विकसित केली. त्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून सोडत काढली जात असून गरजेनुसार त्यात बदल करून ही प्रणाली आणखी मजबूत केली जात आहे. ही प्रणाली सिडकोलाही देण्यात आली आहे. जाहिरात, अर्जविक्री, स्वीकृती, सोडत आणि सोडतीनंतरची प्रक्रिया सर्व काही ऑनलाइन पार पाडली जाते. म्हाडाच्या सात विभागीय मंडळांकडून सोडत काढली जाते. यात पंतप्रधान आवास योजना, २० टक्के योजना यासह म्हाडा प्रकल्पातील घरांचा समावेश असतो. मुंबई मंडळावर गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीची ही जबाबदारी असून ही सोडतही ऑनलाइन पद्धतीने पार पडते.
सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया काय?
सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया असे दोन टप्पे आहेत. सोडतपूर्व टप्प्यात प्रत्येक मंडळाकडून घरांची जुळवाजुळव करून जाहिरात काढली जाते. या जाहिरातीनुसार ४५ दिवसांचा अवधी इच्छुकांना अनामत रक्कमेसह भरण्यासाठी दिला जातो. मागील काही वर्षांपासून सोडत ऑनलाइन पद्धतीने काढली जात आहे. त्यामुळे अर्जविक्री, अर्जस्वीकृती ऑनलाइन होते. उत्पन्न गटाप्रमाणे अनामत रक्कम निश्चित असते. अनामत रक्कम भरण्यासाठी ऑनलाइनचा पर्याय असतो. बॅंकेत जाऊनही अनामत रक्कम भरता येते. अर्ज सादर झाल्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांची यादी केली जाते. अपात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी जाहीर करून, आक्षेपांनुसार आवश्यक ते बदल करून, त्रुटी पूर्ण करून सोडतीसाठी पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाते. सोडतीतील विजेत्यांची यादी त्याच दिवशी संकेतस्थळावर जाहीर केली जाते. जितकी घरे तितके विजेते आणि तितकेच प्रतीक्षा यादीतील विजेते निवडले जातात. त्यांचीही यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाते. सोडतीनंतर विजेत्यांना अभिनंदन पत्र आणि त्यानंतर प्रथम सूचना पत्र पाठविले जाते. त्यानुसार विजेत्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे बँकेत निश्चित वेळेत सादर करावी लागतात. कागदपत्रांची छाननी, तपासणी करून विजेत्यांची पात्रात निश्चित केली जाते. पात्र विजेत्यांना देकार पत्र देऊन त्यांच्याकडून घराची रक्कम टप्प्याटप्प्याने भरून घेतली जाते. निश्चित वेळेत रक्कम भरणे शक्य नसलेल्या पात्र विजेत्यांना रक्कम भरण्यासाठी काही मुदतवाढ दिली जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून मुद्रांक शुल्क भरल्यास विजेत्यांना प्रत्यक्ष घरांचा ताबा दिला जातो आणि सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण होते. अपात्र ठरलेल्या विजेत्यांना किंवा काही कारणांनी घर नाकारणाऱ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी दिली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पात्र असलेल्या प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना घराचा ताबा दिला जातो. म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळाकडून ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.
मग सोडत प्रक्रियेत बदल का?
सोडत प्रक्रिया ऑनलाइन केल्यानंतरही भ्रष्टाचार सुरूच असून सोडतीनंतरची प्रक्रिया अनेक वर्षे संपत नसल्याचे चित्र आहे. १५/२० वर्षेही एखाद्याला ताबा मिळण्यासाठी लागतात. प्रतीक्षा यादी वर्षानुवर्षे पूर्ण होताना दिसत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन म्हाडाने अखेर सोडतीची संपूर्ण प्रक्रियाच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने हा प्रस्ताव मान्य केला असून आता राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यासाठी नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत आहे. या प्रणालीची चाचणी करण्यात येणार आहे.
नवीन सोडत प्रक्रिया कशी असेल ?
सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. यापुढे प्रतीक्षा यादी नसेल. आता सोडतीची जाहिरात ऑनलाइन प्रसिद्ध केली जाईल. त्यात सर्व तारखा नमूद करण्यात येतील. तसेच अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना आरक्षित प्रवर्गानुसार आणि उत्पन्न गटानुसार कोणकोणती कागदपत्रे हवी आहेत याची यादी असेल. या यादीनुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यास इच्छुकांना सर्व कागदपत्रे स्कॅन करावी लागतील. आवश्यक ती कागदपत्रे असतील तरच अर्ज भरता येईल. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज भरल्यानंतर मंडळाकडून कागदपत्रांची छाननी करण्यात येईल. त्यात पात्र ठरणारा अर्जदार पुढे सोडतीत सहभागी होऊ शकेल. आतापर्यंत सोडतीसाठी काही ठराविक (पॅनकार्ड, आधारकार्ड) कागदपत्रे लागत होती आणि सोडतीनंतर विजेत्यांकडून उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला, आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चित केली जात होती. पण आता मात्र अर्ज भरतानाच सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. सोडतीपूर्वी पात्रता निश्चिती पूर्ण होणार आहे. त्यामुळे विजेते ठरल्यानंतर पुढे थेट देकार पत्र देऊन विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असेल. त्यामुळे भ्रष्टाचाराला खीळ बसणार असून दलालांना वाव राहणार नसल्याचा दावा केला जात आहे.