NCRT ने परत एकदा पाठ्यपुस्तकातून अभ्यासक्रम वगळला आहे. यावेळी वगळण्यात आलेला अभ्यासक्रम हा मुघलांचा नसून सजीव उत्क्रांतीचा आहे. प्रसिद्ध निसर्गवादी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी सजीव उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. हा सिद्धांत कालबाह्य असल्याचे सांगत त्यासह संपूर्ण उत्क्रांतीचा इतिहास वगळण्यात आला आहे. यामुळे समाजात अनेक स्वरूपाच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. वारंवार अभ्यासक्रमात होणारे बदल हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून कितपत योग्य आहेत, हेही पाहणे आज काळाची गरज ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डार्विनचा सिद्धांत नेमका काय आहे?

चार्ल्स डार्विन हा ठामपणे सजीव उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा पहिला महत्त्वाचा शास्त्रज्ञ होता. सजीवांमध्ये जगण्यासाठीचा संघर्ष व त्यासाठीची स्पर्धा यासंकल्पनावर त्याने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत महत्त्वाचा आहे. पर्यावरणाशी जुळवून घेणे हे यामागील मुख्य सूत्र आहे. ज्या सजीवांमध्ये आजूबाजूच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता आहे, व त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आहे त्याच सजीवाच्या जाती जगण्याच्या स्पर्धेत तग धरू शकतात. असे प्रतिपादन त्याने आपल्या संशोधनातून केले. याखेरीज मानव, कपींसह सर्व जीवसृष्टी समान प्र-जनकांपासून निर्माण झाली आहे हा त्याचा सिद्धांत वादग्रस्त ठरला. डार्विन याने मांडलेली प्रचलित माकडापासून मनुष्याची उत्पत्ति हा जगभरात अनेकांसाठी वादाचा विषय ठरला आहे. असे असले तरी जगण्याच्या स्पर्धेत टिकाव धरण्याकरिता पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता त्या सजीवाचे भवितव्य घडवते हे सिद्ध झालेले सत्य आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यात मानवाच्या शरीरात आढणाऱ्या अनेक गोष्टी कालानुरूप नष्ट झाल्या. सभोवतालच्या वातावरणात जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत मानवी शरीरात अनेक बदल झालेले दिसून येतात. इतकेच नव्हे तर जे सजीव पर्यावरणीय बदलांसोबत जुळवून घेण्यास असमर्थ ठरले ते नष्ट झाले. त्यामुळेच उत्क्रांतीचा इतिहास जाणून घेणे गरजेचे ठरते.

आणखी वाचा: विश्लेषण: NCRT textbook revision: इतिहास का शिकायचा? पुनर्लेखनाचे परिणाम काय?

डार्विनच्या सिद्धांतावरून नेमका वाद का ?

इथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे डार्विन याने कधीच माकडीण मनुष्याला जन्म देते असे प्रतिपादन केलेले नाही. त्याच्या निरीक्षणाअंती मनुष्य व कपी यांचे पूर्वज एकच असल्याचे तो नमूद करतो. जगण्याच्या व विकासाच्या स्पर्धेत पूर्वज एक असले तरी मनुष्य या प्राण्याने आपल्या बुद्धिमतेच्या जिवावर संघर्ष करून आपण भूतलवार राहण्यास योग्य आहोत हे सिद्ध केले आहे,असे सोप्या शब्दांत म्हणता येईल. इतकेच नाही तर या जगात आपण म्हणजेच माणूस आधिपत्य गाजविण्यासाठी सक्षम आहे हेही त्याने सिद्ध केले आहे. डायनोसॉरसारखे अनेक विशाल- महाकाय प्राणी निसर्ग बदलांमध्ये तग न धरू शकल्याने आपले अस्तित्त्व गमावून बसले. डार्विन याने मांडलेला हा सिद्धांत वेळोवेळी सिद्ध होत आहे. त्याच्या सिद्धांताला आज भारतात विरोध होत असला तरी याची खरी सुरुवात पाश्चिमात्य देशांमध्ये झाली होती. बायबल नुसार संपूर्ण जीवसृष्टीची उत्पत्ति व विकास हा सहा दिवसात पूर्ण झाला होता. तसेच मनुष्य जन्माविषयीच्या दैवी कथा त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा तिथल्या धार्मिक संकल्पनेला छेद जाणारा असल्याने चर्चकडून वेळोवेळी विरोध करण्यात आला होता. भारतीय संस्कृतीने नेहमीच वेगवेगळ्या अभ्यासपूर्ण संशोधनाला प्रोत्साहन दिले होते. म्हणूनच आस्तिक व नास्तिक दर्शन हे एकाच संस्कृतीचा अविभाज्य ठरले. असे असताना संस्कृतीचा हवाला देवून एखादे विज्ञानातील संशोधन नाकारणे कितपत योग्य ठरणारे आहे, याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे.

उत्क्रांती शिकणे का महत्त्वाचे ?

पर्यावरण व उत्क्रांती यांचा खूप जवळचा संबंध आहे. उत्क्रांतीकडे अश्मयुगीन मानवाचा इतिहास म्हणून पाहिले जात असले तरी उत्क्रांती ही इतक्या पुरतीच मर्यादित नाही. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण उत्क्रांती अनुभवत असतो. वातावरणातील बदलामुळे सिंधु संस्कृती नष्ट झाली. यासाठी खराब वातावरण हे मुख्य कारण असले तरी त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची मानवी क्षमता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे हे येथे विसरून चालणार नाही. त्यानंतर प्रगत संस्कृती स्थापन होण्यासाठी अनेक शतके लागली. सिंधु संस्कृतीच्या शेवटच्या टप्प्यात वातावरणात अनेक बदल झाले होते. वातावरण अतिशुष्क व थंड होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे अनेकजण स्थलांतरित झाले. व वेगळ्या मार्गाने आपले अस्तित्त्व अबाधित ठेवू शकले. समोर आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची किंवा लढण्याची क्षमता ही डार्विनच्या सिद्धांतातील जगण्यासाठीचा संघर्ष दर्शवते. हेच कोविडच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवते. एकूणच उत्क्रांतीचा इतिहास म्हणजे जगण्याच्या संघर्षाचा इतिहास आहे.

आणखी वाचा: १८ राज्यात ५ कोटी विद्यार्थी असलेल्या NCERT चा अभ्यासक्रम बदलून भाजपाने काय साधले?

वैज्ञानिक सिद्धांत हे चूक किंवा बरोबर हे कोण ठरवितात?

येथे मुख्य गोष्ट म्हणजे एखादा सिद्धांत मांडला जातो त्यावेळेस तो कधीही पूर्णतः स्वीकारला जात नाही. ज्या वेळी त्या संशोधनास समाज मान्यता मिळते त्यावेळी ते संशोधन अनेक स्थित्यंतरातून गेलेले असते. संशोधन क्षेत्र हे प्रयोगशील क्षेत्र आहे. अभ्यासक आपल्या संशोधनाच्या आधारे सिद्धांत मांडत असतात. मांडलेला सिद्धांत सिद्ध झाल्याशिवाय स्वीकारला जात नाही. किंबहुना कालानुरूप नव्याने झालेल्या अभ्यासामुळे मूळच्या संशोधनात बदल घडून येत असतात. होणारे हे बदल कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. नव्याने झालेल्या बदलामुळे मूळच्या संशोधनाचे महत्त्व कमी होत नाही. उलट नव्या संशोधनाचे प्रेरणा स्थान हे मूळचे संशोधन असते हे विसरून चालत नाही. म्हणूनच संशोधन क्षेत्रातील ‘रिसर्च मेथोडोलॉजी’मध्ये आधी झालेल्या संशोधनाचा आढावा हा संशोधनाचा पायाभूत मानला जातो. पूर्वी झालेले संशोधन हे कधीच चुकीचे किंवा बरोबर नसते. त्या संशोधनातीत तथ्यता येणारा काळ ठरवत असतो. म्हणूनच डार्विनचा सिद्धांत हा सरसकट काढून टाकणे हे तत्त्वतः चुकीचे आहे. यामुळे केवळ दोन गोष्टी घडू शकतात येणाऱ्या काळात संशोधन करणे हे पूर्णतः थांबविले जाईल किंवा केवळ स्तुतीसुमने गाणारा इतिहास व संशोधनच तयार करण्यात येईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in ncert textbooks remove darwins evolution theory svs
Show comments