राखी चव्हाण

भारतात तब्बल सात दशकानंतर चित्ता परतला. नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून हे चित्ते आणून ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. भारतासाठी हा खरे तर अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पण हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला. काही चित्त्यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मध्यप्रदेश सरकारला फटकारले. मात्र, ‘चित्ता स्टेट’चा दर्जा कायम राखण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांनाही जुमानले नाही. आता या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे, पण पहिल्या टप्प्यावरील प्रश्नचिन्ह कायम असताना या दुसऱ्या टप्प्याची तयारी कितपत योग्य, असा प्रश्न चित्त्यांच्या भारतातील पुनर्वसन वर्षपूर्तीनिमित्त उपस्थित केला जात आहे.

भारतात कुठून, कधी व किती चित्ते आणण्यात आले?

१७ सप्टेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामिबियाहून भारतात पहिल्या तुकडीत आठ चित्ते आणले गेले. यात पाच मादी व तीन नर चित्त्यांचा समावेश होता. तर दुसऱ्या तुकडीत १८ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते भारतात आले. यात सात नर आणि पाच मादी चित्त्यांचा समावेश होता. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांची रवानगी करण्यात आली.

कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या क्षमतेवर तज्ज्ञांचे प्रश्नचिन्ह का?

कुनो राष्ट्रीय उद्यानाची क्षमता १० ते १२ चित्ते राहू शकतील इतकीच असून जास्तीत जास्त येथे १५ चित्ते तेथे राहू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अभयारण्यात प्रतिचौरस किलोमीटर २० चितळ आहेत आणि चित्त्यांच्या शिकारीसाठी पुरेसे भक्ष्य नाही. चित्त्यांना चिंकारा व इतर प्राण्यांची सवय आहे. चितळ त्यांची भूक शमवू शकत नाहीत. कुनोमध्ये आतापर्यंत २० चित्त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे. आणखी चित्ते सोडल्यास मानव-चित्ता संघर्ष सुरू होण्याची भीती आहे. एक नर व एक मादी चित्ता अलीकडेच राष्ट्रीय उद्यानाची सीमा ओलांडून गावाजवळ पोहोचले होते.

आणखी वाचा-नेहरू, माऊंटबॅटन यांसारख्या नेत्यांनी भेट दिलेला लंडनमधील ‘इंडिया क्लब’ का बंद झाला?

चित्त्यांच्या मृत्यूनंतर काय म्हणाले होते सर्वोच्च न्यायालय?

पहिल्या तीन चित्त्यांच्या मृत्यूनंतर न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. यावेळी त्यांनी केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकारला चित्त्यांच्या मृत्यूंबाबत जाब विचारला. परदेशातून चित्ते आणत आहात ही चांगली गोष्ट, पण त्याचे संरक्षण, संवर्धन तेवढेच आवश्यक आहे. तुम्ही कुनोपेक्षा अधिक योग्य अधिवास का शोधत नाही, असाही प्रश्न न्यायालयाने केला. कुनो राष्ट्रीय उद्यान इतके चित्ते सामावून घेण्यासाठी पुरेसे नाही. राजस्थानमधील मुकुंद्रा व्याघ्रप्रकल्पात हे चित्ते अधिक चांगल्या प्रकारे राहू शकतील. यात कोणतेही राजकारण आणू नये, असेही न्यायालयाने ठामपणे सुनावले.

चित्त्यांच्या मृत्यूची मालिका आणि कारणे काय?

‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्चला मूत्रपिंडाच्या आजाराने, तर ‘उदय’ या चित्त्याचा १३ एप्रिलला हृदय निकामी झाल्यामुळे आणि ‘दक्षा’ या मादीचा ९ मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर ११ जुलैला ‘तेजस’, १४ जुलैला ‘सूरज’ तर दोन ऑगस्टला ‘धात्री’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. भारतात चित्ते आल्यानंतर त्यातील एका मादी चित्त्याने २४ मार्चला चार बछड्यांना जन्म दिला. मात्र, २३ मे रोजी एक तर २५ मे रोजी दोन बछडे मृत्युमुखी पडले.

आणखी वाचा- पशुपालनामुळे जागतिक तापमान वाढ? नेमकी कारणे कोणती?

प्रशिक्षणानंतरही पुन्हा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची गरजच का?

नामिबिया व दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूची मालिका सुरू झाली. सहा प्रौढ चित्ता आणि तीन बछड्यांच्या मृत्यूनंतर कुनोतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नामिबियात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रकल्प सुरू होण्यापूर्वीसुद्धा या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नामिबियात पाठवण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रांमध्ये चित्त्यांना पकडण्याच्या पद्धती, चित्त्यांसाठी सापळे लावणे, चित्त्याचा संपूर्ण गट पकडणे, चित्ता पकडल्यानंतर त्यांना हाताळणे, मानवी सुरक्षा, ट्रँक्विलायझिंग बंदुकीच्या माध्यमातून त्यांना बेशुद्ध करणे, बेशुद्धीकरणाची प्रक्रिया, त्या बंदुकीत बेशुद्धीकरणासाठी टाकण्यात येणारे औषध, त्याचे प्रमाण, बेशुद्धीकरणानंतर त्यांचे व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण या अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण देण्याची गरजच का, हा प्रश्न अजूनही कायम आहे.

चित्त्यांकरिता नवीन ठिकाणे कोणती?

चित्त्यांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना इतरत्र म्हणजेच राजस्थानमधील मुकुंद्रा व्याघ्रप्रकल्पात हलवण्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्देशाला हुलकावणी देत केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकारने चित्ते मध्य प्रदेशातून इतरत्र हलवण्यास नकार दिला. त्याऐवजी मध्य प्रदेशातीलच इतर अभयारण्यात त्यांच्यासाठी आवश्यक ते वातावरण तयार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यानुसार ‘गांधीसागर’ व ‘नौरादेही’ अभयारण्यात चित्त्यांच्या आगमनासाठी तयारी करण्यात येत आहे. मात्र, यात कुनोतील चित्ते ठेवणार की पुढच्या टप्प्यात दक्षिण आफ्रिकेतून येणारे चित्ते ठेवणार, याबाबत संभ्रम आहे.

rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader