-मोहन अटाळकर
तब्बल एका शतकापासून नामशेष मानल्या जाणाऱ्या कासवाच्या प्रजातीपैकी एक मादी कासव २०१९मध्ये जिवंत सापडले. हे कासव गॅलापॅगोस प्रजातीशी संबंधित असल्याची पुष्टी नुकतीच करण्यात आली. या मादी कासवाचे नाव आहे फर्नांडा. जे तिच्या फर्नांडिना बेटाच्या निवासावरून ठेवले गेले. ‘चेलोनॉयइडिस फॅन्टॅस्टिकस’ या प्रजातीचे हे मादी कासव असून दीर्घकाळापासून ही प्रजाती नामशेष मानली जाते. ‘चेलोनॉयइडिस फॅन्टॅस्टिकस’ म्हणजे ‘विलक्षण महाकाय कासव’. फर्नांडिना बेटावर हे आढळून येत होते. १९०६ मध्ये या प्रजातीच्या कासवाची नोंद करण्यात आली. कासवांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असताना फर्नांडाचे नवे पान त्यात जोडले गेले आहे.

फर्नांडा मुळात कोण आहे?

शंभर वर्षांपासून नामशेष असलेल्या कासवांपैकी फर्नांडा या मादी कासवाचा शोध लागला, तेव्हा तिची प्रजाती शोधण्याचा प्रयत्न झाला. हे कासव मूळ फॅन्टॅस्टिकस प्रजातीचे असावे, अशी शंका पर्यावरण शास्त्रज्ञांना आली. आधी नोंद झालेल्या नर कासवाच्या नमुन्यापेक्षा या मादी कासवाची लक्षणे भिन्न होती. तिची वाढ खुंटल्याने तिची वैशिष्ट्ये वेगळी झाली असावीत, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवल्याची माहिती प्रिन्स्टन विद्यापीठाच्या प्रसिद्धिपत्रकातून देण्यात आली.

फर्नांडा कुठे आढळली?

गॅलापॅगोस द्वीपसमूह इक्वेडोरच्या पश्चिमेस ९०६ किमी अंतरावर आहे. तो वनस्पती आणि वन्यजीवांच्या वैविध्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यापैकीच एका बेटावर फर्नांडा २०१९मध्ये आढळून आली. या मादीच्या तोंडाची रचना आणि तिचे कवच पाहून ही त्याच दुर्मीळ प्रजातीची असल्याचे वन्यजीव संशोधकांनी स्पष्ट केले. गॅलापॅगोस नॅशनल पार्क आणि अमेरिकेतील गॅलापॅगोस कॉन्झर्व्हेन्सीकडून यासाठी विशेष संयुक्त शोधमोहीम राबवण्यात आली.

फर्नांडाची प्रजाती कशी निश्चित केली गेली?

प्रिन्स्टन विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि उत्क्रांतीवादी जीवशास्त्राचे संशोधक स्टीफन गॉरान यांनी फर्नांडाचा संपूर्ण जीनोम अनुक्रमित केला आणि १९०६ मध्ये गोळा केलेल्या नमुन्यांमधून तो पुनर्प्राप्त करण्यात सक्षम असलेल्या जीनोमशी त्याची तुलना केली. त्या दोन जीनोमची तुलना गॅलापॅगोस कासवांच्या इतर १३ प्रजातींच्या नमुन्यांशी केली, तेव्हा दोन ज्ञात फर्नांडिना कासव खरोखर एकाच प्रजातीचे सदस्य आहेत, हे लक्षात आल्याचे स्टीफन गॉरान यांनी म्हटले.

कासवाचे महत्त्व काय?

जैवविविधतेत कासवाचे महत्त्व मोठे आहे. जगातील कासवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून मांस, फेंगशुई, जादूटोणा, शिकार आदींसाठी कासवांचा अवैध व्यापार आणि तस्करी लाखो रुपयांच्या घरात जाते. कासवे त्यांच्या निवासस्थानातून पकडून आणली जातात आणि विकली जातात. कासव हा सरीसृप (सरपटणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या कूर्म गणातील (कीलोनिया गणातील) प्राणी. या प्राण्यांच्या ठसठशीत विशिष्ट लक्षणांमुळे ते सहज ओळखू येतात. कूर्म गणात कासवांच्या सुमारे २५० प्रजाती आहेत. कासवे उष्णकटिबंधात राहणारी आहेत पण थोडी समशीतोष्ण प्रदेशातही आढळतात. काही कासवे भूचर असली तरी बाकीची सर्व जलचर असून समुद्रात, गोड्या पाण्यात किंवा पाणथळ जागी राहणारी आहेत. टेस्ट्यूडिनीस म्हणजे कवचधारी. भूकच्छपांचा (जमिनीवरील कासवांचा) समावेश टेस्ट्यूडिनस गणातील टेस्ट्यूडीनिडी कुलात होतो. भूकच्छप हे भूमध्य खोऱ्याच्या आसपास, दक्षिण-उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेपर्यंत, युरेशियापासून आग्नेय आशियापर्यंत आफ्रिका, मादागास्कर आणि प्रशांत महासागरातील काही बेटांवर आढळून येतात.

गॅलापॅगोसचे वैशिष्ट्य काय?

कासवांची बेटे म्हणून गॅलापॅगोसची ओळख आहे. या बेटांची महती चार्ल्स डार्विन यांच्यामुळे जगाला कळली. जगाचा नकाशा करणे आणि त्यावरील जैववैविध्याचे खंडशः वर्गीकरण करणे, या हेतूने १८३० च्या दशकात डार्विन जगप्रवासाला निघाला. विविध भूभागावरचे अनेक प्राणी-पक्षी त्याने इंग्लंडला परत नेऊन जतन केले आणि त्यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यापैकी फक्त गॅलापॅगोस बेटांवर आढळणाऱ्या चिमण्यांचा, त्यातही विशेषत्वाने त्यांच्या चोचींच्या विशिष्ट रचनेचा अभ्यास करून डार्विनने काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले. ही घटना महत्त्वपूर्ण असल्याने, त्यातूनच पुढे प्रेरणा घेऊन या बेटांवर डार्विनच्या नावाने संशोधन केंद्र उभारले गेले. या बेटांवरील कासवांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.