बुद्धिबळ जगातील सम्राट आणि तब्बल दहा वर्षांहून अधिक काळ जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी राहिलेल्या मॅग्नस कार्लसनने अलीकडेच एक धक्कादायक वक्तव्य केले. एका प्रतिस्पर्ध्याला आपण आजपर्यंत कधीच पराभूत करू शकलो नाही, असे कार्लसनने म्हटले आहे. पाच जगज्जेतेपद, आठ वेळा ब्लिट्झ (अतिजलद) अजिंक्यपद पटकाविणाऱ्या कार्लसनने बुद्धिबळात निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मात्र, कार्लसनला सातत्याने पराभूत करू न शकणारी कोणीही व्यक्ती नाही. त्याचा रोख होता आर्टिफिश्यल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’कडे.

सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पर्धी?

पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवणाऱ्या कार्लसनचा उल्लेख असामान्य मनुष्य प्रतिस्पर्ध्याबाबत नव्हता, तर आधुनिक बुद्धिबळ प्रणालीबाबत (अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय) होता. या प्रणालीने आजच्या काळात बुद्धिबळाचे स्वरूपच बदलून टाकले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कार्लसनने स्पष्टपणे मान्य केले की, न्यूरल नेटवर्क आधारित बुद्धिबळ प्रणाली, जी अगदी स्मार्टफोनमध्येदेखील सहज उपलब्ध आहे, तिच्या अचूकतेमुळे कोणत्याही बुद्धिबळपटूला नमवले जाऊ शकते. “ते प्रोग्राम खूपच शक्तिशाली आहेत,” असे सांगताना मानवी अंतःप्रेरणा व संगणकीय गणनेच्या अचूकतेमधील वाढती दरी त्याने अधोरेखित केली.

एआय बुद्धिबळासाठी वरदान की आव्हान?

कार्लसनच्या या वक्तव्यामुळे बुद्धिबळातील एक मोठा बदल अधोरेखित होतो. पूर्वी केवळ प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी ही संगणकीय साधने, आता स्टॉकफिश आणि लीला चेस झिरोसारख्या प्रणालीच्या माध्यमातून अगदी दिग्गज ग्रँडमास्टर्सनाही सहज हरवू शकतात. एआय आधारित या प्रणाली पटावर प्रति सेकंद कोट्यवधी शक्यता मांडू शकतात आणि आधीच्या डावांमधून शिकत त्यामध्ये सुधारणादेखील करतात. विशेष म्हणजे, केवळ गणन नव्हे तर या प्रणाली ‘विचार’ करू शकतात, ज्यामुळे त्यांना हरवणे जवळपास अशक्य झाले आहे. मात्र, कार्लसन या प्रणालींना केवळ प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही. तो म्हणाला,“या प्रणाली खेळाची तयारी करण्यासाठी आवश्यक आहेत, पण त्यांच्याशी सराव करताना त्यांची ताकद लक्षात आल्यावर मात्र, संयमाने सराव करावा लागतो.”

‘संगणकविरोधी’ डावपेच काय असते?

कार्लसन संगणकांविरुद्ध पूर्णपणे पराभूत झालेला नाही. कार्यक्रमात एका खेळाडूने त्याला विद्यापीठाच्या प्रकल्पासाठी बनवलेल्या बुद्धिबळ प्रणालीविरुद्ध खेळण्याचे आव्हान दिले. कार्लसनने हे आव्हान स्वीकारले आणि हुशारीने संगणकविरोधी डावपेचाचा वापर केला. त्याने या रणनीतीचा उपयोग केल्याने समोरील संगणकीय क्षमता निष्प्रभ झाली. अधिकाधिक बंदिस्त खेळ करत त्याने संगणकाला चाली गणन (कॅल्क्युलेशन) करण्याची फारशी संधीच दिली नाही. त्यामुळे कार्लसनने विजय साकारला. मात्र ही रणनीती केवळ कमकुवत संगणकीय प्रणालींसाठी उपयुक्त ठरते. आधुनिक बुद्धिबळ प्रणाली मात्र, सहज जुळवून घेतात, असे विजयानंतर कार्लसनने स्पष्ट केले.

एआयच्या युगात बुद्धिबळाचे भवितव्य काय?

कार्लसनसारख्या जगज्जेतेच्या बुद्धिबळपटूचे हे वक्तव्य गमतीशीर नाही. हे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातील मनुष्य क्षमतांवरील प्रभाव दर्शवणारे एक उदाहरण आहे. जरी संगणक निर्विवादरीत्या गणनेत प्रबळ असले, तरी मानवी सर्जनशीलता आणि खेळातील अनपेक्षित वळणे बुद्धिबळाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. कार्लसनसारखा खेळाडू सध्याच्या काळातील उत्तम उदाहरण म्हणता येईल. कार्लसन हा अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आपल्या खेळातील प्रगतीसाठी करतो. मात्र, त्याचवेळी तो पारंपरिक बुद्धिबळाचा आदरही करतो. कोणताही खेळाडू सर्वोत्तम असला तरीही त्यालासुद्धा काही मर्यादा असतात. कार्लसनसाठी ती मर्यादा म्हणजे संगणकीय बुद्धिबळ प्रणाली आहे. असे असले तरीही, कार्लसनसारख्या खेळाडूंचा वारसा आजही महत्त्वाचा आहे. कोणतीही संगणकीय प्रणाली अंतिम डावातील नाट्य, त्याच्या अनपेक्षित चाली किंवा जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील थरार निर्माण करू शकत नाही. शेवटी बुद्धिबळपटू हे गौरवासाठी खेळत असतात. पण, संगणक केवळ विजय मिळवण्याच्या दृष्टीने खेळतो. त्यामुळे येणाऱ्या यामध्ये बदल पाहायला मिळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

Story img Loader