–अन्वय सावंत
भारतीय बुद्धिबळ क्षेत्राने गेल्या काही वर्षांत झपाट्याने प्रगती केली असून, सध्या चेन्नईजवळील महाबलीपूरम येथे सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत याचा प्रत्यय येत आहे. खुल्या आणि महिला या दोन्ही विभागांत यजमान भारताचे प्रत्येकी तीन संघ खेळत असून त्यांच्यात समाविष्ट असणारे युवा बुद्धिबळपटू अनुभवी आणि नामांकित खेळाडूंना पराभूत करण्याची कौतुकास्पद कामगिरी करत आहेत. त्यातही खुल्या विभागातील भारताच्या ‘ब’ संघामधील १६ वर्षीय डी. गुकेशने बुद्धिबळप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. गुकेशला सहापैकी सहा सामने जिंकण्यात यश आले असून, त्याच्यामुळे ‘ब’ संघाला जेतेपदाची संधी निर्माण झाली आहे. गुकेशच्या या स्पर्धेतील कामगिरीचा आणि आतापर्यंतच्या प्रवासाचा घेतलेला आढावा.
गुकेशने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कशी कामगिरी केली आहे?
प्रतिभावान युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा समावेश असलेल्या भारताच्या खुल्या गटातील ‘ब’ संघाच्या पहिल्या सहा फेऱ्यांमधील यशात गुकेशने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सांघिक स्पर्धांमध्ये पहिल्या पटावर खेळणे सर्वांत आव्हानात्मक मानले जाते. या पटावर खेळणाऱ्या खेळाडूचा प्रतिस्पर्धी संघातील सर्वोत्तम खेळाडूशी सामना होतो. भारताच्या ‘ब’ संघाकडून पहिल्या पटावर खेळणाऱ्या गुकेशला मात्र याचे दडपण जाणवलेले नाही. त्याने सलामीच्या लढतीत संयुक्त अरब अमिरातीचा आंतरराष्ट्रीय मास्टर ओमरान अल होसानीला पराभूत केले. दुसऱ्या फेरीत त्याने एस्टोनियाच्या ५९ वर्षीय कल्ले कीकवर सरशी साधली. मग त्याने विजयी घोडदौड कायम ठेवताना पुढील चार फेऱ्यांमध्ये अनुक्रमे निको जिओर्गिआडिस (स्वित्झर्लंड), डॅनिएले व्होकाटूरो (इटली), अलेक्सी शिरॉव्ह (स्पेन) आणि गॅब्रिएल सर्गिसियन (अर्मेनिया) या ग्रँडमास्टर खेळाडूंचा पराभव केला.
गुकेशचा सर्वांत आव्हानात्मक विजय कोणता?
स्पेनच्या संघाने चौथ्या फेरीत भारताच्या ‘क’ संघाला पराभूत केले होते. पाचव्या फेरीत त्यांची भारताच्या ‘ब’ संघाशी गाठ पडली. स्पेन आणि भारताच्या ‘ब’ संघाने यापूर्वीच्या चारही लढती जिंकल्या होत्या. त्यामुळे हे दोन संघ आमनेसामने येणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. स्पेनला नमवण्यासाठी पहिल्या पटावरील गुकेशने ५० वर्षीय अलेक्सी शिरॉव्हला रोखणे भारताच्या ‘ब’ संघासाठी महत्त्वाचे होते. गुकेशने केवळ शिरॉव्हला रोखले नाही, तर त्याच्यावर ४४ चालींमध्ये मात केली. शिरॉव्हची युरोपीय बुद्धिबळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. तसेच तो आक्रमक चाली खेळून प्रतिस्पर्धी खेळाडूवर दडपण टाकण्यासाठी ओळखला जातो. मात्र, गुकेशने शिरॉव्हच्या आक्रमणाला आक्रमणाने उत्तर दिले. त्यामुळे शिरॉव्हने चुका केल्या आणि याचा फायदा घेत गुकेशने विजयाची नोंद केली.
गुकेशने गेल्या काही काळात कशा प्रकारे प्रगती केली आहे?
गुकेश हा ग्रँडमास्टर किताब मिळवणारा भारताचा सर्वांत युवा बुद्धिबळपटू आहे. त्याने वयाच्या १२व्या वर्षी हा किताब मिळवला होता. गुकेशने गेल्या काही काळात केलेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. मार्च २०२२ मध्ये गुकेशच्या खात्यावर २६१४ एलो गुण होते. त्यानंतरच्या पाच महिन्यांत त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये थेट २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला आहे. ही कामगिरी करणारा तो भारताचा सर्वांत युवा बुद्धिबळपटू आहे. तसेच ऑलिम्पियाड स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या बळावर गुकेशने जागतिक क्रमवारीत विदित गुजराथीलाही मागे टाकले आहे. त्याला ऑलिम्पियाडच्या पुढील फेऱ्यांमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यश आल्यास तो जागतिक क्रमवारीत आणखी आगेकूच करू शकेल.
गुकेशच्या वाटचालीत विश्वनाथन आनंदची भूमिका किती महत्त्वाची?
भारताचा सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने गुकेशच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुकेशला वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमीत आनंदचे मार्गदर्शन लाभले आहे. गुकेशमध्ये मोठा खेळाडू होण्याची क्षमता असल्याचे आनंदने यापूर्वी नमूद केले आहे. ‘‘गुकेश खूप मेहनती आहे. त्याच्यात काही तरी करून दाखवण्याची जिद्द आहे. यंदाच्या ऑलिम्पियाड स्पर्धेने गुकेशची प्रगती अधोरेखित केली आहे,’’ असे आनंद म्हणाला. आनंदचा वारसा पुढे चालवण्यासाठी गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी आणि निहाल सरिन यांसारख्या युवा खेळाडूंकडे पाहिले जात आहे. आता ऑलिम्पियाड स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे विशेषत: गुकेशकडून भारतीय बुद्धिबळप्रेमींच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.