Yesubai Saheb; A Forgotten Warrior Queen of Maratha History: इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर दुर्दैव म्हणावं की, विधिलिखित?; एखाद्या स्त्रीच्या कर्तृत्त्वाचा आढावा घेताना हात आखडता घेतला जातो. एक ना अनेक वीरांगना इतिहासात कधी, केव्हा गडप झाल्या असतील, याचा मागमूसही नाही. अशाच एका वीरांगनेच नाव म्हणजे येसूबाई साहेब. हे नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या निमित्ताने आपण अनेकदा ऐकतो. किंबहुना येऊ घातलेल्या ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने संभाजी महाराजांच्या बरोबरीने येसूबाईंचे नाव मोठ्या गौरवाने घेतले जात आहे. परंतु, या विभूतीच्या कर्तृत्त्वाची चर्चा खचितच केली जाते. समाजासाठी, राष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या पुरुषांच्या पत्नींच्या भाळी नक्की काय लिहिले गेले आहे, याची फारशी दखल कोणी घेत नाही. म्हणूनच बहुदा आपल्या पतीच्या पश्चात वनवास भोगणाऱ्या या महाराज्ञीच्या समाधीचा शोध लागण्यास तब्बल ३०० वर्षे जावी लागली!

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

श्रृंगारपूरचे शिर्के

येसूबाईंचा जन्म हा श्रृंगारपूरच्या पिलाजी शिर्के यांच्या पोटी झाला. शिर्के घराण्याचा उल्लेख सूर्यवंशी क्षत्रिय असा करण्यात आलेला आहे. उत्तरेकडून शके ७०५ मध्ये शिर्के दक्षिणेत आले. रायगडावर फौज जमवून त्यांनी वास्तव्य केले. व्रजपाळ हा शिर्के घराण्याचा मूळ पुरुष होता. मुसेण्योरे येथील शिरकाई देवीची स्थापना त्याने शिरकावली या गावी केली. या ठिकाणाला शिशकाण टप्पा असे म्हणतात. त्यामुळे पूर्वीचे कूटर या नावाचा त्याग करून त्यांनी शिर्के हे नाव घेतलं. पुढे व्रजपाळाच्या वंशजांनी मुसलमानांशी लढा देऊन कोकण प्रांतात आपली घराणी प्रस्थापित केली.

तळकोकणात स्थायिक

शिर्के घराण्याचे वास्तव्य बरीच वर्षे कोकण प्रांतात होते. परंतु इ.स, १४६९ नंतर शिर्के यांचे कोकणातून देशावर स्थलांतर झाले. परंतु मोऱ्यांनी जावळीवर कब्जा केल्यानंतर शिर्के तळकोकणात श्रृंगारपूर येथे सुर्वे यांच्या आश्रयाला आले. पिलाजी शिर्के (येसूबाईंचे वडील) सुर्वे यांचे कारभारी म्हणून काम पाहू लागले. तर सुर्वे यांनी आपली मुलगी पिलाजी यांना देऊन सोयरीक केली आणि विजापूरच्या बादशहाकडून दाभोळ येथील मामले रायरीची देशमुखी शिर्के यांना मिळवून दिली.

संभाजी महाराज- येसूबाई यांचा विवाह

पिलाजी शिर्के यांच्या मुलीचा संभाजी महाराजांशी विवाह झाला, त्यावेळेस चार ते पाच लक्ष रुपये खर्च आला होता, असा ऐतिहासिक संदर्भ सापडतो. वधूचे नाव येसुबाई साहेब असे ठेवण्यात आले होते. या विवाहसंबंधामुळे श्रृंगारपूरचे केशवभट व रघुनाथ पंडित असे दोन विद्वान शिवाजी महाराजांकडे आले. या विद्वांनाच्या देखरेखीतच संभाजी महाराजांबरोबर येसूबाईंचे शिक्षण झाले. वयाच्या पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांचा विवाह हा संभाजी महाराजांशी झाला. अंदाजे इ.स.१६६१ ते ६५ या कालखंडात हा विवाह संपन्न झाला. त्यामुळे कोवळ्या वयातच माहेर सोडलेल्या येसूबाईंची जडणघडण ही थेट जिजाऊंच्याच तालमीत झाली. असे असले तरी शिर्के कुटुंबाच्या संस्काराची शिदोरी आपल्या बरोबरच घेऊनच येसूबाईंनी सासरी प्रवेश केला होता.

श्री सखी राज्ञी जर्यात

येसूबाई राज्यकारभारात संभाजी महाराजांच्या मदतनीस होत्या, असे संदर्भ ऐतिहासिक दस्तऐवजात आढळतात. ज्यावेळी संभाजी महाराज ८-९ वर्षे युद्धात व्यग्र होते त्या कालखंडात त्यांच्या गैरहजेरीत संपूर्ण अंतर्गत कारभार येसूबाई जातीने व अधिकाराने पाहत असत. राजपत्रे काढताना केवळ ‘आज्ञा’ असा उल्लेख न म्हणता संभाजीराजे यांची ‘राजाज्ञा’ म्हणून हुकूम त्या काढत. संभाजी महाराजांनी त्यांना ‘श्री सखी राज्ञी जर्यात’ असा शिक्का दिला होता. राजधानीत रायगडावर महिनोमहिने संभाजी महाराजांच्या अनुपस्थित त्या सर्वत्र बातमी राखणे, गुन्हेगारांची वासलात लावणे, कैदेत दक्षता राखून ठेवणे याकडे त्या जातीने लक्ष देत. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत सैन्यापासून देव-देवस्थानाला काहीही उपद्रव होऊ नये याची काळजी येसूबाईंनी घेतली होती, याबाबतचे चाफळचे अभयपत्र उपलब्ध आहे. दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रावर येसूबाईंचा शिक्का आणि सही आहे. यातूनच त्यांच्या अधिकाराची कल्पना येते.

संभाजी महाराजांनंतर…

संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनंतर भारताच्या बहुतांश भागावर औरंगजेबाचे राज्य स्थापन झाले. येसूबाई, शाहू, राजाराम हे त्यावेळी रायगडावर होते. येसूबाईंनी मनात आणलं असतं तर आपला पुत्र शाहू याला गादीवर बसवून राज्य करणं सहज शक्य होतं. पण त्यांनी राजाराम महाराजांची राज्यप्रतिनिधी म्हणून निवड केली. शिवाय मुघलांपासून रक्षणासाठी राजारामाने रायगडाबाहेर राहून राज्याचे रक्षण करावे असा निर्णय त्यांनी घेतला. ऐतिहासिक संदर्भानुसार २५ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने झुल्फिकारखानास पाठवून रायगडला वेढा घातला. तर ५ एप्रिल रोजी शुक्रवारी राजाराम रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. त्यामुळे स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच वेळी तावडीत सापडू नयेत याची चतुराईने घेतलेली खबरदारी यातून दिसते. मागे येसूबाई व शाहू रायगडावर होते.

संभाजी महाराजांची पत्नी व मुलगा रायगडावर आहे हे कळल्यावर औरंगजेबाने झुल्फिकारखानाला रायगडावर पाठविले होते. झुल्फिकारखानाने आपल्या मदतीला कोकणातून जंजिऱ्याच्या हबशीस बोलवून इ.स. १६९० मध्ये रायगडाला मोर्चे लावले. पुढील दहा महिने मराठ्यांनी किल्ला लढता ठेवला होता. रायगडाच्या पाडावानंतर येसूबाई आपल्या लहान पुत्रासह झुल्फिकारखानाच्या स्वाधीन झाल्या. आपले चुलते आपल्याला टाकून गेले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांच्या अधिकारासाठी त्या मुघलांकडे वळत आहे, असे सांगितले. यातूनच त्यांचा चाणाक्षपणा दिसून येतो.

अखेर परतीचा प्रवास

पुढील आयुष्यातील उमेदीची ३० वर्षे येसूबाई यांनी मुघलांच्या कैदेत घालविली. वाटेत आलेल्या अडचणींना धीराने तोंड दिले. इ.स. १७१९ च्या सुमाराला त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. यावेळी येसूबाईंचे वय ६० वर्षे होते. परंतु या वयातही त्यांनी शाहूच्या कारकिर्दीत काही राजकीय व न्यायनिवाड्याची कामे केलेली दिसतात. किंबहुना दक्षिणेत मराठी राज्याची झालेली सातारा, कोल्हापूर अशी शकले त्यांनी पाहिली. आपापसातील दुहीमुळे परकीय शत्रूचे कसे फावते याचा धडा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून पाहत आल्यामुळे त्यांनी कोल्हापूरचे संभाजीराजे आणि शाहू यांच्यात १७३० च्या सुमाराला वारणा येथे मैत्रीचा तह घडवून आणला. यानंतर काहीच दिवसांत त्यांचे देहावसान झाले. येसुबाईंच्या कार्यकर्तृत्त्वाचा इतिहास प्रेरणादायी असला तरी महाराष्ट्रात त्यांची गौरवगाथा तुलनेने कमीच गायली गेली!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava film vicky kaushal rashmika mandanna yesubai saheb maratha history svs