मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या आगामी बॉलीवूड चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज (१६५७-१६८९) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (१६३०-१६८०) यांचे पुत्र होते. ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अनेकांकडून या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे.
या चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली आहे. तर संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसूबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात दोघेही लेझिम हे लोकनृत्य सादर करताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी या दृश्यावर टीका केली होती. सोमवारी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर चित्रपटातील हे दृश्य हटविले जाईल. नेमका हा वाद काय? चित्रपटावर आक्षेप का घेण्यात आला आहे? लेझिम म्हणजे नक्की काय? जाणून घेऊ.
हेही वाचा : विदेश दौऱ्यापेक्षा प्रयागराजचा विमान प्रवास महागला, तिकीटे ५०,००० पार; कारण काय? सरकार काय करणार?
‘छावा’चा वाद काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गाण्यात महाराजांवरील एका चित्रणावर आक्षेप घेतला आणि चित्रपट निर्मात्यांवर टीका केली. शनिवारी महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, धर्म आणि स्वातंत्र्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट तयार होत आहे ही आनंदाची बाब आहे. आमची भूमिका अशी आहे की, हा चित्रपट आधी तज्ज्ञ आणि जाणकार लोकांना दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये.”
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आता हे दृश्य चित्रपटातून हटवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. “आम्ही चित्रपटात महाराजांचे वय २० वर्षांचे दाखवले आहे. त्यांनी लेझिम नृत्य केले होते हे खरे आहे आणि का नाही? लेझिम नृत्य हा मराठा संस्कृतीचा भाग आहे. हे आपले पारंपरिक नृत्य आहे. परंतु, चित्रपटातील नृत्यामुळे किंवा लेझिम नृत्यामुळे कोणी दुखावले असेल तर आम्ही ते दृश्य काढून टाकू,” असे ते म्हणाले.
उल्लेखनीय म्हणजे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या चित्रपट शाखेने भूतकाळात अनेक हिंसक आंदोलने केली आहेत. मराठी चित्रपटांसाठी स्क्रीन टाइमची मागणी आणि बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम देण्याचा विरोध वेळोवेळी मनसेद्वारे करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचे स्वतःचे अनेक शीर्ष चित्रपट सेलिब्रिटींबरोबर उत्कृष्ट संबंध आहेत आणि बॉलीवूड व सरकार यांच्यातील पूर्वीचे वाद मिटवण्यातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
भूतकाळातही अनेकदा ऐतिहासिक व्यक्तींशी संबंधित चित्रपटांवर त्या संस्कृतीतील आदरणीय लोकांच्या चित्रणावरून टीका झाली आहे. एका दशकापूर्वी मराठा योद्धा पेशवा बाजीराव यांच्या वंशजांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानीमधील दोन गाणी काढून टाकण्याची मागणी केली होती. मात्र, काही दृश्य सुधारून हा चित्रपट अखेरीस गाण्यांसह प्रदर्शित झाला.
लेझिम म्हणजे काय?
दिवंगत भारतीय कला अभ्यासक कपिला वात्स्यायन यांनी ‘भारतीय लोकनृत्याच्या परंपरा’ या पुस्तकात लिहिले आहे की, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये लग्नाच्या मिरवणुकांमध्ये लेझिम नृत्य सादर केले जायचे. अशा कार्यक्रमांमध्ये ‘आखाडा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गटाचा समावेश असायचा, हा शारीरिक कौशल्याचे अनेक पराक्रम करण्यात कुशल असणाऱ्या व्यक्तींचा एक गट असतो. आज, लेझिम हा राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाचा एक भाग झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. गणेश चतुर्थीसारख्या सांस्कृतिक उत्सवांचाही लेझिम नृत्य हा एक प्रमुख भाग आहे.
त्यांनी लिहिले, “लेझिमला लाकडी दांडा आणि त्या दांड्याला लोखंडी साखळी जोडली असते. त्या साखळीला लहान चकत्या असतात. या साखळीला धरण्यासाठी मध्यभागी लाकडी मूठ असते. एका हातात लाकडी दांडा आणि दुसऱ्या हातात लाकडी मूठ धरून हातांची हालचाल केल्यास त्यातून गोड आवाज येतो. लेझिम हा शारीरिक व्यायाम किंवा कवायतीप्रमाणे करण्यात येणारा एक नृत्य प्रकार आहे. लेझिम नृत्य एका रांगेत किंवा वर्तुळ करून सादर केले जाते. ढोल किंवा ढोलगी (छोटे ढोल)वर हे नृत्य केले जाते. हे नृत्य करताना तारांची वाद्ये किंवा गाण्यांची साथ नसते, मात्र कधी कधी गाण्यांवरही हे नृत्य सादर केले जाते. स्टेपिंग, स्क्वॅटिंग आणि जंपिंग यांसारख्या हालचाली या नृत्याचा एक अंगभूत भाग असतात. नृत्य सादर करताना ढोलगीचा वेग सुरुवातील कमी असतो, त्यानंतर हळूहळू वेग वाढत जातो. अशाप्रकारे हा नृत्यप्रकार सादर होतो.
हेही वाचा : स्मार्टवॉच का ठरतंय जीवघेणं? नव्या अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड
छत्रपती संभाजी महाराज कोण होते?
छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. १६८१ मध्ये त्यांचे सावत्र भाऊ राजाराम यांच्याशी झालेल्या रक्तरंजित युद्धानंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे त्यांनी आपल्या हातात घेतली. मुघल सम्राट औरंगजेबाला (१६१८-१७०७) त्यांनी जेरीस आणले होते. दख्खनकडे आपले साम्राज्य वाढवण्याच्या औरंगजेबाच्या योजनेमुळे अनेकदा त्याचा मराठ्यांशी संघर्ष झाला. संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला, अनेक प्रसिद्ध किल्ल्यांचे रक्षण केले. मात्र, १६८९ मध्ये त्यांना औरंगजेबाकडून ताब्यात घेण्यात आले, त्यांनी औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार सहन केले आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.