Sambhaji Maharaj memorial: सरदेसाई वाडा म्हणजे ज्या ठिकाणी १ फेब्रुवारी १६८९ रोजी मुघलांनी संभाजी महाराजांना पकडले ते ठिकाण. गेल्या कित्येक वर्षांपासून हा वाडा जर्जर अवस्थेत आहे. वाड्याच्या भिंती, दरवाजे आणि छत हे पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे. वाड्याचे भाग कोसळत आहेत. या वास्तूच्या आजूबाजूला दाट गवत वाढलेले आहे, छत गळत आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा वाडा कधीही कोसळेल अशी भीती स्थानिकांना वाटत आहे.
संभाजी महाराजांचा पुतळा
१५ वर्षांपूर्वी हा वाडा मूळ मालकांकडून वापरात होता. सध्या हे कुटुंब शेजारच्या घरात राहत असून वाडा तसाच पडून आहे. हा वाडा सुमारे पाच एकर जमिनीवर वसलेला असून आजूबाजूला गावकऱ्यांची घरे आहेत. तर सभोवतालच्या परिसरात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दुवा सांगणारी मंदिरंही आहेत. याच मंदिरांमध्ये काळ्या पाषाणात कोरलेले प्रसिद्ध कनकेश्वर मंदिर आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा असून हा पुतळा या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करतो.
छावा चित्रपटानंतर नवसंजीवनी
विकी कौशलच्या मुख्य भूमिकेतील ‘छावा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर या ऐतिहासिक स्थळाला नवसंजीवनी मिळाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अनुयायी आणि इतिहासप्रेमी सतत कसबा गावाला भेट देत असून आपल्या राजाला युद्धानंतर ज्या ठिकाणी पकडण्यात आलं ते स्थान प्रत्यक्ष पाहण्यासाठी येथे येत आहेत. फक्त कोकणातूनच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दररोज या वाड्यात येतात. आत-बाहेर फिरतात, फोटो आणि व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करतात. मात्र, या ऐतिहासिक वास्तूची विदारक अवस्था पाहून तेही हतबुद्ध झाले आहेत.
शिवप्रेमींच्या प्रतिक्रिया
“या वाड्याची अशी बिकट अवस्था पाहून खूप वेदना होतात. हाच तो वाडा आहे जिथे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आले. या स्थळाला आपल्या इतिहासात खूप महत्त्व आहे. हा वाडा जपला पाहिजे. इथे स्मारक उभारायला हवे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना हा इतिहास समजेल,” असं कोल्हापूरहून आलेले शिवप्रसाद माने यांनी सांगितलं. कर्जतचे रोशन पारखांडे म्हणाले, “हो, मी ‘छावा’ पाहिल्यानंतर वाडा पाहायला आलोय. मला वाटलं होतं की, वाडा किमान थोडा तरी चांगल्या स्थितीत असेल. पण इथली परिस्थिती खूपच वाईट आहे. आता तरी सरकारने जागं व्हावं आणि वाड्याचे जतन करून त्याचे नुतनीकरण करावं, अशी माझी अपेक्षा आहे.” स्थानिक रहिवासी राकेश चव्हाण म्हणाले, “छावा चित्रपटामुळे सरकारला या ऐतिहासिक वास्तूची बिकट अवस्था लक्षात आली आणि स्मारक उभारण्याच्या योजना जाहीर झाल्या. आम्ही गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून सरकारकडे वाडा ताब्यात घेऊन मराठा राजाला साजेसं स्मारक उभारण्याची मागणी केली होती.”
वाडा ताब्यात घेण्यासाठी सरकारचे प्रयत्न
हा वाडा खाजगी मालमत्ता असल्याने तो ताब्यात घेण्यासाठी राज्य सरकारने मालकांशी म्हणजे सरदेसाई कुटुंबाशी चर्चा सुरू केली आहे. हा विषय प्रथम राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समोर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा हेतू जाहीर केला. “या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता सरकार छत्रपती संभाजीराजांचे भव्य स्मारक उभारेल. ते शौर्य व पराक्रमाचे प्रतीक होते… ते ‘धर्मवीर’ आणि ‘स्वराज्य रक्षक’ होते आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ गावात स्मारक उभारले जाईल,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरदेसाई कुटुंबाची भूमिका
शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, “खरं तर मंत्री योगेश कदम यांनी सरदेसाई कुटुंबाशी वाडा सरकारकडे सोपविण्याबाबत चर्चा केली होती. आतापर्यंत मंत्र्यांनी मालकांबरोबर तीन बैठका घेतल्या आहेत. मालकांनी वाडा राज्य सरकारकडे सोपवण्याचे आश्वासन दिले आहे.” या संदर्भात विचारले असता, वाड्याचे मालक सुभाष देसाई म्हणाले, “वाडा सरकारकडे सोपवण्यात आम्हाला काहीही हरकत नाही. आम्ही ११ व्या शतकापासून या वाड्याचे मालक आहोत. मात्र, हे सर्व सरकारच्या कराराच्या अटींवर अवलंबून असेल. आधी सरकारने त्या अटी व शर्ती स्पष्ट कराव्यात, त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ.”
सरदेसाई कुटुंबाने सांगितले की, जरी आम्ही छत्रपती संभाजीराजांच्या स्मरणार्थ वाडा सरकारकडे सोपवण्यास तयार आहोत, तरी या व्यवहारात एक अडथळा आहे. “सरकार आमचं राहत घर असलेला भागही मागत आहे. अशा स्थितीत आम्ही कुठे जावं? सरकारला वाटतं की, आम्ही दुसरीकडे जाऊन राहावं… पण ते शक्य नाही, आम्ही शतकानुशतके इथे राहत आलो आहोत. सरकार आम्हाला असं बाहेर काढू शकत नाही.” राज्य सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईबद्दल विचारले असता सरदेसाई म्हणाले, “रक्कम महत्त्वाची नाही, कराराच्या अटी महत्त्वाच्या असतील.”
स्मारकाच्या जागेवरून मतभिन्नता
चिपळूणहून आलेले छत्रपती संभाजीराजे यांचे अनुयायी सुधीर भोसले म्हणाले, “हा ऐतिहासिक वाडा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. इतकी वाईट अवस्था आहे की, तो कधीही कोसळू शकतो. सरकारने कसबा गावात स्मारक उभारण्याचा घेतलेला निर्णय गावकऱ्यांनी स्वागतार्ह मानला आहे. मात्र, आम्हाला समजले की, हे स्मारक सरदेसाई वाड्यापासून सुमारे एक किलोमीटर दूर उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे आम्हाला मान्य नाही. स्मारक नेमके त्याच ठिकाणी उभारले गेले पाहिजे.”
श्रीमंत कोकाटे म्हणाले, “गावकरी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुयायांची मागणी आहे की, स्मारक त्याच ठिकाणी उभारावे जिथे महाराजांना पकडण्यात आले होते आणि ही मागणी योग्य आहे. ऐतिहासिक स्थळापासून काही अंतरावर स्मारक उभारणे योग्य नाही. हे दुर्दैव आहे की, सरकारला जाग येण्यासाठी चित्रपटाची गरज भासावी लागली. अन्यथा कुणालाही त्याची पर्वा नव्हती.” “छत्रपती संभाजी महाराजांना १ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या फौजेकडून पकडण्यात आले आणि ११ मार्च १६८९ रोजी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या बलिदानाची ३३६ वी पुण्यतिथी आहे. त्यांचे मंत्री कवी कलश यांनाही त्याच दिवशी ठार मारण्यात आले.” कोकाटे म्हणाले की, अनेक ऐतिहासिक पुरावे असे दर्शवतात की, मुघल सरसेनापती मकरब खान आणि त्याच्या फौजांनी मोठ्या शर्तीने संभाजीराजांना पकडले. “माझ्या मते, महाराजांना पकडल्यानंतर वाड्यात ठेवण्यात आले नव्हते. त्यांना त्वरित मुघल फौजांनी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) आणि नंतर पुणे जिल्ह्यातील तुलापुर येथे नेले, जिथे त्यांची आणि त्यांच्या मंत्र्याची अतिशय अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली,” असेही कोकाटे सांगतात.
शिर्क्यांवरील आरोप
शिर्क्यांनी मकरब खानाला मदत केली हा आरोप फेटाळून लावत कोकाटे म्हणाले, “शिर्के हे संभाजीराजांचे जवळचे नातेवाईक होते, मग त्यांनी त्यांच्याविरुद्ध का जावे? शिर्क्यांनी राजांविरुद्ध कट रचला असे म्हणणे चुकीचे आहे. जरी चित्रपटात तसे दाखवले असले तरी समकालीन ऐतिहासिक पुरावे त्याला दुजोरा देत नाहीत.” कसबा गावचे पुजारी सतीश लिंगायत म्हणाले, “कराडच्या यादव बंधूंच्या वादाचे निराकरण करण्यासाठी संभाजीराजे येथे आले होते. त्यांनी निर्णय घेणे पुढे ढकलून रायगडला निघण्याचे ठरवले होते. मात्र यादव बंधूंना त्याच दिवशी निर्णय हवा होता. त्यामुळे संभाजीराजे थांबले. याची माहिती गुप्तचरांनी मकरब खानला दिली आणि मग त्याच्या फौजांनी वाड्यावर हल्ला करून महाराजांना पकडले.”
तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जमिनीचे संपादन
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, “सरकारने नेमलेल्या समितीकडून वाड्याची पाहणी केली जाईल आणि त्यानंतर जमीन खरेदीबाबतचा निर्णय घेतला जाईल. जर जमीन ताब्यात घेण्यात अडचण आली, तर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ती संपादित केली जाईल.”
© IE Online Media Services (P) Ltd