बजाज कंपनीने दुचाकी निर्मितीचा कारखाना सुरू केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचा वेग वाढला. पुढे काही काळानंतर या विकास वेगाला मर्यादा आल्या. तो स्थिरावलेला आलेख आता पुन्हा उंच जाण्याच्या शक्यता दिसू लागल्या आहेत. आता जगातील कोणत्याही चार किंवा दुचाकी वाहनातील एखादा तरी सुटा भाग छत्रपती संभाजीनगरमध्ये बनविलेला असतोच असतो. त्यामुळेच इलेक्ट्रिकल वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये झालेली गुंतवणूक चालना देणारी ठरू लागली आहे .
गुंतवणुकीचे इंजिन
देशामध्ये ‘स्मार्ट’ औद्योगिक शहरे निर्माण करण्यासाठी नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. यातील पहिला कॉरिडॉर म्हणजे दिल्ली – मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. या औद्योगिक पट्ट्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश झाला. या शहरातील शेंद्रा व बिडकीन या दोन औद्योगिक वसाहतींमध्ये पहिल्या टप्प्यात चार हजार हेक्टर म्हणजे १० हजार हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत उभे करण्याचे ठरविण्यात आले. साधारणत: २३ लाख रुपये एकरने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. या जमिनीपैकी ६० टक्के जमीन उद्योग उभे करण्यासाठी तर ४० टक्के जमीन वाणिज्य, रहिवासी निवासी प्रकल्प, शाळा, रुग्णालये, व्यापारी संकुले मॉल्स यासाठी राखीव ठेवण्यात आली. एकत्रित ‘लॅन्ड बँक’ झाल्याने गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी राज्य सरकारचे काम सोपे झाले. हे काम नीट व्हावे म्हणून राज्य औद्योगिक विकास महामंडळ व नॅशनल इंडस्ट्रियल विकास महामंडळ यांच्यामध्ये ५१ : ४९ गुणोत्तराने निधीतून महाराष्ट्र औद्योगिक वसाहत मर्यादित ही कंपनी स्थापन करण्यात आली.
औद्योगिक पट्ट्यात कोणत्या सुविधा?
शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात दोन हजार एकरावर अखंडित वीज, पाणी, सांडपाणी, अग्निशमन वायू वाहिनी, आंतरजाल या सर्व सेवा भूमिगत स्वरूपात व सर्व भूखंडधारकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पातील ४२ टक्के पाणी हे प्रक्रिया करून वापरले जाते. पाणी, वीज, किंवा अन्य कोणत्याही सुविधेत अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी एक नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, प्रदूषण मापक सेन्सर, वाहतूक नियंत्रण प्रणाली अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. औद्योगिक वाटपासाठी भूखंड वाटप करताना पारदर्शकता राखली जाते. एकदा एक खिडकीतून अर्ज केला की, भूखंड मिळेपर्यंत उद्याेजकांना वारंवार बोलावले जात नाही. आता या औद्योगिक शहरातील वीज वितरणाचा स्वतंत्र परवानाही देण्यात आला आहे. यामुळे अन्य उद्योगातील विजेचे दर आणि शेंद्रा व बिडकीनमधील दर यामध्ये एक ते दोन रुपयांपर्यंतचा फरक पडेल. वीज दराचे प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आले आहेत. सर्व सुविधांनी युक्त भूखंड मिळत असल्याने आधी भूखंड घेऊन त्यात सोयी निर्माण करण्यासाठी झटत बसण्याची उद्योजकांना गरज भासत नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुंतवणुकीला गेल्या दशकभरात वेग आला आहे.
गुंतवणूक किती? कोणत्या प्रमुख कंपन्या?
आतापर्यंत शेंद्रा व बिडकीन या दोन्ही औद्योगिक वसाहतीमध्ये ६४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून ५० हजार प्रत्यक्ष रोजगार मिळतील, असा दावा केला जातो. ज्यांना भूखंड दिले त्यातील ६० कंपन्यांनी त्यांचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली असून ७० कंपन्यांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. मे २०२५ पर्यंत या कंपन्यांतून रोजगार निर्मिती होईल असा दावा केला जात आहे. अजून १६७ कंपन्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी तयार होते. त्यातील काही कंपन्यांच्या गुंतवणुकीचा आकडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. २८ हजार ८९८ कोटी रुपयांची गुंतवणुकीतून नवीन ११ हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये मुख्यत्वे टोयोटा – किर्लोस्कर, जे. एसडब्ल्यू, ह्योसंग, फुली इन्फ्राटेक, ओएरलिकॉन, बालझर्स , कोल्हार ग्रुप, पर्किन्स, लुब्रीझॉल, एथर, पिरॅमल कार्मा, कॉस्मो फिल्म अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे.
‘ग्रीन’ वाहन कंपन्यांची गुंतवणूक किती?
बिडकीन औद्योगिक संस्थेत टोयोटा – किर्लाेस्कर या कंपनीच्या वतीने सर्वाधिक २० हजार कोटींची गुंतणूक करण्याचे ठरविले आहे. चार लाख इलेक्ट्रिकल आणि विद्युत व इतर इंधन मिश्र बनावटीची वाहने बनवण्याचे नियोजन सुरू आहे. जागा घेण्यापासून ते आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र करण्यापर्यंतची तयारी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय एथर या कंपनीने दहा लाख ई – दुचाकी वाहने निर्मिण्याचे नियोजन आखले आहे. तिसरी कंपनी आहे जेएसडब्ल्यू. या कंपनीने २७ हजार कोटी रुपये गुंतवून पाच लाख प्रवासी कार आणि एक लाख व्यापारी वाहतुकीचे वाहने बनविण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारला कळवले आहे. नव्याने जेनसोल इंजिनिअरिंगकउून ४००० हजार कोटी रुपयांची गुंतणूक करण्यात आली असून यामध्ये आता रिलाइ्रन्स इन्फ्रा ही कंपनीही उतरणार आहे. दुचाकी, चारचाकी, कार, व्यापारासाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहने छत्रपती संभाजीनगरमधील आद्योगिक वसाहतीमध्ये तयार हाेतील. या कंपन्यांनी आता भूखंड विकत घेतल्याने ही गुंतवणूक प्रत्यक्षात बरेच बदल घडवेल. म्हणूनच मुख्यमंत्रीही छत्रपती संभाजीनगर हे ‘ईव्ही’ निर्मितीचे केंद्र होईल असा दावा करत आहेत.
हे बदल कसे घडतील?
बजाज या दुचाकी वाहन निर्मितीच्या एका कारखान्यामुळे सुटे भाग करणाऱ्या कंपन्या उभ्या ठाकल्या. चॅसी बनविणारे, टायर, दुचाकीला लागणारे विविध प्रकारचे सुटे भाग करणारी उद्योजक मंडळी वाढली. या नव्या गुंतवणुकीमुळे त्यात चौपटीने वाढ होईल असा दावा केला जात आहे. ही गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरमध्ये यावी यासाठी सध्या उद्योग करणाऱ्या मंडळींनी शहरातील सकारात्मक बाजू आवर्जून मांडली. परिणामी गुंतवणुकीबरोबर येणारे साऱ्या सुविधाही वाढत राहतील, असे छत्रपती संभाजीनगरचे ‘फस्ट’ या संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी सांगतात. आता होणारी गुंतवणूक पुढे वाढत राहणार आहे. देशात एखादे केंद्र वाढत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले जात असल्याने येत्या काळात औद्योगिक वसाहतीसाठी लागणारी अतिरिक्त जमीनही उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. आता ठरवून विकसित केलेली १० हजार हेक्टरापैकी फार तर ५५० एकर जमीन विक्री शिल्लक असेल. त्यालाही मोठी असल्याने नव्याने जमीन घेणे आवश्यक असणार आहे.