Chhatrapati Shivaji Maharaj गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी या पुण्यातील दोन संशोधकांना ‘नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’ येथे इतिहास संशोधनासाठीची कागदपत्रं चाळत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली. ही बखर मोडी लिपीत असून या बखरीचा कालखंड १७४० नंतरचा असल्याचे मत या दोन संशोधकांनी व्यक्त केले आहे. तसेच या बखरीत शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आणि संभाजी महाराज यांच्या प्रारंभिक जीवनाचा तपशील आलेला आहे. त्याच निमित्ताने बखर म्हणजे काय? आणि त्याचे महत्त्व याविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.

बखर म्हणजे काय? What is the meaning of Bakhar?

बखर वाङ्मय हा मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार आहे. साहित्यिक महत्त्वाशिवाय बखर ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. बखैर-बखेर-बखर अशी या शब्दाची उत्पत्ती मानली जाते. अरबी भाषेतील खबर (वार्ता, माहिती) या शब्दावरून वर्णविपर्यासाने बखर हा शब्द तयार झाला असावा असे भाषातज्ज्ञ सांगतात. गद्यात लिहिलेला ऐतिहासिक वृत्तान्त असा अर्थ पुढे त्याला प्राप्त झाला. आपल्याकडील व शत्रूकडील वर्तनाची नोंद करणारा वाकनीस समकालीन राजकीय इतिहास नोंदवून ठेवत होता. इतिहासचार्य वि. का. राजवाडे यांच्या मते ‘मुसलमानांच्या सहवासाने त्यांच्या तवारिखा पाहून मराठ्यांनीही बखरी लिहिण्याचा प्रघात पाडला.’ डॉ. पटवर्धन, य. रा. दाते, य. न. केळकर या सर्वांनी बखर म्हणजे हकीकत, इतिहास अशीच व्याख्या दिली आहे तर वि. का. राजवाडे यांनी बखर म्हणजे बक= बोलणे या धातूपासून हा शब्द आला आहे असे म्हटले आहे. बक म्हणजे बकणे, बडबडणे, बोलत राहणे. १६७४ नंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ते इ. स. १८२४ पर्यंत बखैर हाच शब्द आढळतो. बखर लेखनाची पंरपरा संस्कृत पुराणकथांकडे आणि वंशानुचरिताकडे जाते, असेही मत अलीकडे मांडले गेले आहे.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Madhurimaraje Chhatrapati, Madhurimaraje withdrew application,
काँग्रेसच्या मधुरिमाराजे छत्रपती यांचा कोल्हापुरातून अर्ज मागे
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
3rd November 2024 Rashi Bhavishya
भाऊबीज, ३ नोव्हेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात १२ राशींचा रविवार जाणार आनंदात, जोडीदाराचा सहवास ते आर्थिक भरभराट होणार
Budhaditya rajyog in scorpio
‘या’ ३ राशी कमावणार बक्कळ पैसा; मंगळाच्या राशीतील बुधादित्य राजयोग देणार पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी

अधिक वाचा: चंद्राबाबू नायडूंनी निवडलेली नवीन राजधानी ‘अमरावती’; बौद्ध  स्तूपाचा वारसा असलेले हे शहर का आहे महत्त्वाचे?

प्राचीन बखरी

इतिहासाचा काही अंश सापडण्याच्या दृष्टीने शालिवाहनाची बखर ही उपलब्ध बखरींत सर्वांत जुनी बखर असल्याचे इतिहासाचार्य राजवाडे मानतात. सातवाहन राजांची माहिती सांगणाऱ्या ‘शालिवाहन बखरीच्या’ दोन प्रती उपलब्ध आहेत. तिच्या प्रास्ताविक विवेचनात चार युगे व युधिष्ठीर-विक्रमादी शककर्ते राजे यांची माहिती दिली आहे. नंतर शालिवाहनाचे चरित्र पौराणिक पद्धतीने सांगितलेले असून, त्यात अद्भुताचा भाग बराच आहे. महानुभावांनी सिंघणादी यादवांच्या बखरी लिहिलेल्या होत्या; पण त्या उपलब्ध नाहीत. परंतु या बखरीतील काही पाने इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे. बखर हा प्रकार प्रथम कोणत्या काळी अस्तित्त्वात आला हे कळण्यास मार्ग नसल्याचे मत पं. महादेव शास्त्री जोशी यांनी संस्कृती कोशात व्यक्त केले आहे.

महिकावतीची बखर

महिकावतीची बखर १३ व्या शतकात लिहिली गेली असे मत वि. ल. भावे यांनी व्यक्त केले आहे. परंतु या बखरीतली सहा प्रकरणे वेगवगेळ्या कालखंडात लिहिली गेल्याचे मानले जाते. महिकावतीच्या ऊर्फ माहीमच्या बखरीतील एकूण सहा प्रकरणांपैकी भगवान् दत्ताने लिहिलेली पद्य प्रकरणे (पहिले व चौथे) इ.स.सु.१५७८ ते १५९४ मधील असावीत, तर केशवाचार्याने लिहिलेला गद्य भाग (प्रकरणे २ व ३) १४४८ मधील आहे. असे दिसते. ह्या बखरीचे पाचवे प्रकरण १५३८ मध्ये लिहिले गेले असावे (त्याच्या लेखकाचे नाव अज्ञात आहे), तर सहाव्याचे लेखन १४७८ मध्ये झालेले दिसते, या प्रकरणांचे लेखक आबाजी नायक आणि रघुनाथपंत कावळे आहेत. महिकावतीची बखर तसेच राक्षसतंगडीची बखर या दोन बखरीत शिवपूर्वकालातील समाजचे दर्शन घडते.

शिवकाळासंबंधीच्या बखरी Bakhar of Chhatrapati Shivaji Maharaj Period

सभासद बखर

इ. स. च्या १७ व्या शतकात महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाल्यानंतर शिवचरित्रावर अनेक बखरी लिहिल्या गेल्या. त्यातील सभासदाची बखर महाराजांच्या निर्वाणानंतर १५ ते २० वर्षात (इ. स. १६९७) लिहिलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्टीने अधिक महत्त्वाची ठरते. बखरकार कृष्णाजी अनंत सभासद हा शिवाजी महाराजांना समकालीन व राजनिपुण असल्यामुळे, त्याने लिहिलेले चरित्र विश्वसनीय वाटते. त्यात अफजलखानाचा वध, दिल्लीला प्रयाण, राज्याभिषेक इत्यादी प्रसंगांचे विस्तृत वर्णन आणि अठरा कारखाने, खजिना, शिलेदार, जंजिरे, गड कोट इत्यादिकांचे भरपूर माहिती आहे. शिवरायांबद्दल निष्ठा असल्यामुळे ही चरित्र कथा आणि भावनोत्कटतेने रंगलेली आहेत. सभासदाची भाषा संस्कृत फारसी मिश्रित, जोरकस ओघवती आहे. साध्या व सरळ निवेदन शैलीमुळे हे चरित्र मराठी वाङ्मयाचे लेणे ठरले आहे.

श्रीशिवदिग्विजय

खंडो बल्लाळ चिटणीस यांनी इ. स. १७१८ साली रचलेली बखर ‘श्रीशिवदिग्विजय’ या नावाने प्रसिद्ध आहे. ती सविस्तर असून, तिची भाषा प्रौढ आणि संस्कृत वळणाची आहे. या बखरीत नंतरच्या कालखंडात काही माहिती घुसडली गेल्याने ती विश्वसनीय राहिली नाही. तिच्यात काही कालनिर्देश आणि व्यक्तिनिर्देशही चुकीचे दिले असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

अधिक वाचा: Harappa ‘या’ उत्खननात सापडले, ४००० वर्षे प्राचीन भारतीय मल्टिग्रेन हाय प्रोटिन डाएट लाडू! संशोधन काय सांगते?

चित्रगुप्त बखर

खंडो बल्लाळ चिटणीस यांचा पुतण्या रघुनाथ यादव चित्रे (चित्रगुप्त) याने इ. स. १७६१ मध्ये लिहिलेली शिवाजी महाराजांची बखर स्वतंत्र नसून, सभासदाच्याच बखरींची विस्तृत आवृत्ती आहे. डौलदार व अलंकारिक भाषा आणि सुंदर वर्णने यांमुळे हे शिव आख्यान पुष्कळच रंगले आहे.

वाकेनिशी बखरी

दत्ताजी त्रिंबक वाकेनवीस हे शिवाजीमहाराजांच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी लिहिलेली दैनंदिनी हीच बखर असल्यामुळे, शिवचरित्राच्या दृष्टीने ही महत्त्वाची ठरते. मलेकर बंधू यांनी इ. स. १७६० -१७७० या काळात लिहिलेली ९१ कलमी बखर मूळ वाकेनिशी बखरी वरून रचलेली आहे.

चिटणीसांची बखर

सातारच्या प्रतापसिंह महाराजांचा चिटणीस मल्हार रामराव यांनी १८१० च्या सुमारास सप्तप्रकरणात्मक शिवचरित्र, मराठ्यांची बखर व इतर पाच छत्रपतींची चरित्रे रचली. या ग्रंथांच्या निर्मितीत चिटणीस बखरीचा संदर्भ घेण्यात आल्याने, हे ग्रंथ मोलाचे ठरतात. या ग्रंथांची लेखनशैली पौराणिक असून स्थलकालांचा आणि घटनाक्रमांचा विपर्यास केल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी समर्पक उपमादृष्टांमुळे या बखरीत केलेली वर्णने आकर्षक वाटतात. त्याची भाषाही प्रौढ व ओजस्वी आहे.

बखरींची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येते. What are the types of Bakhar?

(१) चरित्रात्मक (शिवाजी, संभाजी, ब्रम्होद्रस्वामी यांच्या बखरी) (२) वंशानु चरित्रात्मक (पेशव्यांची बखर ,नागपूरकर मोसल्यांची बखर), (३) प्रसंग-वर्णनात्मक (पाणिपतची बखर, खरड्याच्या स्वारीची बखर), (४) पंथीय (श्रीसमर्थाची बखर) ,(५) आत्मचरित्रपर (नाना फडणवीस, गंगाधरशास्त्री पटवर्धन, बापू कान्हो यांची आत्मवृत्ते), (६) कैफियती (होळकरांची थैली, होळकरांची कैफियत), (७) इनाम कमिशनसाठी लिहिलेल्या बखरी (काही कराणे), (८) पौराणिक (कृष्णजन्मकथा बखर), (९) राजनीतिपर (आज्ञापत्र) इत्यादी.
या बखरींचे बाह्य स्वरूपात आज्ञा, वंशावळी, इतिहासाचे दर्शन घडते. बखरींचे अंतःस्वरूप विविध आविष्कार पद्धती, व्यक्तिचित्रण, नामकरण, स्थलकाल विपर्यास, आज्ञा अशा पाच भागात विभाजित केले जाते.

बखर वाङ्मयाची परंपरा कधी सुरु झाली

बखरवाङ्मयाची परंपरा शिवकाळात सुरु झाली. त्यानंतरच्या काळात निरनिराळ्या प्रकारच्या दोन अडीचशे बखरी लिहिल्या गेल्याचे राजवाडे सांगतात. पण त्यांनी त्यात टिपणे, याद्या, रोजनिश्या, निवाडे, संत चरित्रांची बाडे या सर्वांचा समावेश केला. मानवदर्शनाचा प्रयत्न या गुणांमुळे मराठी वाङ्मयात बखरींना विशेष स्थान मिळाले आहे. समकालीन कवींपेक्षा बखरकारांची अभिरुची उच्च वाटते. बखरीचा लेखनकाल व लेखक यांची नोंद सर्व बखरीत आढळत नाहीत. अंतर्बाह्य पुराव्याच्या आधारे लेखक व काळ निश्चित करावा लागतो. बखरकारांनी कोणासाठी तरी पत्ररूपाने हकीकती लिहिल्यामुळे, त्यांना नावे दिलेली नव्हती. बखरींचे नामकरणही मागाहून झाले आहे.

अधिक वाचा: ‘या’ पर्वताने खरंच घेतला होता का हिंदूंचा बळी? त्याच्या नावामागचा नेमका अर्थ काय?

बखरींचे ऐतिहासिक मूल्यमापन

बखरींचे ऐतिहासिक मूल्यमापन करताना प्रा. शेलोणीकर लिहितात, ‘बखरकारांची भूमिका इतिहासचिकित्सकाची नाही. इतिहासाची लेखनपद्धती किंवा इतिहासशास्त्र याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांच्यापुढे राजतरंगिणी, विक्रमांकचरित्र यांसारखे प्राचीन इतिहासग्रंथ व अठरा पुराणे हेच आदर्श होते. त्यांना अनुसरून कल्पित गोष्टींचा मालमसाला घालून त्यांनी आपली हकीकत रसाळ करण्याचा प्रयत्न केला. कारकुनी पेशाच्या त्या मंडळींनी आपल्या मालकांच्या आज्ञेवरून विविक्षित प्रसंग, व्यक्तीचे कर्तृत्त्व किंवा घराण्यांचे इतिहास यांच्या संबंधीच्या हकीकती, उपलब्ध कागदपत्रे व दंतकथा आख्यायिका यांच्या आधारे लिहून काढल्या. बहुतांशी त्या हकीकती संबंधी माणसाच्या गुणवर्णनपरच असत; अर्थात त्यांमधून निर्दोष, शास्त्रशुद्ध व समतोल ऐतिहासिक विवेचनाची अपॆक्षा करणेच अप्रस्तुत होईल. त्यांना इतिहास न म्हणता ऐतिहासिक कथा असे म्हणजेच जास्त संयुक्तिक ठरेल. त्यांच्या लेखनात तत्कालीन लोकांच्या श्रद्धा, संकेत, चालीरीती, त्यांच्या अशा आकांक्षा व त्यांचे हर्षविषाद यांचे स्पष्ट प्रतिबिंब पडले आहे. त्यामुळे बखरींना समाजशास्त्रीय संशोधनाचे एक ऐतिहासिक साधन म्हणून स्वतंत्र मूल्य आहे, यात शंका नाही. (संदर्भ: प्राचीन मराठी वाडःमयाचे स्वरुप: ह. श्री. शेणोलीकर)

संदर्भ/Research references

१. भावे, वि.ल., तुळपुळे, शं.गो.महाराष्ट्र-सारस्वत, पुणे,१९६३.
२. राजवाडे ,वि.का. राजवाडे-लेखसंग्रह-भाग १ ला ,पुणे ,१९२८.
३. हेरवाडकर, र. वि. मराठी बखर पुणे, १९५७.
४. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संस्कृती कोश पुणे , १९७६
५. शेणोलीकर, ह. श्री. प्राचीन मराठी वाडःमयाचे स्वरुप, कोल्हापूर, १९८७.