Chhatrapati Shivaji Maharaj devotion to Tuljapur Bhavani: छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजापूरच्या भवानीचे निस्सीम भक्त होते. ऐतिहासिक दस्तऐवजात महाराजांच्या भवानीभक्तीचे अनेक दाखले प्रसिद्ध आहेत. आज दसरा आहे. दुर्गा देवीने आजच्याच दिवशी महिषासुराचा वध केला होता. तर प्रभू श्रीरामांंनी रावणाचा वध याच दिवशी केल्याचे मानले जाते. एकूणच वाईटावर विजयाचे प्रतिक म्हणून दसरा हा सण देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला जातो. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच जगदंबेला साक्ष ठेवून वाईटाचा पराभव केला होता.त्याच पार्श्वभूमीवर मराठाकालीन बखरकारांनी महाराजांच्या भवानी भक्तीबद्दल नेमके काय संदर्भ दिले आहेत ते जाणून घेणं नक्कीच माहितीपूर्ण ठरावं!

शिवचरित्रावर अनेक बखरकारांनी भाष्य केलेलं आहे. बखरकारांपैकी कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली बखर शके १६१९ साली पूर्ण झाली. इतिहासकार ग. ह. खरे यांनी या बखरींविषयी लिहिताना म्हटले आहे की, शिवाजी महाराजांची सर्वात जुनी, समकालीन आणि विश्वासू बखर म्हणजे सभासद बखर. सभासद बखर ही शिवछत्रपतींची चरित्रपर बखर आहे. या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते देहवसानापर्यंतचा भाग चरित्ररूपाने येतो. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्यांचा गनिमी कावा, त्यांनी केलेल्या स्वाऱ्या, जलदुर्गाविषयी धोरण इत्यादी गोष्टींचा आढावा या बखरीमध्ये घेतलेला आहे. शंकर जोशी यांनी संपादित केलेल्या बखरीतून प्रस्तुत लेखात संदर्भ घेण्यात आला आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Kalyan East Shiv Sena appoints Nilesh Shinde as city chief
कल्याण पूर्व शिवसेना शहरप्रमुखपदी नीलेश शिंदे यांची नियुक्ती
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल
The decision regarding the permission of the meeting at Shivaji Park Maidan is now with the Urban Development Department mumbai news
शिवाजी पार्क मैदानवरील सभेच्या परवानगीचा निर्णय आता नगरविकास विभागाकडे

सभासद बखरीतील भवानी साक्षात्काराचा संदर्भ:

“अफजलखानाची अवघी फौज एकत्र होऊन औरस- चौरस लष्कर उतरले. आणि पुढे तुळजापूरास आले. तेथे येऊन मुक्काम केला. श्रीभवानी कुलदेवता महाराजांची, तीस फोडून जातीयांस घालून, भरडून पीठ केले. भवानीस फोडतांच आकाशवाणी जाहली की, ‘अरे अफजलखाना, नीचा! आजपासून एकविसावे दिवशीं तुझें शीर कापून, तुझें लष्कर अवघें संहार करून नवकोटी चामुंडास संतृप्त करितें.’ अशी अक्षरांनी जाहाली.” (पृ.८)

अधिक वाचा: Navratri 2024: जिजामातेच्या जन्मकथेचा संबंध रेणुकादेवीशी कसा जोडला गेला; ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

सभासद बखरीतील संदर्भानुसार शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी त्यांना युद्धापासून परावृत्त कारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महाराजांनी माघार घेतली नाही. (छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू) संभाजी राजांना अफजलखानाने मारले, त्यामुळे जे होईल त्याला सामोरे जाऊ, सला करणार नाही हाच निश्चय केला. सभासद बखरीत म्हटल्याप्रमाणे त्या रात्री महाराजांना तुळजापूरच्या भवानीचे मूर्तिमंत दर्शन झाले. देवीने मी तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नकोस तुलाच यश येईल असा आशीर्वाद दिला. हे स्वप्न पडताच राजे जागे झाले आणि जिजाऊंना बोलावून स्वप्न वृत्तांत सांगितला. त्यानंतर सर्व मातब्बर सहकाऱ्यांना बोलावून स्वप्न सांगितलें, ‘श्री प्रसन्न जाहाली, आता अफजलखान मारून गर्दीस मेळवितों.’

अफजलखान वधाबद्दल लिहिताना सभासद म्हणतात, ‘मागें कौरवांचा क्षय पांडवी केला. (तेंव्हा) असा वीरावीरांस झगडा जाहाला. खांसा खान राजियाने एकांगी करून मारिला. अफजलखान सामान्य नव्हे. केवळ दुर्योधनाच जातीने होता. आंगाचा, बळाचाहि तैसाच. त्यास एकले भीमाने मारिला. त्याच प्रमाणे केले. शिवाजीराजाहि भीमच. त्यांनीच अफजल मारिला. हे कर्म मनुष्याचे नव्हे. अवतारीचा होता. तरीच हे कर्म केले. यश आले.’ (पृ १९)

त्याउपरांत मग राजियासी स्वप्नास श्रीभवानी तुळजापूरची येऊन बोलू लागली की, ‘आपण अफजल तुझ्या हातें मारविला व कित्येक पुढेंहि आले त्यांस पराभवांतें नेले. पुढेंहि कर्तव्य उदंड कारण करणे आहे. आपण तुझ्या राज्यांत वास्तव करावे. आपली स्थापना करून पूजेपूजनप्रकार चालविणे. ‘त्याउपरि राजियाने द्रव्य गाडियावरि घालून, गंडकी नदीहून गंडकी पाषाण आणून, श्री भवानीस सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली. धर्मदान उदंड केला. देवीस रत्नखचित अलंकार भूषणे नाना प्रकारे करून दिली. महालोकासे देऊन, संचतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीचे करून महोत्साव चालविला. नवस यात्रा सर्वदा तुळजापूरच्या प्रमाणे येते चालती जाली. आणि तुळजापूरच्या यात्रेस लोक जातात, त्यांस दृष्टांत स्वप्ने होतात की, ‘आपण प्रतापगडास आहे. तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे.’ असे (देवी) बोलू लागली. मोठे जागृत स्थान जाहाले.’ (पृ. २१)
(सभासद बखरीने प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी देवीची स्थापना केल्याचा संदर्भ दिला आहे.)

Shivaji Maharaj
अफजलखान वध, सौजन्य: विकिपीडिया

ज्यावेळी महाराजांनी शाहिस्तेखानाला मारण्याचा निश्चय केला, तेव्हा ते औरंगजेबाच्या नजर कैदेत होते. त्यावेळीही अशाच स्वरूपाचे संदर्भ सभासद बखरीत सापडतात. ह्या चरित्रात एकूण सहा प्रसंगातून देवीचा साक्षात्कार घडलेला आहे. असे असले तरी शंकर जोशी यांनी आपल्या विवेचनात चारच प्रसंगांना अधिक महत्त्व दिले आहे. ते म्हणतात, ‘हे सर्व प्रसंग असे: अफजल, शाहिस्तेखान, जयसिंग, आग्रा येथील चौकी आणि शिवाजी राजांनी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे. हे पाचही प्रसंग शत्रू प्रेरित आहेत. अगतिकत्त्व उत्पन्न करणारे आहेत. पाचवा प्रसंग वगळून इतर चारही ठिकाणी देवीचा साक्षात्कार झाला आहे. महाराजांच्या एकूणच जीवनात अनेक वेळा असामान्य प्रसंग आले. यातील अनेक प्रसंगी देवीचा संचार किंवा दृष्टांत होणं गरजेचं होत. परंतु तो फक्त चार प्रसंगात आढळून येतो. शंकर जोशी पुढे म्हणतात, आणखीही एक गोष्ट येथे घ्यावयाची की, जे प्रसंग चरित्रलेखकदृष्ट आहेत, त्यांत असा देवी संचार नाही.” खरे तर कोणते प्रसंग चरित्रलेखकाने, म्हणजे सभासदांनी स्वतः पहिले आहेत आणि कोणते ऐकीव आहेत याचा निवाडा करण्याचे प्रमाण प्रस्तुत बखरीत अथवा बखरीच्या बाहेर उपलब्ध नसल्याने आपल्याला त्यासंबंधी निर्णायक विधान करता येणार नाही.

Shivaji Maharaj
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली, सौजन्य: विकिपीडिया

भवानी साक्षात्कार आणि कौटिल्य

शिवाजी महाराजांना जो भवानी देवीचा साक्षात्कार झाला, तो दैववाद नसून रणनीतीचा भाग असल्याचे कौटिल्याच्या संदर्भाने आसावरी बापट यांनी त्यांच्या लोकप्रभा या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात स्पष्ट केलेलं आहे. त्या म्हणतात, ‘खानाशी सामना करताना शिवाजी महाराजांनी ‘मंत्रयुद्ध’ या संकल्पनेचा वापर केला, ज्याचा अर्थ कारस्थान रचणे असा होतो. अफझलखानाला अपशकुन होत असताना, राजांना मात्र शुभशकुन मिळाले. प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली, “वत्सा, तलवारीच्या जोरावर त्याला भूमीवर पाड. हे दैत्यशत्रू, तुळजापूर सोडून मी स्वतः तुझ्या साहाय्यासाठी आले आहे” (अणूपुराण – कविंद्र परमानंद, सभासदाची बखर, उद्धृत श्री छत्रपती शिवाजी महाराज, पूर्वार्ध, वा. सी. बेंद्रे, पृ. अनुक्रमे १८९, १७५).

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: सूरत लुटीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

सभासदकारांच्या मते, दुसऱ्या दिवशी महाराजांनी जिजाऊसाहेब, गोमाजी नाईक पानसंबळ, कृष्णाजी नाईक हंकी, मोरोपंत, निळोपंत, आणि नेताजी पालकर यांसारख्या विश्वासूंना स्वप्न सांगून अफझलखानाला पराभूत करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला. तरीही या सर्वांच्या मनात कार्य सिद्ध होईल का, याबद्दल शंका होती. यावर महाराजांनी भारतीय युद्धनीतीतील अंतिम पर्याय मांडला. ते म्हणाले, “सला केलियाने प्राणनाश होईल. युद्ध करिता जय जाहलियाने उत्तम आणि मेलियानेही कीर्ती आहे.” यानंतर महाराजांनी सर्व तयारी करून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. अर्थशास्त्रात ईश्‍वरी साहाय्याचा उपयोग युद्धात कसा करून घ्यावा, हे कौटिल्य पुन:पुन्हा सांगतो. दुर्गलम्भोपाय या तेराव्या अधिकरणात, विजिगीषू परग्राममवाप्तुकाम: सर्वज्ञदैवतसंयोगख्यापनाभ्यां स्वपक्षमुद्धर्षयेत् परपक्षं चोद्वेजयेत। (१३.१.१) येथे संदर्भ शत्रूची राजधानी घेण्याचा आहे. शत्रूची राजधानी घ्यायची असेल, तर विजिगीषूने आपले सर्वज्ञत्व आणि आपला देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी घोषित करून स्वत:च्या लोकांना उल्हासित करावे आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे. याच अधिकरणात पुढे ७ ते १० या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतो, भविष्यकथन करणारे, शकुन सांगणारे, मुहूर्त पहाणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञतेची आणि दैवतसंयोगाची गोष्ट स्वत:च्या देशात पसरवावी. शत्रूच्या देशात त्यांनी विजिगीषूला देवतांचे दर्शन होत असल्याचे आणि दिव्य कोश अन् दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचे सांगावे. राजाची सर्वज्ञता आणि देवता संपर्क याविषयीचा उल्लेख दहाव्या अधिकरणात कूटयुद्धाच्या ठिकाणीही येतो. असाच उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळ्या व्यूहरचनांच्या अध्यायात येतो. त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवतांशी असलेला संपर्क सांगून शत्रूसैन्यात भीती उत्पन्न करावी, असे कौटिल्याचे मत आहे (१०.६.४८-५०). राजांची ईश्‍वरनिष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील देवता संपर्क या उपायाचा उपयोग शिवरायांनी केलाच नसेल, असे ठामपणे सांगता येत नाही (आसावरी बापट; अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध).

संदर्भ:

बापट, आसावरी; अफझलखानवध – एक मंत्रयुद्ध; लोकप्रभा २०१५.

ढेरे, रा. चिं. श्रीतुळजाभवानी, पुणे, २००७.

जोशी, स. ना. आद्य छत्रपती श्रीशिवाजीराजे यांची बखर-कृष्णाजी अनंत सभासद विरचित, २०१९.

सभासदाची बखर व अनुवाद प्रकिया; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१४.