Chhatrapati Shivaji Maharaj Tirupati visit: तिरुपतीचा लाडू हा भारतीयांच्या श्रद्धास्थानाचा विषय आहे, हा लाडू प्रसाद म्हणून तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दिला जातो. प्रसाद म्हणून मिळणाऱ्या या तिरुपतीच्या लाडवाला चवीबरोबरीनेच श्रद्धा आणि भक्ती अशी वलयं असल्याने या लाडवाचे महत्त्व अधिकच आहे. पारंपरिकरित्या तूप, पीठ, साखर, आणि सुका मेवा यांसारख्या शुद्ध शाकाहारी घटकांपासून तयार केलेला लाडू दीर्घकाळापासून भाविकांमध्ये प्रिय आहे. परंतु, अलीकडेच या लाडवात तुपाच्या जागी बीफ टॅलोचा वापर केल्याच्या दाव्यामुळे वादंग निर्माण झाला. तिरुपतीच्या लाडवावरून सुरू झालेल्या या वादावर सर्वच स्तरांतून धार्मिक आणि आरोग्याशी निगडित चिंता व्यक्त करणाऱ्या संमिश्र प्रतिक्रिया चर्चिल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने तिरुपती बालाजीचे मंदिर आणि त्याच्या इतिहासाची चर्चा होत आहे. पण या तीर्थस्थानाचं आणि महाराष्ट्राचं एक आगळं-वेगळं नातं आहे. हे नातं थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित आहे, त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

भूमिदानाचा संदर्भ

प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र चिं. ढेरे यांनी ‘श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर’ या पुस्तकात म्हटले आहे की, महाराष्ट्र आणि तिरुपती बालाजी यांचे नातं हे गेल्या हजार- बाराशे वर्षांहून अधिकच आहे. गेली कित्येक शतकं महाराष्ट्रातील भाविक आवर्जून बालाजीच्या दर्शनासाठी जातात. इतकंच नाही तर मराठा राज्यकर्त्यांनीही श्री वेंकटेशाचे दर्शन आवर्जून घेतले होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांनीही तिरुमलावरील श्री वेंकटेशाचे दर्शन घेतले होते. विशेषतः ही परंपरा शहाजी राजे आणि एकोजी राजांनी यांच्यानंतर सुरू झाली. दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातून अनेक सत्ताधारी विभूतींनी श्री वेंकटेशाचे आणि इतर दाक्षिणात्य देवांचे दर्शन घेतले होते. केवळ दर्शनच घेतले नाही तर, मौल्यवान अलंकार तसेच भूमिदान केल्याचे संदर्भही सापडतात.

अधिक वाचा: ३५७ वर्षे झाली, छत्रपती शिवरायांचा किल्ला मजबूत; पण पुतळा मात्र कोसळला…

मराठा मातब्बरांनी घेतले होते श्री वेंकटेशाचं दर्शन

शिवछत्रपतींनी दक्षिण दिग्विजयाच्या काळात तिरुमलावरील श्री वेंकटेशाच्या पूजेअर्चेसाठी केलेल्या दानाची नोंद सापडते. महाराज श्री वेंकटेशाचं दर्शन घेऊन पुढे कालहस्ती येथे शिवाच्या दर्शनासाठी गेले होते. शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे, राजाराम आणि सेनापती संताजी घोरपडे, रघुजी भोसले द्वितीय अशा मातब्बरांनी श्री वेंकटेशाचं दर्शन घेतलं होतं. पेशवे बाजीराव यांनी त्यांची पत्नी आणि आईसह देवाचं दर्शन घेतलं होतं आणि त्या काळी २० हजार रुपये अर्पण केले होते असा उल्लेख ‘हिस्टरी ऑफ तिरुपती’ या पुस्तकात टी. के. टी. वीरराघवाचार्य यांनी केला आहे. बाजीरावांच्या तीर्थयात्रेचा दिवस १८ मे १७४० असा होता. एन. रमेशनं यांनी वेंकटेश देवस्थानाच्या इतिहासात मराठा राज्यकर्त्यांशी असलेल्या संबंधांविषयी साधार लिहिलेले आहे. तंजावर परंपरेतील मराठा राज्यकर्ते आणि कवी हे वेंकटेश आणि कालहस्ती या क्षेत्रांविषयी समान श्रद्धाभाव बाळगणारे होते.

दक्षिण दिग्विजयासाठी केलेला प्रवास

शिवछत्रपतींनी राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयासाठी जो प्रदीर्घ प्रवास केला, त्यात त्यांनी तिरुपती बालाजी आणि श्रीकलाहस्तीश्वरासह दक्षिणेतील अनेक प्रख्यात दैवतांचे भक्तिपूर्वक दर्शन घेतले होते. काही देवस्थानांना धावत्या भेटी दिल्या होत्या. तर काही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काही दिवस राहून त्यांनी श्रद्धापूर्वक तीर्थविधी केले, दानधर्म केला आणि काही ठिकाणी नित्य नैमित्यिक उपासनेच्या व्यवस्थेसाठी विशेष अनुदानेही दिली. त्यांनी केलेल्या या धर्मकार्याचा सविस्तर तपशील उपलब्ध नाही. तरीही इतर काही उपलब्ध संसाधनात त्यांनी केलेल्या दानधर्माविषयी आपल्याला माहिती मिळू शकते. या कालखंडात महाराजांनी केलेल्या देवदर्शनाचा सविस्तर तपशील प्रसिद्ध अभ्यासक रा. चिं. ढेरे यांनी त्यांच्या ‘शिखर शिंगणापूरचा श्रीशंभू महादेव’ या ग्रंथात दिला आहे.

शिवदिग्विजय बखरीतील संदर्भ

महाराजांनी भेट दिलेल्या या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘शिवदिग्विजय’ या बखरीत आढळतो. शिवदिग्विजयकाराने लिहिले आहे की, ‘कर्नाटक प्रांतीची तीर्थे व देवदर्शन घेत, श्रीव्यंकटेश व अनंतशयन, कमलनयन, अरुणाचल इत्यादी अनुक्रमे पाहून चंदी प्रांती स्वारी जाती झाली.” या उल्लेखातील …’अनंतशयन’ या नावाने उल्लेखिलेले क्षेत्र हे श्रीरंगम असावे असं रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे. येथील विष्णू हा शेषशायी विष्णू आहे. अरुणाचलम हे तिरुवन्नमलै या पर्वताचे नाव आहे आणि श्री व्यंकटेश हा तिरुपती (तिरुमलै/ तिरुमला) या क्षेत्राचा अधिपती असल्याचे सर्वज्ञात आहे. कमलनयन हे तिरुवारुरच्या त्यागराजाचे नाव आहे. येथील त्यागराज शिव आणि कमलांबा या यांना तंजावरच्या भोसले राजकुलाने कुलदैवतांचा मान देऊन श्रद्धेने स्वीकारले होते.

अधिक वाचा: सूरत लुटीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात?

ईस्ट इंडिया कंपनीच्या फॅक्टरी रेकॉर्डमधील वार्तापत्र

शिवाजी महाराजांनी श्री व्यंकटेशाचे आणि कालहस्ती क्षेत्रातील शिवाचे दर्शन कधी घेतले हे ताडून पाहण्यासाठी पुरावा उपलब्ध आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या फोर्ट सेंट जॉर्ज येथील फॅक्टरी रेकॉर्डमधील एका वार्तापत्रात असे म्हटले आहे की, ‘शिवाजी महाराज गोवळकोंड्यात आहेत. ते वीस हजार घोडेस्वार व चाळीस हजार पायदळ घेऊन जिंजीवर चालून जात आहेत. त्यांच्या सैन्यात आघाडीचे सुमारे पाच हजार घोडेस्वार येथून नऊ व आठ कोसावर असलेल्या त्रिपती (तिरुपती) व कालस्ती (कालहस्ती) वरून गेले. येथून चार कोसांवर असलेल्या कांजीवरमला (कांचीपुराला) ते आज रात्री येतील. एवढी मजल एका रात्रीत जाण्याचे त्यांच्या स्वारांच्या अंगवळणी पडले आहे.” हे वार्तापत्र ९ मे १६७७ (वैशाख शुक्ल १५, शके १५९९) या तारखेचे आहे. या दिवशी रात्री शिवाजी महाराज (तिरुपती व कालहस्ती या क्षेत्रांच्या यात्रा करून) कांजीवरम (कांचीपुरम) या महाक्षेत्रात पोहोचणार असल्याची वार्ता हा पत्रलेखक संबंधितांना कळवीत आहे. अर्थात तिरुपती आणि कालहस्ती या क्षेत्रांच्या यात्रा ९ मे १६७७ पूर्वी नुकत्याच घडलेल्या आहेत. या तीन क्षेत्रांपैकी कालहस्ती आणि कांची येथील घटनांसंबंधी अधिक माहिती देणारे एकही साधन आज उपलब्ध नाही; परंतु तिरुपती या क्षेत्रात श्रीनिवासाला नित्य क्षीराभिषेक आणि इतर विधींसाठी एका सत्पात्र ब्राह्मणाला प्रतिवर्षी ४२० रुपयांचे होन देण्याचे ठरवून पहिल्या वर्षाची रक्कम लगेचच दिल्याचा कागद प्रकाशित झालेला आहे. हे वर्षासनासंबंधितचे पत्र वैशाख शुद्ध द्वादशी, शुक्रवार, शके १५९९, पिंगलनाम संवत्सर (४ मे १६७७) या दिवशीचे आहे.

एकूणात तिरुपती बालाजीला आपले आराध्य दैवत मानणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेकांचा समावेश होतो. त्याचा थेट संबंध शिवकालापासून असल्याचे पुरावे आपल्याला कागदपत्रांमधून सापडतात आणि मध्ययुगीन कालखंडातील या तीर्थस्थळाचे महत्त्व समजण्यासही मदत होते.