Obesity Crisis in India : जगभरासह देशात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज प्रत्येक आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती हा लठ्ठपणाच्या समस्येशी लढत आहे. हीच बाब लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना लठ्ठपणाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला. लठ्ठपणावर मात करण्यासाठी खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी देशवासियांना केलं. दरम्यान, भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे? त्याची नेमकी कारणे कोणती? लठ्ठपणावर मात करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबाबत जाणून घेऊ.

मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र तयार करण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येवर मात करावी लागेल. हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नाही तर राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. लठ्ठपणाविरोधी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी पंतप्रधानांनी १० प्रसिद्ध व्यक्तींची नावेही सूचवली, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उद्योगपती आनंद महिंद्रा, अभिनेता-राजकारणी दिनेश लाल यादव, नेमबाजी चॅम्पियन मनु भाकर, वेटलिफ्टिंग चॅम्पियन मीराबाई चानू, मल्याळम सुपरस्टार मोहनलाल, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी, अभिनेता आर माधवन, गायिका श्रेया घोषाल आणि खासदार सुधा मूर्ती यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : Bybit Crypto Theft : आतापर्यंतची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी चोरी; हॅकर्सनी १३००० कोटी रुपये कसे चोरले?

भारतीयांमध्ये लठ्ठपणा कसा वाढत गेला?

  • लॅन्सेटच्या अभ्यासात असे आढळून आले की, १९९० मध्ये ५ ते १९ वयोगटातील भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा ०.४ दशलक्ष होता. २०२२ मध्ये या संख्येत वाढ झाली असून तो १२.५ दशलक्षपर्यंत पोहोचला आहे.
  • १९९० मध्ये २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण २.४ दशलक्ष होते. २०२२ मध्ये महिलांच्या लठ्ठपणाची संख्या ४.४ कोटींवर पोहोचली आहे.
  • २०२२ मध्ये भारत महिला आणि पुरुषांच्या लठ्ठपणाच्या प्रमाणाच्या बाबतीत १९७ देशांमधून अनुक्रमे १८२ आणि १८० व्या क्रमांकावर होता. तसेच मुली आणि मुले दोघांच्या लठ्ठपणाच्या बाबतीत भारताचा जगात १७४ वा क्रमांक आहे, असं अहवालात म्हटलं आहे.
  • २०१९-२१ दरम्यान झालेल्या ताज्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ३.४% आहे, तर २०१५-१६ मध्ये हे प्रमाण २.१% होते.
  • युनिसेफच्या २०२२ च्या वर्ल्ड ओबेसिटी अ‍ॅटलासनुसार, २०३० पर्यंत भारतात २७ दशलक्षांहून अधिक लठ्ठ मुलं असतील. म्हणजेच जागतिक स्तरावर १० पैकी एका मुलाला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. लठ्ठपणाशी लढण्याच्या तयारीत १८३ देशांपैकी भारत सध्या ९९ व्या क्रमांकावर आहे. लठ्ठपणा आणि अति लठ्ठपणामुळे होणारा आर्थिक परिणाम २०१९ मध्ये २३ अब्ज डॉलर्सवरून २०६० पर्यंत ४७९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
  • भारतातील युनिसेफचे पोषणप्रमुख डॉ. अर्जन डी. वॅग्ट यांनी बीबीसीला सांगितले की, भारतातील पाच वर्षांखालील ३६ टक्के मुलांची अजूनही वाढ खुंटलेली आहे. कुपोषणाविरुद्ध लढण्यात आपण मिळवलेले यश अतिपोषणामुळे कमी होत आहे.
  • २०१९ मध्ये मॅक्स हेल्थकेअरने दिल्ली आणि उपनगरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले की, ५-९ वर्षे वयोगटातील किमान ४०% मुलांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुले (१०-१४ वर्षे) आणि तरुण मुलांनाही (१५-१७ वर्षे) लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे.

लठ्ठपणा टाळणे आरोग्यासाठी का महत्त्वाचे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लठ्ठपणा म्हणजे शरीरातील चरबीचा असामान्य किंवा जास्त साठा, जो आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. २५ पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त वजनाचा मानला जातो, तर ३० पेक्षा जास्त बीएमआय लठ्ठपणाचा मानला जातो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, “भारत सध्या लठ्ठपणाच्या टाईमबॉम्बवर बसला आहे. प्रत्येक चौथा किंवा पाचवा व्यक्ती वैद्यकीयदृष्ट्या लठ्ठ किंवा जास्त वजनाचा आहे. जगभरातील ७५ वैद्यकीय संघटनांनी मान्यता दिलेल्या लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजी कमिशनने लठ्ठपणाचे निदान करण्यासाठी जानेवारीमध्ये दोन मार्गदर्शक तत्त्वे सादर केली, ज्यामध्ये क्लिनिकल आणि प्री-क्लिनिकल लठ्ठपणाचा समावेश आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्री-क्लिनिकल लठ्ठपणा म्हणजे शरीरात चरबीचे प्रमाण जास्त असूनही आरोग्याची कोणतीही समस्या उद्भवत नाही. या स्थितीत काळजी घेण्याचा दृष्टिकोन जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने असावा. लॅन्सेट कमिशनने निष्कर्ष काढला की, लठ्ठपणाला फक्त इतर आजारांच्या जोखमीपेक्षा एक स्वतंत्र आजार म्हणून ओळखण्यामुळे निदानात अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे.

भारतात लठ्ठपणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे

भारतीय डॉक्टर आणि संशोधकांच्या मते, लठ्ठपणाची नवीन व्याख्या आणि मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक होती. कारण २००९ च्या जुन्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लठ्ठपणाचे निदान करण्यासाठी फक्त बीएमआयचा वापर केला जात होता. संशोधनातून असे दिसून आले आहे की, लठ्ठपणा मोजण्यासाठी केवळ बीएमआय पुरेसे नाही. या समस्येच्या अचूक निदानासाठी पोटाभोवती साठलेली चरबी आणि संबंधित आरोग्य समस्या विचारात घेणे आवश्यक आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, लठ्ठपणाचे दोन टप्प्यात वर्गीकरण केले जाते.

हेही वाचा :  HKU5-CoV-2 : चीनमध्ये नव्या करोना व्हायरसचा उद्रेक; भारताला किती धोका? विषाणूची लक्षणे कोणती?

पहिल्या टप्प्यात शरीरावर चरबीचे प्रमाण वाढते, परंतु अवयवांच्या कार्यांवर किंवा दैनंदिन क्रियाकलापांवर याचा कोणताही स्पष्ट परिणाम होत नाही. दुसऱ्या टप्प्यात कंबरेचा घेर वाढतो आणि पोटाभोवती अतिरिक्त चरबी जमा होते, ज्यामुळे मधुमेह आणि हृदयरोगांसारख्या आजारांना निमंत्रण मिळू शकते. लठ्ठपणाच्या या नव्या व्याख्येमुळे उपचारांसाठी अधिक अचूक आणि प्रभावी दृष्टिकोन मिळेल, ज्यामुळे संबंधित आजारांचे लवकर निदान आणि उपचार करण्यास मदत होईल.

पुरुषांपेक्षा महिला अधिक लठ्ठ का असतात?

मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशनमधील रिसर्च ऑपरेशन्स विभागाच्या प्रमुख डॉ. गुहा प्रदीपा यांनी महिलांमध्ये लठ्ठपणाची मुख्य कारणे सांगितली आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना प्रदीपा म्हणाल्या की, आजकाल महिला घरकामात इतक्या व्यस्त झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना शारीरिक क्रियाकलापांसाठी वेळच मिळत नाही. भारतामध्ये महिलांना आरोग्यसेवा आणि शिक्षणाच्या संधी कमी मिळतात. पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या कुटुंबातील इतर सदस्यांना प्राधान्य देतात. गर्भधारणेदरम्यान आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्सच्या बदलांमुळे महिलांचे वजन वाढू लागते. पुरुषांमध्ये सहसा ट्रंकल लठ्ठपणाचा (पोटाची चरबी वाढणे) दिसून येतो. पोटाभोवती मोठ्या प्रमाणात चरबी वाढल्याने त्यांना हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

लठ्ठपणा कसा रोखायचा, आहारावर नियंत्रण कसे ठेवावे?

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित केल्यास लठ्ठपणाची समस्या जाणवत नाही. फळे, पालेभाज्या, कडधान्ये आणि प्रथिने समृद्ध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. डॉ. प्रदीपा यांच्या मते, सोडा, कोल्ड कॉफी आणि साखरेचे जास्त प्रमाण असलेले पेयदेखील लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकते. लठ्ठपणा रोखण्यासाठी नियमित किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. त्याचबरोबर दिवसभर पुरेसे पाणी प्यायला हवे. जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खाणं टाळायला हवं. उपाशी राहण्याऐवजी ठराविक अंतराने आहार घेतल्यास लठ्ठपणाची समस्या जाणवत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते. मुलांमधील लठ्ठपणा टाळण्यासाठी त्यांना मोबाइल फोन, गॅझेट्स किंवा टीव्हीपासून दूर ठेवावे. त्याऐवजी बाहेरील खेळ आणि घरातील किरकोळ कामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्यावे, जेणेकरून त्यांची शारीरिक हालचाल होईल.

Story img Loader