ब्रिटनमधील बाललैंगिक शोषण प्रकरणाची चर्चा सध्या जोर धरत आहे. या प्रकरणावरून एलॉन मस्क यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यावर आरोप केले आहेत. स्टार्मर हे तपास समितीचे अध्यक्ष असतानाही त्यांनी आरोपींवर खटला चालवण्यास मान्यता दिली नाही, असे मस्क म्हणाले. कीर स्टार्मर यांनी सोमवारी (६ जानेवारी) एलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. २००० च्या दशकाच्या मध्यात पहिल्यांदा उघड झालेल्या ब्रिटनमधील चाईल्ड ग्रूमिंग स्कँडलवरून अनेक दिवसांपासून कीर स्टार्मर यांच्यावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात अनेक पाकिस्तानी पुरुषांचा समावेश आहे; ज्यात ११ वर्षांच्या तरुण मुलींवर बलात्कार आणि तस्करी केली गेल्याचे आढळून आले होते. अमेरिकेतील अब्जाधीश एलॉन मस्क यांनी या प्रकरणात ब्रिटनच्या पंतप्रधानांवर सातत्याने आरोप केले आहेत.
स्टार्मर यांनी सोमवारी मस्क यांचे नाव न घेता सांगितले, “जेव्हा मी पाच वर्षे तपास समितीचा अध्यक्ष होतो, तेव्हा मी या ग्रूमिंग प्रकरणावर लक्ष केंद्रित केले होते आणि म्हणूनच मी बंद केलेले प्रकरण व कथितपणे पूर्ण झालेले खटले पुन्हा उघडले. आशियाई ग्रूमिंग गँगचा पहिला मोठा खटला मी समोर आणला. मी संपूर्ण फिर्यादीचा दृष्टिकोन बदलला,” असे ते म्हणाले. ग्रूमिंग म्हणजे काय? ब्रिटनमधील ग्रूमिंग स्कँडल काय आहे? एलॉन मस्क यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांवर काय आरोप केले आहेत? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : नारायण मूर्ती यांच्या ‘Infosys’ने पुढे ढकलला पगारवाढीचा निर्णय; कारण काय? आयटी कंपन्यांची स्थिती काय?
ग्रूमिंगचा अर्थ काय?
ग्रूमिंग म्हणजे एखादी व्यक्ती शोषणात्मक लैंगिक संबंध सुरू करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांशी विश्वासाचे नाते प्रस्थापित करते. आरोपी भेटवस्तू आणि विचारशील वर्तनाद्वारे अल्पवयीन मुलांशी मैत्री करतात, त्यानंतर मुले त्यांच्यावर विश्वास ठेवू लागतात. त्याचाच गैरफायदा घेत, मुलांवर दबाव आणून, त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रेरित केले जाते. त्यांना अनेक लोकांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, त्यांना व्यसन लावले जाते. यात मुख्यतः मुलींचे शोषण केले जाते. त्या मुली व्यसनाच्या आहारी असल्यास, आपले लैंगिक शोषण होत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही.
ब्रिटनमधील ग्रूमिंग स्कँडल काय आहे?
रॉदरहॅम, ब्रिस्टल, कॉर्नवॉल, ऑक्सफर्ड व डर्बीशायर यांसारख्या ब्रिटिश शहरांमध्ये १९८० च्या उत्तरार्धापासून ते २०१२ पर्यंत टोळ्यांनी मुलांचे शोषण केल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापैकी काही प्रकरणांमध्ये गुन्हेगार पाकिस्तानी वंशाचे होते. अनेकदा या टोळ्या केअर होममध्ये किंवा विभक्त कुटुंबातील मुलींना लक्ष्य करीत असत. मुलींशी मैत्री करून, त्यांना ड्रग्ज आणि अल्कोहोल यांसारखे व्यसन लावले जायचे. मग त्याचाच गैरफायदा घेत, अनेकदा सामूहिक बलात्कार आणि तस्करी केली जायची. या स्कँडलमधून वाचलेल्यांपैकी काहींनी त्यांचा भयावह अनुभवही सांगितला आहे.
कॅसी पाईकचे प्रे यांच्या पुस्तकात त्यांनी, “गेल्या काही आठवड्यांपासून मी केअर होममध्ये राहत होते आणि अनेक दिवसांपासून मी माझ्या कुटुंबातील कोणालाही पाहिले नव्हते. मी पिक-अप ग्रूमिंग टोळीबरोबर वेळ घालवायला लागले होते. केअर होमपेक्षा मी त्यांच्याबरोबर वारंवार वेळ घालवत असायचे. टोळीतील ती मुलं जवळ यायची, मला गाडीत बसवायची आणि अनेकदा रात्री किंवा जास्त वेळेसाठी घेऊन जायची. कधी कधी मी अनेक दिवस गायब असायचे. दारू आणि ड्रग्समुळे मला वेळेचे भान नसायचे,” या शब्दांत आपला अनुभव मांडला आहे. त्या वेळी त्या ११ वर्षांच्या होत्या. त्यांच्या आईचा हंटिंग्टनच्या आजाराने मृत्यू झाला होता आणि त्यांचे वडील व्यसनी होते. बऱ्याच वर्षांमध्ये ब्रिटिश पोलिसांना या प्रकरणाच्या मूळाशी जाण्यात यश न आल्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्याकडे विविध वैयक्तिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पीडितांना गांभीर्याने न घेतल्याबद्दल आणि कथितरीत्या मुलांचे हातमोजे घालून, केस हाताळल्याबद्दल त्यांच्यावर या प्रकरणावरून अनेक आरोप झाले आहेत.
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, “रॉदरहॅममधील अत्याचाराच्या चौकशीत १६ वर्षांच्या कालावधीत १,४०० मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे आढळून आले. या प्रकरणात प्रामुख्याने ब्रिटिश पाकिस्तानी पुरुषांचा समावेश होता. टेलफोर्डमधील तपासणीत असे आढळून आले की १,००० मुलींवर ४० वर्षांहून अधिक काळ अत्याचार केले गेले होते आणि काही प्रकरणांची चौकशी वंशवाद निर्माण होईल या चिंतेमुळे केली गेली नव्हती. अतिउजव्या पक्षांनी या प्रकरणांचा वापर इमिग्रेशनविरुद्ध युक्तिवाद करण्यासाठी आणि पुढे वर्णद्वेषी आरोप करण्यासाठी केला आहे.
हे प्रकरण आता चर्चेत येण्याचे कारण काय?
ऑक्टोबरमध्ये ब्रिटनचे संरक्षणमंत्री जेस फिलिप्स यांनी ओल्डहॅममधील लैंगिक शोषण प्रकरणांच्या राष्ट्रीय चौकशीची विनंती नाकारली. आधीच सुरू असलेली स्थानिक चौकशी पुढे जावी, असे त्यांचे सांगणे होते. त्यानंतर सोशल मीडियावर ग्रूमिंग स्कँडल प्रकरणाच्या चर्चेने जोर धरला. त्यानंतर एलॉन मस्क यांनी कीर स्टार्मर यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.
स्टार्मर यांची भूमिका काय?
‘फायनान्शियल टाइम्स’मधील वृत्तात म्हटल्याप्रमाणे, “स्टार्मरने २००८ आणि २०१३ दरम्यान क्राउन प्रोसिक्युशन सर्व्हिस चालवली, तेव्हा हा घोटाळा पहिल्यांदा उघड झाला.” अनेकांनी स्टार्मर यांचा बचाव केला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे बालशोषणाच्या अनेक प्रकरणांमधील दोषी समोर आल्याचे सांगितले. एफटीच्या अहवालात उत्तर-पश्चिम इंग्लंडचे माजी मुख्य अभियोक्ता नझीर अफझल यांनी म्हटले आहे, “स्टार्मर यांनी २०१३ मध्ये तपास समितीचे अध्यक्षपद सोडले. ते अध्यक्षपदी असताना प्रत्येक प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि कारवाईही झाली.
हेही वाचा : ‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
स्टार्मर यांनी मला दिलेला पाठिंबा, संसाधने व संरक्षण याशिवाय हे शक्य झाले नसते.” अहवालात असेही म्हटले आहे की, २०१३ मध्ये स्टार्मर यांनी तरुण पीडितांना डिसमिस केले जाणार नाही याची खात्री करण्यासाठी अभियोजकांनी ग्रूमिंग केसेस कशा हाताळल्या पाहिजेत याबद्दल सुधारित सीपीएस प्रक्रिया आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.