बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. आता हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. शेख हसीना यांच्या पतनामागे परकीय हात आहे का? असा प्रश्न विविध माध्यम वाहिन्यांनुसार केला जात आहे. शेख हसीनांची सत्ता उलथवून लावण्यामागे पाकिस्तानचे इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि चीनचा हात आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये राखीव जागांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारविरोधी निदर्शनांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले, त्यानंतर हे आंदोलन आणखीनच चिघळले. बांगलादेश लष्करातील जनरल वकार-उझ-झमान यांनी शांततेचे आवाहन केले असून अंतरिम सरकार स्थापन केले जात असल्याचे सांगितले. पण, खरंच शेख हसीना यांची सत्ता उद्ध्वस्त होण्यामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे का? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएसआयने केला विद्यार्थ्यांचा वापर?

‘न्यूज १८’ ने सोमवारी सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालाविषयी सांगितले. पाकिस्तानच्या आयएसआयने हसीना यांच्यावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला. यामागे पाकिस्तानचा भारतविरोधी सरकार स्थापन करण्याचा उद्देश होता, असे सूत्रांनी सांगितले. हसीना यांच्या विरोधात आयएसआयचे स्लीपर सेल सक्रिय केले गेले असल्याची माहितीही यात देण्यात आली. “आयएसआय ढाक्यातील परिस्थिती आणखी बिघडवण्यासाठी जमात-ए-इस्लामी आणि त्यांची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिविर’चा वापर करत आहे. जमात-ए-इस्लामी ही संघटना पाकिस्तानच्या अत्यंत जवळची मानली जाते. त्यांना वेळोवेळी गुप्त निधी दिला जात असल्याची माहिती आहे. त्यांना ढाक्यातील पाकिस्तानी अधिकार्‍यांकडून नियमित माहिती आणि सूचना मिळतात,” असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : भारतविरोधी भूमिका घेणारे, नोबेल विजेते मुहम्मद युनूस कोण आहेत? बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापनेत त्यांचे नाव आघाडीवर का?

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात असे नमूद करण्यात आले आहे की, इस्लामी छात्रशिवीर, बांगलादेशमध्ये प्रतिबंधित असलेल्या जमात-ए-इस्लामीचा भाग आहे. ही शाखा हसीना यांच्या विरोधात द्वेष वाढवण्याचे आणि बांगलादेशात विध्वंस वाढवण्याचे काम करत आहे. वृत्तपत्राने म्हटले आहे की, गुप्तचर यंत्रणेने सूचित केले आहे की, आयएसआयच्या सदस्यांनी बांगलादेशात व्यापक हिंसाचार भडकवण्याची योजना आखली होती. “आयएसआय-समर्थित जमात-ए-इस्लामीला शेख हसीना यांचे सरकार अस्थिर करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला भरीव आर्थिक पाठबळ मिळाले होते. या निधीचा बहुतांश भाग पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या चिनी संस्थांकडून आल्याचे मानले जाते,” असे एका अधिकाऱ्याने वृत्तपत्राला सांगितले. “जमात-ए-इस्लामी किंवा आयसीएसचे अंतिम उद्दिष्ट बांगलादेशात तालिबानसारखे सरकार स्थापन करणे आहे आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आयएसआय त्यांना पाठिंब्याचे आश्वासन देत आहे.

बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. आता हे सर्व पूर्वनियोजित असल्याचे सांगितले जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

बांगलादेशमधील हिंसक आंदोलनात चीनचाही हस्तक्षेप?

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या म्हणण्यानुसार, चीनच्या राज्य आणि सुरक्षा मंत्रालयाने (एमएसएस) देखील या आंदोलनाला पाठबळ दिल्याचा संशय आहे. हसीना यांनी भारत आणि चीन यांच्यात कराराबाबत असो किंवा इतर काही प्रकल्पांबाबत, कायम समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, चीनने भारताच्या आजूबाजूच्या देशांवर आपले नियंत्रण ठेवले आहे आणि बांगलादेशात लष्कराच्या पाठिंब्याने सरकार स्थापन झाल्यास चीनशी जवळीक वाढेल, हादेखील यागील हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. गुप्तचर यंत्रणेतील एका सूत्राने वृत्तपत्राला सांगितले की, बांगलादेशमधील नवीन सरकार केवळ चीनच्या राज्य आणि सुरक्षा मंत्रालयासाठी फायद्याचे ठरेल. “याचे एक उदाहरण म्हणजे अलीकडेच चीनमध्ये राज्य आणि सुरक्षा मंत्रालयाद्वारे प्रसारित करण्यात आलेला एक प्रचार व्हिडीओ आहे, ज्यामध्ये परकीय हेर सर्वत्र असल्याचा इशारा देण्यात आला आहे.”

बांगलादेशातील घडामोडी भारतासाठी चिंताजनक?

बांगलादेशमधील भारताच्या माजी उच्चायुक्त वीणा सिकरी यांनी सोमवारी ‘द ट्रिब्यून’शी बोलताना बांगलादेशातील घडामोडी भारतासाठी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. सिकरी यांनी या प्रकरणांमध्ये शेजारी देशांच्या हस्तक्षेपावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकीय निषेधात रूपांतर झाले. या निषेधादरम्यान त्यांनी बंदी घातलेल्या जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांची उपस्थिती असल्याचेही सांगितले. तसेच हसीना यांनी नुकताच चीन दौरा केला होता. या दौर्‍यादरम्यान हसीना यांना देण्यात आलेल्या वागणुकीबद्दलही त्या बोलल्या.

“मला नेहमीच परदेशी हस्तक्षेपाची (बांगलादेशच्या परिस्थितीत) काळजी वाटत असते. शेख हसीना यांचा चीन दौरा अत्यंत वाईट गेला, याचा मला धक्काच बसला. चीनने त्यांचे प्रोटोकॉलनुसार योग्य रीतीने स्वागतही केले नाही. शी जिनपिंग यांनी त्यांची वेगळी भेट घेतली नाही. चीन अशी वागणूक सगळ्या नेत्यांना देतो असे नाही आणि चीनने असे का केले हे समजणे कठीण होते. परंतु, आता त्याचे कारण समोर आले आहे. पाकिस्तान-चीन संबंध खूप मजबूत आहे. जमात-ए-इस्लामीने घेतलेली भूमिका भारतासाठी त्रासदायक ठरेल,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “या अस्थिरतेमुळे भारत खूप चिंतेत आहे. परिस्थिती शांत व्हावी अशी आमची इच्छा आहे. बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी अंतरिम सरकार कार्यभार स्वीकारेल असे म्हटले आहे. परंतु, हे अंतरिम सरकार कसे आकार घेईल, हे सांगता येणे कठीण आहे. यात जमात-ए-इस्लामीची भूमिका खूप मोठी असल्याचे दिसते, त्यामुळे बांगलादेशच्या तीव्र आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात आहे का? याचा विचार करणे भाग पडते.”

सर्वपक्षीय बैठकीत चर्चा

बांगलादेशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आजच्या सर्वपक्षीय बैठकीत केंद्राने म्हटले आहे की, हसीना यांना बेदखल करण्याचा कट रचला जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त एनडीटीव्हीच्या सूत्रांनी दिले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्राने म्हटले आहे की, हसीना यांची सत्ता उलथून लावण्याच्या कटात अनेक राजकीय खेळाडूंचा सहभाग असू शकतो. हसीना यांच्या पलायनाचा सामना करण्यासाठी केंद्र काय करत आहे, याची माहिती जयशंकर यांनी नेत्यांना दिली.

ते म्हणाले की, सरकार सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. तसेच भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी बांगलादेशी लष्कराशी सतत संपर्कात आहे. परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्राची अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना काय आहे, त्यात पाकिस्तानचा सहभाग आहे का आणि सरकारला या घडामोडींचा अंदाज आला आहे का, असे तीन प्रश्न सभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जयशंकर यांना विचारले. यावर एस. जयशंकर म्हणाले की, केंद्र प्रत्येक गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सरकार इस्लामाबादचा सहभाग आहे की नाही, याचाही तपास करत आहे. “कोणत्याही निर्णयावर लगेच मत मांडणे शक्य नाही. परंतु, बांगलादेशातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एका पाकिस्तानी मुत्सद्दीने त्याचे सोशल मीडिया प्रोफाइल बदलले आहे,” असे जयशंकर यांनी सांगितले.

हेही वाचा : राजकीय आश्रय म्हणजे काय? शेख हसीना लंडनमध्ये आश्रय का मागत आहेत?

दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “अंतरिम सरकारमध्ये कोण असणार आहे हे अद्याप माहीत नाही. जमात-ए-इस्लामीने भूतकाळात भारताबाबत अत्यंत प्रतिकूल वृत्ती बाळगली आहे,” असे थरूर यांनी ‘एएनआय’ला सांगितले. त्यांनी बांगलादेशातील हिंदू घरे, मंदिरे आणि व्यक्तींवर अलीकडील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि परिस्थिती लवकर स्थिर न झाल्यास संभाव्य निर्वासितांना संकटाचा इशाराही दिला. “हिंदू घरे, मंदिरे आणि व्यक्तींवर हल्ले झाल्याच्या काही बातम्या येत आहेत. काल लुटमारीची चित्रे आपण सर्वांनी पाहिली. ही परिस्थिती काही दिवसांत शांत आणि स्थिर होऊ शकते. जर तसे झाले नाही तर ही चिंतेची बाब असेल. मला आशा आहे की, आमचे उच्चायुक्त आणि तिथले आमचे कर्मचारी सुरक्षित आहेत आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत,” असे त्यांनी एएनआयला सांगितले.