पाकिस्तानच्या ग्वादरमधील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २० जानेवारीला उद्घाटन झाले. कराचीहून निघालेले पाकिस्तानच्या सरकारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या ग्वादर विमानतळावर उतरले. ग्वादर हे केवळ चीन आणि पाकिस्तानसाठीच नाही तर भारताच्याही दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे.
मोक्याचे स्थान
पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि चीन यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी मार्गातील बंदर असलेले ग्वादर पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियासाठी मोक्याच्या ठिकाणी आहे. इराणच्या सीमेला लागून असलेल्या आणि गेल्या काही वर्षांपासून अशांत असलेल्या बलुचिस्तानमधील हे शहर भू-सामरिक दृष्टीने पाकिस्तानबरोबरच चीनसाठीही तितकेच महत्त्वाचे आहे. जमिनीवरील, सागरी आणि हवाई वाहतुकीमध्ये सुधारणा झाल्यानंतर प्रादेशिक दळणवळणाचे केंद्र म्हणून ग्वादर झपाट्याने उदयाला येईल अशी अपेक्षा आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता या शहरामध्ये आहे. विमानतळ, सागरी बंदर, विद्युतऊर्जा प्रकल्प, आर्थिक क्षेत्रे, खनिज आर्थिक प्रक्रिया क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र आणि ईस्ट-बे द्रुतगती मार्ग असा तेथे निर्माणावस्थेत असलेल्या प्रकल्पाचा पसारा आहे.
चिनी व्यापारासाठी सोयीचा
चीनच्या व्यापारातील एक केंद्र असलेले काशगर हे शांघायपासून ४५०० किमी अंतरावर आहे. तर शांघाय व ग्वादरदरम्यानचे अंतर २८०० किमी आहे. ग्वादरमुळे चीनला अफगाणिस्तान आणि मध्य आशियायी देशांपर्यंत पोहोचता येईल. भारत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारातून अडथळे आणू शकतो, पण ग्वादरच्या मार्गात तसे करता येणार नाही असे ‘इस्लामाबाद पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’चे म्हणणे आहे.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प
ग्वादरचा विमानतळ थोड्या विलंबाने का होईना बांधून पूर्ण होऊन कार्यरत झाला आहे, बंदराचाही विस्तार केला जात आहे. सध्या जेवढा भाग पूर्ण झाला आहे तिथून मालवाहतूक सुरू झाली आहे. यापूर्वीचे बंदर छोटे आणि अपुरे होते. आता ते नव्याने बांधले जात आहे. दक्षिण आशिया आणि मध्य आशियाला जोडणारे हे बंदर सागरी व्यापार मार्गासाठी अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. चीनच्या अतिशय महत्त्वाकांक्षी ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर’अंतर्गत (सीपीईसी) ग्वादरमधील प्रकल्प विकसित केले जात आहेत. ग्वादरचे रूपांतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूक केंद्रात करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
ग्वादर विमानतळ
हा विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आला. त्यासाठी चीनने २३ कोटी डॉलर इतका निधी पुरवला. त्याशिवाय तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळही उपलब्ध करून दिले. विमानतळाचा विस्तार जवळपास ४३० एकर जमिनीत झालेला आहे आणि एका वर्षात चार लाख प्रवासी हाताळण्याची त्याची क्षमता आहे. विमानतळावर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे प्रादेशिक दळणवळ वाढेल आणि जागतिक व्यापार व पायाभूत सुविधा विकासांमध्ये पाकिस्तानचे स्थान बळकट होईल अशी तेथील राज्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ बलुचिस्तानच्याच नाही, तर पाकिस्तानच्या एकंदर अर्थव्यवस्थेला खूप लाभ होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त केली.
चीनसाठी ‘सीपीईसी’चे महत्त्व
हा इकॉनॉमिक कॉरिडॉर चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’मधील (बीआरआय) सर्वात खर्चिक प्रकल्प आहे. ‘बीआरआय’अंतर्गत जमीन आणि सागरी मार्गाने आशिया, आफ्रिका आणि युरोप खंडांना जोडण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे प्रादेशिक एकात्मता सुधारेल, व्यापार वृद्धिंगत होईल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असे चीनचे म्हणणे आहे. मात्र, ‘बीआरआय’च्या माध्यमातून या भागातील जास्तीत जास्त देशांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा चीनचा हेतू असल्याची शंका आहे. ‘बीआरआय’मधील सर्वाधिक पैसा चीन ‘सीपीईसी’मध्ये गुंतवत आहे. त्यावरून हा प्रकल्प चीनसाठी किती महत्त्वाचा आहे ते लक्षात येईल.
चीनची गुंतवणूक
‘सीपीईसी’अंतर्गत पाकिस्तानमधील एकूण प्रस्तावित ६२ अब्ज डॉलर गुंतवणुकीपैकी आतापर्यंत ३० अब्ज डॉलर चीनने गुंतवले आहेत. पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या कॉरिडॉरमध्ये २८ अब्ज डॉलर खर्चाचे विद्युत प्रकल्प कार्यरत झाले आहेत. जागतिक बँकेच्या अहवालांनुसार, चीन पाकिस्तानचा सर्वात मोठा कर्ज पुरवठादार आहे. २०२३पर्यंत पाकिस्तानवरील एकूण बाह्य कर्ज १३० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले होते. त्यापैकी जवळपास २९ अब्ज डॉलर कर्ज चीनने पुरवले आहे. हे प्रमाण पाकिस्तानवरील एकूण कर्जाच्या २२ टक्के इतके आहे.
दहशतवादामुळे नुकसान
गेल्या तीन ते चार दशकांपासून दहशतवाद हा पाकिस्तानच्या धोरणाचा अलिखित पण अतिशय महत्त्वाचा भाग राहिला आहे. भारतात आधी पंजाब, नंतर काश्मीर आणि त्यानंतर देशभरात शक्य होईल तिथे पाकिस्तानने दहशतवादाचा वापर केला. त्यामुळे अर्थातच भारताचे मोठे जीवित आणि आर्थिक नुकसान झाले. त्यातूनही मार्ग काढत भारताने आघाडीची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली. पाकिस्तानने मात्र स्वतःच्या देशातील शेतकरी, कामगार, लहान-मोठे व्यावसायिक, व्यापारी, अपवाद वगळता काही उद्योजक यापैकी कोणालाही प्राधान्य न देता दहशतवादी कारवायांवर लक्ष केंद्रित केले. त्याचा मोठा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. आधी अमेरिका आणि गेल्या काही वर्षांपासून चीनच्या मदतीने तग धरून राहण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था चीनच्या हाती गेल्याचे चित्र आहे.
ग्वादर वि. चाबहार
चीन भारताच्या शेजारी देशांवरील प्रभाव वाढवून भारताला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याची भीती आहे. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या चारही देशांमध्ये चीनने आपला प्रभाव गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढवला आहे. ग्वादर बंदरामुळे आपले आर्थिक हितसंबंध धोक्यात येण्याची शक्यता विचारात घेऊन भारताने इराणमधील चाबहार बंदरावर लक्ष केंद्रित केले आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि चाबहारला जोडणारे रस्ते बांधले जात आहेत. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतरही तेथील मानवतावादी मदत भारताने सुरू ठेवली आहे. त्यामुळे एकीकडे इराण आणि दुसरीकडे अफगाणिस्तान अशा बाजूने भारत पाकिस्तानच्या दोन्ही दिशांना आपली बाजू भक्कम ठेवण्याचे भारताचे डावपेच आहेत.
nima.patil@expressindia.com