चीनमधील विवाह दरात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. ही सध्या देशात एक मोठी समस्या ठरत आहे. २०२४ मध्ये देशभरात ६.१ दशलक्ष विवाहांची नोंदणी झाली. २०२३ मध्ये हा आकडा ७.७ दशलक्ष होता. या घसरणीमुळे चीनचे राष्ट्रीय राजकीय सल्लागार चेन सोंग्शी यांनी कायदेशीर विवाहाचे वय २२ वरून १८ करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला आहे. चीनमधील विवाह दर घसरला आहे आणि त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यात वाढता आर्थिक दबाव, विवाहाबद्दलचा सामाजिक दृष्टिकोन व उच्च शिक्षणाचा स्तर यांचा समावेश आहे. त्यातच चीनमध्ये वधू खरेदीचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. वधू खरेदी करण्याचा नेमका प्रकार काय आहे? लग्नासाठी देशातील महिलांना सोडून विदेशी महिलांना का प्राधान्य दिले जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

चीनमधील घटता विवाह दर

चीनमधील शहरात राहणाऱ्या महिलांचा सामाजिक दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. त्यांचा दृष्टिकोन लग्न आणि मूल जन्माला घालणे एवढाच मर्यादित राहिलेला नाही. महिलांना त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. दुसरीकडे वाढत्या राहणीमानाच्या खर्चामुळे अनेक तरुणांसाठी लग्न करणे परवडणारे राहिलेले नाही. तसेच चीनमध्ये बऱ्याच काळापासून स्त्री आणि पुरुषांच्या संख्येत असमतोल असल्याचे चित्र आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला चीनमध्ये जन्मदर १०० मुलींमागे १२१ मुले, असा होता. त्यावेळी काही राज्यांमध्ये हा दर १०० मुलींमागे १३० पेक्षा जास्त मुले, असा होता.

१९८० च्या दशकात जन्मलेल्यांमध्ये लिंग असमतोल स्पष्टपणे दिसून येतो. १९८० च्या दशकाच्या मध्यापासून अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानाचा वापर वाढला आणि त्यामुळे पालकांना गर्भात मुलगी आहे की मुलगा, हे कळू लागले. त्यामुळे अनेकांकडून मुलगी असल्यास गर्भधारणा थांबवण्यात आली. चीनमध्ये अविवाहित पुरुषांना ‘लेफ्टओव्हर मॅन’ (चिनी भाषेत शेंगनान शिदाई), असे संबोधले जाते. हा एक इंटरनेटवरील शब्द आहे, जो २०२० ते २०५० मधील कालावधीचा संदर्भ देतो. या काळात तब्बल ३० ते ५० दशलक्ष चिनी पुरुषांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

चीनमधील शहरात राहणाऱ्या महिलांचा सामाजिक दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

परंतु, यातून निर्माण झालेला प्रश्न असा आहे की, यातील बरेच पुरुष लग्न करू इच्छितात. परंतु, जोडीदार न मिळाल्याने काही चिनी पुरुष विदेशी वधूंना खरेदी करण्याकडे वळले आहेत. या वधूंच्या वाढत्या मागणीमुळे बेकायदा विवाहांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण भागात त्यांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आग्नेय आशियातल्या शेजारील देशांमधून चीनमध्ये तस्करी केलेल्या मुली आणि महिलांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये म्यानमारहून चीनमध्ये होणाऱ्या वधूंच्या तस्करीबद्दल प्रसिद्ध झालेल्या ‘ह्युमन राईट्स वॉच’च्या अहवालानुसार, “एक सीमा आणि दोन्ही बाजूंच्या कायदा अंमलबजावणी संस्थांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अभाव यामुळे असे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणामुळे तस्करांचा व्यवसाय वाढत आहे आणि त्यांची भरभराट होत आहे”. चीन सरकारने आता या उद्योगावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मार्च २०२४ मध्ये चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने महिला व मुलींच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरुद्ध मोहीम सुरू केली आणि हे गुन्हे संपविण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले.

खरेदी केल्या जाणाऱ्या विदेशी वधू

विदेशी महिलांचे चिनी पुरुषांशी केले जाणारे विवाह व्यावसायिक एजन्सींद्वारे केले जातात. ते चीनच्या राज्य परिषदेनुसार बेकायदा आहेत. शेजारच्या देशांमधील महिला आणि मुलींना बहुतांशी दलालांकडून चीनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्यात येईल, असे आश्वासन देऊन फसवले जाते. चीनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना अशी आश्वासने दिली जातात आणि मग त्यांना चिनी पुरुषांना ३,००० डॉलर्स ते १३,००० डॉलर्समध्ये विकले जाते. चीनमध्ये सीमापार बेकायदा विवाहांचे प्रमाण निश्चित करणे आव्हानात्मक आहे. कारण- याचे स्वरूप गुप्त आहे.

ब्रिटनच्या गृह कार्यालयाच्या अलीकडील आकडेवारीवरून असेही दिसून येते की, व्हिएतनामधील मानवी तस्करीला बळी गेलेल्यांपैकी ७५ टक्के लोकांची चीनमध्ये तस्करी करण्यात आली होती. त्यामध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण ९० टक्के आहे. २०२२ मधील पुरस्कार विजेता माहितीपट ‘द वूमन फ्रॉम म्यानमार’ याच विषयावर आधारित होता. त्यात तस्करीद्वारे चीनमध्ये लग्नासाठी विकल्या गेलेल्या एका म्यानमारमधील महिलेची कहाणी दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात तस्करी करण्यात आलेल्या वधूंचे वास्तव दाखवण्यात आले आहे. या माहितीपटात महिलांना छळाचा कसा सामना करावा लागतोय आणि त्यांना वस्तू म्हणून कसे वागवले जात आहे, हे दाखवण्यात आले आहे. या माहितीपटात दाखविण्यात आलेल्या तस्करीत अडकलेल्या लॅरी या महिलेने स्पष्ट केले की, जोवर मी मुलांना जन्म घालू शकते, तोवर मी जिवंत आहे.

चीनमधील घटत्या विवाह दराचा देशावर परिणाम

चीनमधील विवाह संकटाचे देशाच्या लोकसंख्याशास्त्रीय भविष्यावर दूरगामी परिणाम होत आहेत. वाढत जाणारी वृद्ध लोकसंख्या हे चिनी आर्थिक वाढ आणि सामाजिक स्थिरतेसाठी सर्वांत मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. आर्थिक वाढीच्या बाबतीत कामगार शक्ती महत्त्वाची आहे; परंतु चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स सल्लागार मंडळाचे सदस्य जस्टिन लिन यिफू यांचे सांगणे आहे की, कामगार हे सर्वांत महत्त्वाचे आहेत; मात्र देशात त्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे.

देशातील पुरुष मोठ्या संख्येने अविवाहित आहेत. त्यामुळे सामाजिक स्थिरतेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासात असे आढळून आले आहे की, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष-महिला लिंग गुणोत्तर आणि गुन्हेगारी दर आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, चीनमध्ये १९९० च्या दशकाच्या मध्यापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे.अविवाहित पुरुष असल्याने हा आकडा १४ टक्क्यांनी वाढला आहे. चीनमधील अविवाहित पुरुष कोणाशी लग्न करतील, हा प्रश्न देशासाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. सरकार याबाबत नक्की काय पावले उचलणार यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.