चीनने मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर करून हायड्रोजनवर आधारित स्फोटाची नियंत्रित चाचणी नुकतीच घेतली. कुठल्याही आण्विक सामग्रीचा वापर न करता रासायनिक प्रक्रिया घडवून केलेली जगातील ही पहिली चाचणी आहे. या बॉम्बमुळे होणारा अपेक्षित विनाश जाहीर करण्यात आला नसला, तरी शत्रूची मर्यादित लक्ष्ये या बॉम्बने साधता येतील. बॉम्बचे स्वरूप पाहता त्यात होणारी हानी भीषण असेल.
पर्यावरणपूरक बॉम्ब!
बॉम्बसारख्या संहारक शस्त्रांमध्येही पर्यावरणपूरकतेचा विचार कुणी करीत असेल का? तर याचे उत्तर हो, असे आहे. विविध देशांनी पर्यावरणाची हानी कमीत कमी होईल; पण शत्रूचा संहार परिणामकारक आणि अपेक्षित असा होईल असा दावा करणारे बॉम्ब तयार केले आहेत. चीनने नुकतीच अशा प्रकारच्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे. कुठल्याही आण्विक सामग्रीचा वापर न करता रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यात तेथील शास्त्रज्ञांना यश आले आहे. गेल्या महिन्यात या संदर्भातील संशोधन प्रसिद्ध झाले. दोन किलो वजनाच्या बॉम्बची चाचणी केल्यानंतर हजार डिग्री अंश सेल्सिअसचा आगडोंब उसळला. इतके तापमान दोन सेकंदाहून अधिक काळ कायम राहिले. पारंपरिक शस्त्रांमधील टीएनटी स्फोटाच्या तुलनेत १५ पटींनी हा वेळ अधिक होता. चिनी भाषेतील ‘प्रोजेक्टाइल्स, रॉकेट्स, मिसाइल्स अँड गाइडन्स’ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. अमेरिका-चीनच्या करयुद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धतंत्रज्ञानातील हा आविष्कार चीनने समोर आणल्यामुळे त्याला एक वेगळे परिमाण लाभले आहे.
मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर
चीनच्या शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनच्या (सीएसएससी) संशोधन संस्थेने हा बॉम्ब विकसित केला. पाण्याखालील शस्त्रसामग्री बनविण्यात निष्णात संशोधन संस्थेने या नव्या बॉम्बची निर्मिती केली. या बॉम्बसाठी कुठल्याही प्रकारची आण्विक सामग्री वापरलेली नाही. त्याऐवजी मॅग्नेशियमवर आधारित घन स्वरूपातील हायड्रोजन सामग्रीचा, मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर करण्यात आला आहे. मूलतः याचा उपयोग स्वच्छ ऊर्जानिर्मितीसाठी आणि उष्णतानिर्मितीसाठी आहे. मात्र, त्याचाच वापर करून आता बॉम्ब तयार करण्यात आला आहे.
बॉम्बची निर्मिती करणे कठीण
आतापर्यंत मॅग्नेशियम हायड्राइड केवळ प्रयोगशाळेत तयार होत होते. केवळ काही ग्रॅमची निर्मिती प्रयोगशाळेत केली जात असे. असे करताना स्फोट झाला, तर त्यातून होणारी हानी मोठी असल्याने अधिक तीव्रतेच्या पदार्थांचा वापर आतापर्यंत केला गेला नाही. तसेच, हायड्रोजन आणि मॅग्नेशियम यांना एकत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तापमान आणि दबाव लागतो. ही आव्हाने पाहता या बॉम्बच्या निर्मितीप्रक्रियेमागील काठिण्यपातळी लक्षात येईल. चीनने वायव्य प्रांतातील शांक्शी येथे मॅग्नेशियम हायड्राईडचा प्रकल्प या वर्षाच्या सुरुवातीला सुरू केला. दर वर्षाला दीडशे टन उत्पादन या ठिकाणी घेतले जाऊ शकते. त्यासाठी वन पॉट सिंथेसिस ही पद्धत तयार करण्यात आली असून, ‘डॅलियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल फिजिक्स’ या संस्थेने ती विकसित केली आहे. बॉम्बच्या उत्पादननिर्मितीची किंमत कमी असल्याचा दावा संस्थेने केला आहे.
स्फोटाची वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया
हा बॉम्ब दोन किलो वजनाचा तयार करण्यात आला आहे. या बॉम्बला सक्रिय करण्यात येते, तेव्हा मॅग्नेशियम हायड्राइडचे जलद गतीने औष्णिक विघटन होण्यास सुरुवात होते. हायड्रोजन वायू त्या वेळी मुक्त होतो. त्या वेळी भीषण आगडोंब (व्हाइट हॉट फायरबॉल) उसळतो. अॅल्युमिनियम आणि तत्सम मिश्रधातू वितळतील इतकी उष्णता यातून तयार होते. याचा परिणाम म्हणून मॅग्नेशियम हायड्राइडचे आणखी विघटन होते आणि या प्रक्रियेची एक साखळीच तयारी होऊन स्फोटाची तीव्रता वाढते. टीएनटीचा वापर केल्यानंतर ०.१२ सेकंद मोठी ज्वाळा टिकते. त्या तुलनेत या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर उसळलेला आगडोंब दोन सेकंदांपेक्षा जास्त टिकते. संशोधक वँग शुएफेंग यांनी ही माहिती दिली. स्फोटाची तीव्रता, लक्ष्यांचा अपेक्षित विनाश याद्वारे साधला जातो. या बॉम्बवर आणि त्याच्या तीव्रतेवर शास्त्रज्ञांनी विविध प्रकारचे संशोधन केले आहे. मात्र, मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर किती केला आणि कशा प्रकारे हा बॉम्ब तैनात केला जाईल, याची माहिती देण्यात आलेली नाही.
पारंपरिक हायड्रोजन बॉम्बपेक्षा वेगळा?
पारंपरिक हायड्रोजन बॉम्बमध्ये (थर्मोन्युक्लिअर बॉम्ब) आण्विक फ्युजनचा वापर केला जातो आणि अणुबॉम्बमध्ये आण्विक फिशनचा वापर होतो. या दोन्ही प्रक्रिया परस्परभिन्न असून, दोन अणूंच्या एकत्र आल्याने किंवा अणूंचे विघटन झाल्याने मोठी ऊर्जा तयार होते. चीनने तयार केलेल्या या बॉम्बमध्ये मात्र आण्विक सामग्रीचा वापर केलेला नाही. या ठिकाणी हायड्रोजन आणि उष्णतानिर्मितीसाठी मॅग्नेशियम हायड्राइडचा वापर करण्यात आला आहे. युद्ध आणि तंत्रज्ञान जगतात अतिशय नव्या प्रकारची ही निर्मिती आहे. भविष्यातील युद्धपद्धतीवर यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे, यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. ज्या वेळी चीनने तयार केलेल्या या बॉम्बचा स्फोट होतो आणि आगडोंब उसळतो, तो पूर्णपणे रासायनिक प्रक्रियेचा भाग असतो. त्यात आण्विक प्रक्रिया नसते.
महासंहारक अस्त्रे नि मॅग्नेशियम हायड्राइड बॉम्ब
जगात आज महासत्तांसह काही देशांत अण्वस्त्रे आणि हायड्रोजन बॉम्बही आहे. या बॉम्बची संहारक क्षमता खूपच मोठी आहे. काही शहरे उद्ध्वस्त करण्याची या बॉम्बची क्षमता असते. बॉम्ब हल्ल्यानंतरही दीर्घ काळ त्याचे परिणाम दिसतात. अण्वस्त्रांबरोबर जैविक आणि रासायनिक बॉम्बही या यादीत आहेत. महासंहारक अस्त्रे (वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स) म्हणून जगात त्यांना ओळखले जाते आणि या अस्त्रांचा वापर आणि प्रसार रोखण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय करार करण्यात आले आहेत. केवळ एक प्रकारची जरब म्हणून या अस्त्रांकडे पाहिले जाते. मात्र, चीनच्या या नव्या प्रकारच्या बॉम्बमुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर संहारक क्षमतेकडे आणि संभाव्य नुकसान याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे.
नियोजित लष्करी उद्दिष्टांसाठी वापर
या बॉम्बचा वापर नियोजित लष्करी उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. या बॉम्बचे वेगळेपण म्हणजे त्याची उष्णतेमुळे तयार झालेली संहारक क्षमता. एकदा स्फोट झाल्यानंतरही साखळी प्रक्रियेद्वारे त्यातून उष्णता बाहेर पडत राहते. त्याच्या आसपासच्या भागातील सारे नष्ट होते. या बॉम्बच्या संहारक क्षमतेविषयी सविस्तर तपशील जाहीर करण्यात आले नसले, तरी नियोजित लष्करी उद्दिष्टांसाठी त्याचा वापर होण्याची शक्यता आहे. अचूकतेने एखाद्या ठरावीक ठिकाणी हल्ला करणे चीनला यामुळे शक्य होणार आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ‘टायमिंग’
चीनचे हे नवे संशोधन चिनी भाषेतील जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. चीनमधून प्रसिद्ध होणाऱ्या माहितीवर तेथील सरकारची पकड असते. तेथील सरकारच्या मान्यतेशिवाय अशी माहिती बाहेर पडू दिली जात नाही. सध्या अमेरिका-चीन करयुद्ध पेटले आहे. काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेने आपल्या भात्यात महासंहारक आणि अधिक अचूक अण्वस्त्र येऊ घातले आहे, अशा प्रकारचे जाहीर केले होते. त्यानंतर काहीच दिवसांत चीनकडूनही नव्या तंत्रज्ञानाचा शोध जाहीर झाला आहे. करयुद्धाच्या या पार्श्वभूमीवर नव्या शीतयुद्धाची नांदी आंतरराष्ट्रीय पटलावर होत असल्याचे या घडामोडींवरून दिसत आहे. आधुनिक युद्धपद्धतीत माहिती युद्धपद्धतीचा समावेश आहे. चीन दीर्घ काळापासून त्याचा अवलंब करीत आलेला आहे. त्यामुळे वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत माहिती युद्धपद्धतीचेही महत्त्व अधोरेखित करण्याची गरज आहे.
prasad.kulkarni@expressindia.com