चीन हा देश नेहमीच आपल्या वेगळ्यावेगळ्या कामांमुळे ओळखला जातो. हा देश कधी काय करील हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी चीनने भूगर्भात दहा हजार मीटर खोल खोदकाम करण्याची मोहीम सुरू केली आहे. भूगर्भात जाऊन पृथ्वीची अनेक रहस्ये जाणून घेण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. असे असतानाच आता चीनने पृथ्वीच्या भूगर्भात खोदकाम करण्याची आणखी एक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पृथ्वीच्या पोटात तब्बल १०५२० मीटर खोल एक छिद्र पाडण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर चीनही ही मोहीम नेमकी काय आहे? पृथ्वीच्या अंतरंगात जाऊन चीन नेमके काय करू पाहतोय? हे जाणून घेऊ या ….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या मोहिमेला २० जुलै रोजी सुरुवात

याआधी चीनने शीनजियांग प्रदेशातील तारीम खोऱ्यात एखाद्या बोअरप्रमाणे १० हजार मीटर खोल खोदकामास सुरुवात केली आहे. या वर्षाच्या मे महिन्यात याला सुरुवात झाली असून, हा भाग खनिज तेलाने समृद्ध आहे, असे म्हटले जात आहे. चीनच्या या दुसऱ्या मोहिमेला २० जुलै रोजी सुरुवात झाली आहे.

पहिला प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर

नव्याने सुरू करण्यात आलेला हा दुसरा प्रकल्प चीनच्या नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशनतर्फे (सीएनपीसी) राबवला जात आहे. या प्रकल्पाला चुआनके १ या नावाने ओळखला जात असून, तो शिचुआन या भागात राबवला जातोय. या मोहिमेंतर्गत भूगर्भात साधारण १०,५२० मीटर खोल एक छिद्र पाडण्यात येईल. भूगर्भातील नैसर्गिक वायूचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. चीनमधील शिन्हुआ या वृत्तसंस्थेने तसे वृत्त दिले आहे. चीनच्या इलेक्ट्रिक पॉवर न्यूज या सरकारी वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार चुआनके १ या प्रकल्पांतर्गत चीनमधील भविष्यकालीन वैज्ञानिक संशोधन, तेल व नैसर्गिक वायूस्रोतांचा विकास करणे हा आहे. शिनजियांग येथील प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला होता. भूगर्भात खोदकाम करण्याची पद्धत, माहिती गोळा करण्याची प्रक्रिया, भूगर्भात नेमके काय आहे? हे समजून घेणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता.

काही दिवसांपासून चीन सरकारने इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी इंधन, नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढवले जात आहे. ऊर्जेची टंचाई कमी करणे, भू-राजकीय अस्थिरता, जगभरातील महागाई या संकटांना तोंड देण्यासाठी ऊर्जेच्या बाबतीत चीनला स्वत:ला सुरक्षित करून घ्यायचे आहे. याच कारणामुळे चीनकडून अशा प्रकारचा प्रकल्प राबवला जात आहे. तसेच चीनमध्ये जगातील सर्वोत्तम तांत्रिक टीम विकसित करणे, तसेच पृथ्वीच्या १० हजार मीटर खोल जाऊन भूगर्भातील माहिती गोळा करणे हादेखील या मोहिमेचा उद्देश आहे, असे ‘चायना इलेक्ट्रिक पॉवर न्यूज’ने म्हटले आहे. शिचुआन येथील प्रकल्पाचे व्यवस्थापक डिंग वै यांनी या प्रकल्पाची तुलना चांद्रमोहिमेशी केली आहे.

शिचुआन प्रदेशात नैसर्गिक वायूचे भांडार

चीनमधील शिचुआन या प्रदेशात नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हा भाग डोंगराळ आहे. याच कारणामुळे प्रतिकूल हवामान आणि प्रदेश यामुळे येथे नैसर्गिक वायू मिळवणे कठीण होते. नैसर्गिक वायू आणि खनिजांचे उत्खनन करणारी शिनोपेक ही कंपनी शिचुआन या भागातील कार्बोनेट खडक, शेल गॅस हायड्रोकार्बनचा शोध घेत आहे. शिचुआन प्रदेशातील युआनबा, चुआनक्सी या भागांत नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. चुआनके-१ प्रकल्प पेट्रो चायना साऊथवेस्ट ऑइल अँड गॅसफिल्ड कंपनी राबवत आहे. कंपनीला या मोहिमेत नैसर्गिक वायू मिळण्याची आशा आहे.

भूगर्भात खोदकाम करताना कोणती आव्हाने?

भूगर्भात खोदकाम करणे तसे सोपे काम नाही. कारण- भूगर्भात आपण जसजसे खाली जाऊ तसतसे पृथ्वीचे तपामान वाढत जाते. चीन भूगर्भात १० हजार मीटरपर्यंत खोल छिद्र पाडणार आहे. त्यामुळे या मोहिमेदरम्यान वाढत्या तापमानाला तोंड द्यावे लागणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांग यू यांनी या अडचणींबाबत अधिक माहिती दिली आहे. मरिना ट्रेंच हा जगातील समुद्राचा सर्वाधिक खोल भाग आहे. या भागातील पाण्याचा दाब जवळजवळ १३८ पास्कल आहे. तुलना करायची झाल्यास हा दाब २२४ अंश सेल्सिअस एवढा आहे. या तापमानात खोदकाम करणारे लोखंडाचे कोणतेही अवजार वितळून जाते, असे यांग यू यांनी सांगितले.

सर्वांत खोल खोदकाम रशियामध्ये

चीनने २०२३ सालातील मे महिन्यात पृथ्वीच्या भूगर्भात १० हजार मीटर खोल खोदकाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार- चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी या मोहिमेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांनी भूगर्भात खोदकाम करण्यासंदर्भात याआधी २०२१ साली संशोधकांशी चर्चा केलेली आहे. सध्या जगात सर्वाधिक खोल खोदकाम रशियामध्ये झालेले आहे. उत्तर-पश्चिम रशियामध्ये साधारण १२ हजार २६२ मीटर खोल खोदकाम करण्यात आलेले आहे.

नैसर्गिक वायूचा पुरवठा आणि त्याची गरज

सध्या चीन हा नैसर्गिक वायूची निर्मिती करणारा सर्वांत मोठा चौथा देश आहे. काही वर्षांपासून जागतिक पातळीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. भू-राजकीय परिस्थिती, विजेची कमतरता, जगातिक पातळीवर किमतींमधील अस्थिरता यामुळे चीन ऊर्जेच्या बाबतीत स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. या देशाने २०२५ सालापर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. देशांतर्गत खनिज तेल, नैसर्गिक वायूचे उत्पादन वाढून, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करून चीन हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतोय.