जागतिक स्तरावर सर्वांत स्वस्त वस्तूंच्या उत्पादनात चीन आघाडीवर असतो. रिव्हर्स इंजिनियरिंगमधील आपल्या पराक्रमाने अमेरिकेसारख्या तंत्रज्ञानाधारित प्रगत देशालाही चीनने थक्क केले आहे. अलीकडे चीनने अंतराळ प्रक्षेपणाशी संबंधित खर्च कमी करण्याच्या उद्देशाने आणखी एक महत्त्वपूर्ण प्रयोग सुरू केला. या तंत्रज्ञानामुळे चांद्र मोहिमांचा खर्चही कमी होऊ शकणार आहे. भारतही या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. मात्र, चीनने केवळ यशस्वी प्रयोगच केले नाहीत, तर त्याच्या विकासातही लक्षणीय प्रगती केली आहे. काय आहे हे तंत्रज्ञान? त्यामुळे अंतराळ प्रवासाचा खर्च कसा कमी होणार? त्याविषयी जाणून घेऊ…
चीनने गाठला महत्त्वाचा टप्पा
चायना एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (सीएएससी)च्या सहाव्या अकादमीचा भाग असलेल्या ‘China’s Institute 165’ने एका दिवसात द्रव ऑक्सिजन-रॉकेल इंजिनाच्या सलग तीन चाचण्या यशस्वीपणे पूर्ण करीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ही कामगिरी चीनच्या त्याच्या पुढच्या पिढीतील प्रक्षेपण वाहनांसाठी मुख्य प्रोपल्शन इंजिनच्या विकासामध्ये भरीव प्रगती दर्शवते. या विकासामुळे राष्ट्राला प्रवेगक दराने मोहिमा सुरू करण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा : अमेरिका ‘WHO’मधून बाहेर पडणार; ट्रम्प यांच्या निर्णयाचा जागतिक आरोग्यावर काय परिणाम होणार?
चीनने घेतली नवीन तंत्रज्ञानाची चाचणी
या इंजिनाच्या संयोजनामुळे चीनचे रॉकेट ५०० टन वजनाचे पेलोड अंतराळात वाहून नेण्यास सक्षम असतील. त्याव्यतिरिक्त द्रव ऑक्सिजन केरोसीन इंजिन वापरल्याने चीनचे अंतराळ उड्डाण लक्षणीयरीत्या अधिक किफायतशीर होईल आणि आपल्या किफायतशीर वस्तूंच्या दरांसाठीच हा देश ओळखला जातो. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनने या द्रवरूप ऑक्सिजन- रॉकेल तंत्रज्ञानाचा वापर करून, चार इंजिनांची समांतर प्रज्वलन चाचणी यशस्वीपणे घेतली.
ही इंजिने किती उपयुक्त?
सहसा उपग्रह किंवा अंतराळयान वाहून नेणाऱ्या रॉकेटच्या इंजिनांना केवळ इंधनच नाही, तर ज्वलन कायम राखण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठादेखील आवश्यक असतो. इथेच द्रव ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून काम करतो. रॉकेट तंत्रज्ञानामध्ये विशेषतः मध्यम क्रायोजेनिक इंजिनामध्ये ही बाब आवश्यक ठरते. रॉकेल आणि द्रवरूप ऑक्सिजनचे मिश्रण हा एक किफायतशीर उपाय आहे, तसेच यामुळे रॉकेटची शक्तीदेखील वाढते. हे दोन्ही पदार्थ सहज साठवता येत असल्यामुळे हा उपाय अधिक उपयुक्त आहे.
पारंपरिक इंजिनांच्या तुलनेत कमी जागा आणि वजन आवश्यक असलेल्या इंजिनाच्या डिझाइनमध्ये हे तंत्रज्ञान फायदे प्रदान करते. या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी चीनकडून चालू असलेल्या प्रयत्नांद्वारे त्यांच्या रॉकेट क्षमतेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीरांना उतरवण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेसह भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी हे प्रयोग बहुमोल ठरणार आहेत.
चंद्राच्या शोधासाठी विशेष तयारी
चीन आपल्या अंतराळ कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो; परंतु मोहिमांचा खर्च कमी करण्यासाठी चीन महत्त्वपूर्ण प्रयत्न करीत आहे. सरकारी संशोधनाव्यतिरिक्त चीनमधील खासगी कंपन्या या प्रयत्नांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. चंद्राच्या शोधासंदर्भात स्पेसएक्सच्या स्टारशिपशी तुलना करता, चीन १,५०० किलोग्रॅमच्या अंदाजित पेलोड क्षमतेसह लाँग मार्च ९ अंतराळयान विकसित करीत आहे.
चीनने आपल्या अंतराळवीरांच्या चांद्र मोहिमेसाठी विशेष स्पेस सूटदेखील विकसित केले आहेत. चंद्राच्या दूरच्या बाजूला पोहोचणे, चंद्राचे नमुने मिळवणे व मंगळावर रोव्हर तैनात करणे यांसह राष्ट्राच्या कामगिरी उल्लेखनीय आहेत. या उपलब्धी पाहता, २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याचे चीनचे उद्दिष्ट प्रशंसनीय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
चीनची चांद्र मोहीम
भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करून विक्रम रचला होता. त्यानंतर चीननेदेखील ‘Chang’e-6 probe’ यानातून चंद्राच्या अंधाऱ्या भागातून दोन किलो माती आणून इतिहास घडविला. ही माती चार अब्ज वर्षे जुनी असल्याचे म्हटले जाते. चीनने ही माती ड्रिलिंग व रोबोटिक आर्म्सद्वारे गोळा केली आणि त्यानंतर या मातीला मोठ्या कॅप्सूलमध्ये टाकून री-एंट्री व्हेईकलच्या मदतीने पृथ्वीवर आणण्यात आले.
ही मोहीम अवघड होती; मात्र त्यात यश मिळवीत चीनने इतिहास घडवला. ही माती पृथ्वीवरून जो चंद्राचा भाग दिसतो, त्या भागातील नाही; तर जो भाग दिसत नाही, त्या भागातील माती असल्याने संशोधकांच्या दृष्टीने त्याचे अधिक महत्त्व आहे. चंद्रावर आतापर्यंत गेलेले अंतराळवीर पृथ्वीवरून दिसणाऱ्या भागातच उतरले. चंद्राच्या न दिसणाऱ्या भागात अनेक रहस्ये लपलेली असण्याची शक्यता असल्याने, या मातीतून ही रहस्ये उलगडणार असल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला होता.
हेही वाचा : पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे थैमान; काय आहे हा दुर्मीळ आजार? याची लक्षणे काय?
चीन आणि रशिया यांनी २०२१ साली चंद्रावर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र बांधण्याचा करार केला होता. चीन रशियाच्या मदतीने २०३० पर्यंत चंद्रावर अणू प्रकल्प उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रावरून माती आणणे हे चीनचे त्याच दिशेने उचलण्यात आलेले पाऊल असल्याचे सांगण्यात येते. रशियाची अंतराळ संस्था ‘रोसकॉसमॉस’चे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांचे सांगणे आहे की, चंद्रावर अणू प्रकल्प उभारणे आव्हानात्मक आहे. ही मोहीम मानवाद्वारे नव्हे, तर मशीनच्या साह्याने राबवली जाणार आहे. थोडक्यात हा अणू प्रकल्प केवळ मशीनच्या साह्याने उभारला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चीन २०३० पर्यंत चंद्रावर अंतराळवीर पाठविण्याचाही विचार करीत आहे. त्यामुळे चीनचा नवीन तंत्रज्ञानाचा शोध या मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.